

एका मध्यमवर्गीय कुटुंबात सकाळी एक कुरिअर बॉय आला. तुमचे ऑनलाईन शॉपिंगचे पॅकेज आलेय मॅडम, असे तो म्हणाला. साक्षीने दार उघडले. थोडे आश्चर्य वाटले; कारण तिने काहीच ऑर्डर केलेले नव्हते. पण, पॅकेजवर तिचे नाव, नंबर आणि पूर्ण पत्ता होता. पार्सल पेड आहे, कदाचित पतीने काही मागवले असेल, असे म्हणत तिने पॅकेज घेतले. काही मिनिटांतच तिने ते पार्सल उघडले. त्यामध्ये एक साधे हेडफोन्स होते आणि एक चिठ्ठी...
‘काँग्रॅच्युलेशन्स! तुम्ही आमचे प्रीमियम कस्टमर आहात! या क्यूआर कोडला स्कॅन करा आणि 2000 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर जिंका!’ साक्षीने मोबाईल घेतला आणि लगेच क्यूआर कोड स्कॅन केला. स्कॅन करताच एक वेबसाईट उघडली, अत्यंत आकर्षक, हुबेहूब ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईट सारखी. तुमचे बँक डिटेल्स टाका आणि व्हाऊचर तुमच्या खात्यावर जमा होईल, असे तिला सांगण्यात आले.
वेबसाईट ही ओरिजनल ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटसारखीच दिसत होती. त्यामुळे तिने विचार न करता तिचा मोबाईल नंबर, बँक अकाऊंट नंबर आणि यूपीआय डिटेल्स टाकले. त्यानंतर एक ओटीपी मागण्यात आला. साक्षीनेही तो भरला. थोड्याच वेळात तिला 49,500 डेबिटेड, 9,999 डेबिटेड, 15,000 डेबिटेड असे तीन एकसारखे मेसेज आले. तिला काही कळण्याआधी तिचे खाते पूर्ण रिकामे झाले होते!
क्यूआर स्कॅमचा हा प्रकार नवीन असून, याला ब्रशिंग स्कॅम म्हणतात. यामध्ये सायबर चोरटे ई-कॉमर्स ग्राहकांची यादी डार्कनेटवरून खरेदी करतात. त्या व्यक्तींना आकर्षक वस्तू आणि गिफ्टस् पाठवले जातात. बहुतेक वेळा फेक. त्यात क्यूआर कोड दिला जातो. हा क्यूआर कोड स्कॅन करताच तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल होते किंवा तुमची माहिती एका बनावट वेबसाईटवर पोहोचते आणि मग ओटीपी मिळताच सायबर चोर तुमचे बँक खाते साफ करतात.
विशेष म्हणजे, या प्रकारात वेबसाईटस् अगदी खर्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटसारख्या दिसतात. त्यामुळे सामान्य माणूस सहज फसतो. गिफ्ट मिळण्याच्या नादात लोक स्वतःहून आपली माहिती देतात आणि आर्थिक नुकसान सहन करतात. त्यामुळे याबाबतीत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परिपूर्ण माहिती नसताना कोणताही क्यूआर कोड स्कॅन करणे आर्थिकद़ृष्ट्या अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे याबाबतीत काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
क्यूआर कोड स्कॅन करताना खात्रीशीर स्रोत आहे का हे तपासा.
गिफ्ट, ऑफर, सवलत यांच्यामागे ओटीपी मागितला जात असेल, तर तो स्कॅम असतो.
मोबाईलमध्ये अज्ञात अॅप्स, वेबसाईटस् उघडत असतील, तर त्वरित सावध व्हा.