बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Alopathy Fraud Doctor
अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगसPudhari photo
Published on
Updated on

ठाणे पोलिसांनी नुकतीच कारवाई केलेले जवळपास सारेच बोगस डॉक्टर अल्पशिक्षित होते. त्यापैकी रामतेज प्रसाद नामक डॉक्टराचे तर प्राथमिक शिक्षणदेखील पूर्ण झाले नसल्याचे समोर आले होते. तो पूर्वी एका क्लिनिकमध्ये शिपाई म्हणून काम करीत होता. तेथे काम करीत असताना त्याने रुग्णांना इंजेक्शन देणे, सलाईन लावणे आदी कामे शिकून घेतली. त्यानंतर काही औषधांची नावे लक्षात ठेवून त्याने कळव्यात चक्क स्वतःचे क्लिनिक थाटले.

राज्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. बोगस डॉक्टरांचे हे लोण आता शहरी भागातही पसरू लागले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार भारतात एकूण अ‍ॅलोपॅथी उपचार करणार्‍या डॉक्टरांपैकी 57.3 टक्के डॉक्टर हे बोगस असल्याचे नमूद करण्यात आले आहे; तर सेंट्रल ब्यूरो ऑफ हेल्थ इंटेलिजेंसच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रात नऊ हजारांहून अधिक बोगस डॉक्टरांकडे कोणतीही प्रमाणित वैद्यकीय पदवी नसताना ते रुग्णांना उपचार देत असल्याचे म्हटले आहे. या आकडेवारी पेक्षा कितीतरी जास्त संख्येने बोगस डॉक्टर आज राज्यात सर्रास रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील राज्यातील प्रत्येक गाव बोगस डॉक्टरांच्या विळख्यात अडकला असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यरत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत आरोग्य विभागाच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच एका महिला बोगस डॉक्टरचा भांडाफोड करीत तिच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी देखील भिवंडी, कल्याण, मुंब्रा आदी भागांत अनेक बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित अंकित पाटील मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. अंकित पाटील या 25 वर्षीय तरुणावर चुकीचे उपचार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल तत्कालीन ठाणे सिव्हिल सर्जनच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिला होता. या अहवालानंतर पोलिसांनी डायघर येथील बोगस डॉक्टर दाऊद खान यास बेड्या ठोकल्या होत्या. दाऊद खान याच्याकडे असलेल्या सर्व वैद्यकीय पदव्या बनावट होत्या, असे देखील पोलिस तपासातून समोर आले आहे. त्याने या बोगस वैद्यकीय पदव्या भिवंडी येथून विकत घेतल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या पदव्या विक्री करणार्‍या अन्य दोघा बोगस डॉक्टरांनादेखील गजाआड केले होते. या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना बोगस वैद्यकीय डिग्री विकल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

भिवंडीतील बोगस डॉक्टरांचे प्रकरण पुढे आल्यानंतर पोलिसांनी बनावट वैद्यकीय डिग्री विक्री करणार्‍या व परवानगी नसतानादेखील रुग्णांना उपचार देणार्‍या बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाई मोहीम उघडली होती. त्यात कळवा येथील एका दक्ष नागरिकाने भास्कर नगर आणि वाघोबा नगर येथे असलेल्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर ठाणे पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संघटनेशी पत्रव्यवहार करून बोगस डॉक्टरांवर कारवाई प्रकरणी मदत करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर संघटनेचे पथक ठाणे पोलिसांच्या मदतीला आले.

पोलिस व संघटनेच्या पथकाने कळवा येथील आठ क्लिनिकवर एकाचवेळी छापा टाकला होता. यावेळी आठ बोगस डॉक्टर कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांना इंजेक्शन व इतर औषधोपचार देताना आढळून आले होते. या डॉक्टरांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात अ‍ॅलोपॅथी औषधे, सलाईन, इंजेक्शन जप्त करण्यात आल्यानंतर या डॉक्टरांवर कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांनी कारवाई केलेले जवळपास सारेच बोगस डॉक्टर अल्पशिक्षित होते. त्यापैकी रामतेज प्रसाद नामक डॉक्टराचे तर प्राथमिक शिक्षण देखील पूर्ण झालेले नसल्याचे समोर आले होते. तो पूर्वी एका क्लिनिकमध्ये शिपाई म्हणून काम करीत होता. तेथे काम करीत असताना त्याने रुग्णांना इंजेक्शन देणे, सलाईन लावणे आदी कामे शिकून घेतली. त्यानंतर काही औषधांची नावे लक्षात ठेवून त्याने कळव्यात चक्क स्वतःचे क्लिनिक थाटले.

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात तर दहावी - बारावी नापास झालेले काही महाभाग देखील सर्रास डॉक्टर म्हणून मिरवतात व रुग्णांच्या जीवाशी खेळतात. तर मुंब्रा, कळवा, दिवा, भिवंडी, कल्याण, शहापूर आदी भागांत अनेक बोगस डॉक्टर दहावी- बारावी नापास असून, ते राजरोसपणे प्रॅक्टिस करीत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासन दरबारी नोंद आहेत. ही परिस्थिती फक्त ठाणे जिल्ह्याची नसून, सार्‍या राज्यात सगळीकडे सारखीच स्थिती आहे.

ग्रामीण भागात तर ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, अनेक बोगस डॉक्टर स्वत: जवळ कुठलीही प्रमाणित पदवी नसताना इंजेक्शन देण्यापासून थेट ऑपरेशन करण्याइतपत मजल गाठतात. अशाच चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे मुंब्रा येथील एका विवाहित महिलेस प्रसूतीदरम्यान आपला जीव गमवावा लागला होता. या विवाहितेच्या पतीने न्याय मिळवण्यासाठी पोलिस ते न्यायालयापर्यंत धाव घेतली; मात्र त्यास अजूनही न्याय मिळालेला नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर्स कार्यरत आहेत. फक्त ग्रामीण भागातच नव्हे, तर आता शहरी भागातदेखील बोगस डॉक्टरांची संख्या झपाट्याने वाढत असून, या बोगसगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशी यंत्रणाच नसल्याचे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन संघटनेने म्हटले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या दोन वर्षांत चिकित्सा शिक्षा नियंत्रण अधिनियम 1973 कायद्यानुसार एक हजाराहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाने अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद सिद्ध, युनानी, होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथी योग या चिकित्सा पद्धतींना मान्यता दिली आहे. तसेच अ‍ॅक्युपंचर, हिप्नोथेरपी या आरोग्य विज्ञानाच्या दोन शाखांना स्वतंत्र चिकित्सा पद्धती म्हणून मान्यता दिली नाही. याबाबत केंद्र शासनाचे असे निर्देश आहेत की, या दोन शाखांमधील व्यवसाय नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक अथवा योग्य प्रकारे प्रशिक्षित व्यक्ती करू शकते. तसेच त्या-त्या राज्यातील मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे. याखेरीज अन्य कुठल्याही वैद्यकीय सेवा देणार्‍यांना बोगस असे ठरवण्यात आले आहे. बोगस डॉक्टरांना आळा बसावा म्हणून शासनाने अधिनियम 1961 मधील कलम 33, 38 मध्ये सुधारणा केली आहे. अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांचा शिक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे सर्व गुन्हे दखलपात्र अजामीनपात्र ठरवण्यात आले आहेत.

सुधारित कायद्यात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय करताना आढळून आल्यास दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकते. बोगस डॉक्टरांविरोधात सर्वसामान्य व्यक्ती देखील पोलिसात अथवा आरोग्य विभागात तक्रार दाखल करू शकतात; तर नियमानुसार डॉक्टरांना जाहिरात करण्यास बंदी आहे. वैद्यकीय संस्था मात्र सर्रास जाहिरात करताना दिसून येतात. आमच्याकडील औषधे सुरक्षित आहेत. त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. दुसर्‍या औषधांमुळे उष्णतेचा त्रास होऊन आणखी रक्तस्राव होईल; मात्र आमच्या औषधांमुळे काहीही त्रास होणार नाही, असे सांगून रुग्ण व नातेवाइकांची सर्रास फसवणूक केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news