

मेसेजमध्ये एपीके स्वरूपात एक ॲप डाउनलोड करण्याचा संकेत
आरटीओ विभागाकडून झाला मेसेज प्राप्त : मेसेजनुसार त्यांनी सिग्नल तोडल्याचा आरोप करत त्यांच्यावर दोन हजार रुपयांचा दंड
क्लिक करताच काही सेकंदांतच बँक खात्यातून मोठ्या रकमांची ट्रान्झॅक्शन्स
नाशिक : वनरक्षक संतोष बोडके यांची बनावट मेसेजद्वारे एक लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सातपूरच्या पिंपळगाव बहुला परिसरात वास्तव्यास असलेले बोडके हे रविवारी (दि.27) सायंकाळी घरी असताना त्यांना मोबाइलवर आरटीओ विभागाकडून एक मेसेज प्राप्त झाला. या मेसेजनुसार त्यांनी सिग्नल तोडल्याचा आरोप करत त्यांच्यावर दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे नमूद केले होते. त्यांनी लिंक क्लीक केल्याबरोबर त्यांच्या खात्यातून पैसे लंपास करण्यात आले.
मेसेजमध्ये एपीके स्वरूपात एक ॲप डाउनलोड करण्याचा संकेत होता. बोडके यांनी त्या फाइलवर केवळ क्लिक केले आणि काही सेकंदांतच त्यांना बँक खात्यातून मोठ्या रकमांची ट्रान्झॅक्शन्स झाल्याचे मेसेज मिळू लागले. एकूण ८५ हजार रुपये एका खात्यावर, तर काही वेळातच उर्वरित १५ हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्स्फर झाल्याची नोंद त्यांच्या मोबाइलवर दिसली. काहीच क्षणात त्यांच्या खात्यातील संपूर्ण एक लाख रुपयांची रक्कम गायब झाली. त्यानंतर बोडके यांनी तत्काळ नाशिक सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, संबंधित फसवणूक करणाऱ्यांची माहिती काढण्यासाठी तांत्रिक पातळीवर शोध सुरू आहे.
'मी दोनच दिवसांपूर्वी आरटीओ ऑफिसला जाऊन आलो होतो. त्यानंतर मला हा मेसेज आला. त्यात 'एपीके' नावाची फाइल होती. केवळ फाइलवर क्लिक केले आणि काही समजण्याच्या आतच माझे एक लाख रुपये बँक खात्यातून गेले. भविष्यात इतर कोणीही अशा फसवणुकीचा बळी ठरू नये यासाठी सावध राहणे गरजेचे आहे. अनोळखी मेसेज किंवा फाइल्स उघडू नयेत. सोशल मीडियाचा वापर करताना योग्य खबरदारी घ्यावी.'
संतोष बोडके, वनरक्षक, नाशिक
या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी मेसेजमधील लिंक, फाइल किंवा अॅप डाउनलोड करण्याआधी ते वैध आणि सुरक्षित आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनानेदेखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही शंका असेल तर त्वरित सायबर क्राइम हेल्पलाइन (१९३०)वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.