

जळगाव (अमळनेर) : अमळनेर तालुक्यातील गांधली येथील गौरव रविंद्र बोरसे (वय २१) या तरुणाने प्रेमात फसवणुकीनंतर टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना मारवड-निम रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळील स्मशानभूमीजवळ घडली. या घटनेपूर्वी गौरवने रेकॉर्ड केलेला एक भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत गौरवने प्रेमप्रकरणातून फसवले गेल्याचे सांगत तरुण पिढीला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.
"प्रेमाच्या आहारी न जाता, शिक्षणाकडे लक्ष द्या. करिअर घडवा. आयुष्य खूप मोठं आहे,"असा सल्ला गौरवने दिला असून, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत भावनिक आवाहन केलं आहे. गौरवने जीवनयात्रा संपविण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांची माफी मागितली असून, या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षुल्लक प्रेमभंगाच्या अनुभवामुळे तरुणाने आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व शोककळा पसरली आहे.
ही घटना तरुणाईसमोरील वास्तव आणि मानसिक तणावाचे गांभीर्य अधोरेखित करते. गौरवचा संदेश सध्याच्या तरुणांसाठी स्वतःचा आत्मपरीक्षण करणारा आणि दिशा दाखवणारा आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भोई यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.