सिद्दीकी हत्येचा संदेश कुणाला?; 'बिष्णोई गँग'ने कसा घडवून आणला हत्येचा कट?

Baba Siddique murder | खबर्‍यांचे नेटवर्क पोलिसांकडे राहिले नाही
Baba Siddique murder
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.Pudhari Photo
Published on
Updated on
संजय कदम, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे राजकीय वर्तुळात जशी खळबळ उडाली, तसेच मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. खरंच मुंबई पोलिस हे स्कॉटलंड यार्ड पोलिसांनंतर दोन नंबरला येतात का, असा उघड सवाल केला जाऊ लागला आहे...

दोन दशकांपूर्वीपर्यंत ‘पोलिसांचे खबरी’ म्हणून असलेली यंत्रणा सशक्त होती. एखाद्या घटनेपूर्वी अचूक माहिती पोलिसांना मिळत असे, पण आज असे खबर्‍यांचे जाळे आणि त्यांना सांभाळणारे पोलिस अधिकारी फारसे राहिले नाहीत. पोलिसांना माहिती देणारे हे खबरे मुंबई पोलिसांसाठी जवळपास कोणत्याही तपासाचा एक महत्त्वाचा भाग होते, पण तंत्रज्ञानाच्या आगमनाने, प्रकरणे सोडवण्याची वाढती गुंतागुंत आणि भ्रष्टाचाराबद्दल वाढलेली जनजागृती यामुळे त्यांचा प्रभाव आता जवळपास संपत आला आहे. विशेषत: गँगवारच्या काळात खबर्‍यांचे महत्त्व अधोरेखित झाले, पण आज ते नेटवर्क पोलिसांकडे राहिले नाही.

अगदी राकेश मारीया, हिमांशू रॉय यासारख्या पोलिस अधिकार्‍यांच्या काळात खबर्‍यांचे जबरदस्त असे नेटवर्क होते. काही पोलिस कर्मचारीही गुप्तपणे माहिती काढण्यात माहीर होते. त्यामुळे एखादा गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांना सुगावा लागत असे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. क्राईम ब्रँचमध्ये तसे अधिकारी नाहीत. पोलिस अधिकारी सचिन वाझे ‘अंटेलिया’ प्रकरणात अडकल्यानंतर अख्खी क्राईम ब्रँच खाली करण्यात आली. वर्षांनुवर्ष क्राईम ब्रँचमध्ये ठाण मांडून असलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

क्राईम ब्रँचमध्ये दरारा असलेले अधिकारी आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात शिरकाव केलेल्या बिष्णोई गँगकडून अभिनेता सलमान खान याच्या घराची रेकी होत असताना किंवा त्याही पुढे जाऊन त्याच्या घरावर गोळीबार झाला तरी पोलिस खात्याला याचा थांगपत्ताही लागत नाही. आता तर काय राज्याचा मंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यापर्यंत बिष्णोई गँगची मजल गेली. ही हत्या एसआरएच्या वादातून झाली असे सुरुवातीला सांगण्यात येत होते, पण जसजसा तपास पुढे सरकू लागला तशी या हत्येमागची नवी माहिती पुढे येऊ लागली.

‘सलमान तू आमच्यापासून दूर नाहीस’

सिद्दीकी यांची हत्या करण्याचे नेमके कारण काय तर यातून एक वेगळा संदेश द्यायचा बिष्णोई गँगचा हेतू होता. सलमान बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे हे सर्वश्रुत आहे. त्यात बाबा सिद्दीकी आणि सलमानचे अगदी जवळचे संबंध होते. त्यामुळे ‘सलमान तू आमच्यापासून दूर नाहीस’, असा इशाराच जणू या गँगला द्यायचा होता, असेही आता बोलले जात आहे.

'या' हत्येचे प्लानिंग नेमके कसे केले?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा हळूहळ उलगडा होत चालला आहे. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली आहे. तीन जण अद्यापही फरार आहेत. त्यामुळे अटक आरोपींच्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. या हत्येचे प्लानिंग नेमके कसे करण्यात आले, या हत्येचा कट कसा रचण्यात आला याची माहिती बाहेर येऊ लागली आहे.

झिशान अख्तर बिष्णोई गँगच्या संपर्कात कसा आला?

21 वर्षीय झिशान अख्तरला जालंधर पोलिसांनी 2022 मध्ये खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तो पटियाला तुरुंगात बंद होता. या तुरूंगातच तो लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला आणि इथेच त्याला बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी देण्यात आली. त्यानंतर यावर्षी 7 जूनला तुरुंगातून सुटल्यानंतर झिशानने हरियाणातील कैथलमध्ये जाऊन गुरमेल सिंग यांची भेट घेतली.

असे घडले हत्याकांड

झिशाननेच गुरमेल, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार यांना सिद्दिकीच्या हत्येचा कट रचण्यास सांगितले होते. या शार्प शूटर्सना मुंबईत भाड्याने खोली देण्यापासून त्यांची इतर व्यवस्था करण्यात झिशानचा हात होता. तसेच हल्लेखोर चार आठवड्यांपासून सिद्दीकी यांच्या घराची आणि मुलाच्या कार्यालयाची रेकी करत होते. यासाठी हल्लेखोर 40 दिवस मुंबईत राहिले होते. इतकंच नाही तर बाबा सिद्दीकी यांचे लोकेशन देखील झिशानच हल्लेखोरांना देत होता. त्यानुसार त्यांनी लोकेशनवर पोहोचून हे हत्याकांड घडवून आणले.

पोलिस यंत्रणेवर दबाव

जेव्हा असा हल्ला होतो, अंदाधुंद गोळीबार होतो त्यावेळी या भागातली पोलिस यंत्रणा किंवा पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न उरतो. वाढता भ्रष्टाचार आणि राजकारण्याचा दबावाच्या ओझ्याखाली पोलिस यंत्रणा दबली गेली आहे. या हत्याकांडातील तिघांना आम्ही पकडले आहे. तीन आरोपी फरार आहेत. त्यांनाही आम्ही लवकर शोधू, असे पोलिस सांगून वेळ मारून नेतील राजकारणीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहतील.

Baba Siddique murder
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news