

धुळे : धुळे तालुक्यातील जुनवणे गावात एका 16 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर शनिवार ( दि. 24 मे ) रोजी दुपारी 3.52 वाजता मिळाल्यानंतर प्रशासनाने अवघ्या काही मिनिटांत तातडीने हस्तक्षेप करून हा विवाह रोखला.
मुलीचा विवाह रविवार ( दि. 25 मे) रोजी मालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे होणार होता. कुटुंबीय 24 मे रोजी हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाले. याबाबत माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाइनच्या धुळे पथकाने पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने तात्काळ कारवाई पार पाडली.
ग्रामसेवक राजेंद्र शिंदे यांनी मुलीच्या घरी भेट दिली असता, कुटुंब हळदीसाठी निघाले असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना अर्ध्या रस्त्यात (बोरकुंड) परत बोलावले आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत समज दिली. त्यानंतर पालकांना नोटीस देऊन सोमवार (दि.26 मे) रोजी बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. यावेळी बालकल्याण समितीने पालकांकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे लेखी हमीपत्र घेतले. तसेच, नाशिक चाइल्ड हेल्पलाइनला याबाबत माहिती देऊन मुलाकडील कुटुंबीयांनाही समज देण्याच्या सूचना दिल्या.
या यशस्वी कारवाईत ग्रामसेवक राजेंद्र शिंदे, पोलीस पाटील जितेश वाघ, सरपंच योगेश पाटील, चाइल्ड हेल्पलाइनचे सुपरवायझर मुकेश महिरे, केसवर्कर संदीप पवार यांचे मोलाचे योगदान होते. त्यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण आणि प्रकल्प समन्वयक प्रतीक्षा मगर यांचे मार्गदर्शन लाभले.
बालविवाह कायद्यानुसार गुन्हा आहे. कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तातडीने चाइल्ड हेल्पलाइन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाते, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, धुळे यांनी केले आहे.