

Crime News
वर्षाच्या शेवटी शेवटी ग्रॅहमन यांनाही जुलाब, उलट्या, पोटदुखी, त्वचा कोरडी पडणे आणि तहानेने जीव कासावीस होणे, असा त्रास सुरू झाला. त्यांनीही हरेक उपाय केले; पण काही उपयोग झाला नाही आणि 1809 च्या अखेरी त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
बहुतेक न्यायाधीश आणि वकील राहात असलेल्या या परिसरात गेबहार्ड नावाचे एक न्यायाधीश होते. त्यांच्या पत्नीच्या बाळंतपणाची वेळ जवळ आली होती. त्यामुळे पत्नीच्या आणि घरादाराच्या देखरेखीसाठी म्हणून गेबहार्ड यांनी 1810 सालच्या सुरुवातीला अॅनाला कामाला ठेवले. 13 मे रोजी गेबहार्डबाईंना मुलगी झाली आणि त्यानंतर ताबडतोब त्यांनाही जुलाब, उलट्या, पोटदुखी, त्वचा कोरडी पडणे आणि तहानेने जीव कासावीस होणे, असा त्रास सुरू झाला आणि 20 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याकाळात अनेक महिला बाळंतरोगाने मृत्युमुखी पडत असत, त्यामुळे गेबहार्डबाईंचा मृत्यूही याच रोगाने झाला असेल, असे समजून अनेकांनी तिकडे दुर्लक्ष केले.
याच दरम्यान गेबहार्ड यांच्या शेजार्यांमध्ये अॅनाविषयी वेगवेगळ्या प्रकारची कुजबुज सुरू झाली. काहीजणांनी गेबहार्ड यांना सांगितले की, ही बाई म्हणजे पांढर्या पायाची अवदसा आहे, आजपर्यंत ती ज्या ज्या घरात कामाला गेली आहे, तिथे तिथे मुडदे पडले आहेत, त्यामुळे गेबहार्डनी अॅनाला हाकलून लावावे, असे या लोकांचे म्हणणे होते. मात्र, गेबहार्ड हे आधुनिक विचारसरणीचे होते. त्यामुळे त्यांनी अॅनाला कामावरून काढून टाकले नाही.
एकेदिवशी गेबहार्ड यांच्या घरी दोन पाहुणे आले होते. रात्रीच्यावेळेस त्यांनी जेवण करताच त्यांना त्रास सुरू झाला. या पाहुण्यांसोबत आलेल्या दोन नोकरांना अॅनाने थोडी वाईन प्यायला दिली होती. या नोकरांनाही हाच त्रास सुरू झाला. शिवाय त्यादिवशी अॅनाचे ज्या दुसर्या मोलकरणीशी भांडण झाले होते, तिलाही असाच त्रास सुरू झाला होता. त्यानंतर मात्र गेबहार्ड यांच्या मनात अॅनाविषयी संशयाची पाल चुकचुकायला लागली. एक-दोन दिवसानंतर सायंकाळच्या वेळेस गेबहार्ड यांच्या घरी त्यांचे पाच मित्र गप्पा मारण्यासाठी म्हणून आले होते. गप्पांच्या ओघात त्यांचे बीअर पिणेही चालू होते आणि अचानक सर्वांना त्रास सुरू झाला. हा प्रकार पाहिल्यानंतर मात्र गेबहार्ड यांनी अॅना हिला ताबडतोब घरातून हाकलून काढले.
पण, जाता जाता घरातील अन्य नोकरांना त्यांची कामे समजावून देण्याच्या बहाण्याने अॅना काही काळ तिथे रेंगाळत राहिली. या काळात तिने स्वयंपाक घरातील मिठाच्या बरणीत कसला तरी पदार्थ मिसळला. एका मोलकरणीने हे काय मिसळले, असे विचारल्यावर अॅनाने सांगितले की, ‘ ज्यांना मिठातून सजवून निरोप देतात, त्यांच्यासाठी हे खास मीठ आहे.’ पण, त्या मोलकरणीला काही त्याचा अर्थ समजला नाही. (इंग्लंडमध्ये त्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन झाले, तर त्याचा मृतदेह दफन करण्यापूर्वी तो मिठाने आच्छादित केला जात असे.) जाता जाता अॅनाने गेबहार्ड यांच्या पाच महिन्यांच्या मुलीला एक बिस्कीट दुधात बुडवून खायला घातले. दोन मोलकरणींनाही आपल्या हाताने चहा करून पाजला आणि निरोप घेऊन ती बाहेर पडली.
इकडे गेबहार्ड यांच्या लहान मुलीला आणि दोन मोलकरणींना त्रास सुरू झाला. गेबहार्ड यांनी धावाधाव करून, वैद्यकीय उपचार करून कसेबसे तिघींचेही प्राण वाचविले आणि अॅनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला; पण तिने जर्मनी गाठले होते. दरम्यानच्या काळात इंग्लंडमधील जेम्स मार्श या युवा रसायन शास्त्रज्ञाने मानवी शरीरात शिरलेले विषारी घटक शोधून काढण्याचे एक तंत्रज्ञान विकसित केले होते. या तंत्रज्ञानानुसार मनुष्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या शरीरातील विषारी घटक ओळखणे शक्य झाले होते. हे तंत्रज्ञान मान्यताप्राप्त होऊन या तंत्रज्ञानाला ‘मार्श टेस्ट’ असे नाव देण्यात आले.
अॅना सुरुवातीला जिथे काम करीत होती, त्या न्यायमूर्ती ग्लासर यांचा पत्नीच्या मृत्यूबद्दल अॅनावर संशय होताच. त्यामुळे ग्लासर यांनी पत्नीचा मृतदेह उकरून काढून त्याची मार्श टेस्ट करायला लावली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ग्लासरबाईंचा मृत्यू आर्सेनिक या विषारी द्रव्याने झाला होता. त्यामुळे पोलिसांनी लागलीच न्या. ग्रॅहमन आणि गेबहार्डबाईंच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांचाही मृत्यू आर्सेनिकमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे अॅनाच्या संपर्कात आलेले अनेकजण आर्सेनिकच्या प्रभावापासून थोडक्यात बचावल्याचेही समोर आले. लंडनचे पोलिस तिच्या मागावर होते. तशातच अॅनाला पुन्हा दुर्बुद्धी झाली आणि कामाच्या शोधात ती पुन्हा लंडनला आली आणि आपसूकच पोलिसांच्या तावडीत सापडली. तपासणी केली असता, तिच्याकडे आर्सेनिक या विषारी पदार्थाचा बराच साठा मिळून आला.
कालांतराने अॅनाविरुद्ध विषप्रयोग करून तीन लोकांचा खून करण्याचा आणि अनेकजणांचे बळी घेण्याचे प्रयत्न करण्याचा खटला चालविण्यात आला. न्यायालयाने अॅनाला दोषी ठरवून या प्रकरणी तिचा तलवारीने शिरच्छेद करण्याची शिक्षा सुनावली. 1812 च्या दरम्यान अॅनाचा जाहीर शिरच्छेद करण्यात आला आणि एका रूपगर्विता विषकन्येचा अंत झाला. मार्श टेस्टनुसार उघडकीस आलेला जगातील हा पहिला गुन्हा होता आणि त्याची शिक्षा भोगावी लागलेली अॅना ही पहिली गुन्हेगार होती.
(उत्तरार्ध)