

राजेंद्र जोशी, कोल्हापूर
‘माझ्याविरुद्ध तक्रार केली तर खबरदार! माझ्याकडे वकिलांची फौज आहे. ईडीपर्यंत मी कोणाला घाबरत नाही. चुकून तक्रार केलीच, तर गुजरातच्या फेर्या मारायला लावीन आणि वर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन,’ ही धमकीवजा दर्पोक्ती आहे गुजरातच्या मोरबी येथील एका तथाकथित मेंटॉरची. सोशल मीडियावर व्यावसायिक बनवण्याचे स्वप्न विकून, प्रत्यक्षात महाराष्ट्रातील अनेक तरुणांना त्याने कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
व्यावसायिक बनण्याची स्वप्ने पाहणारी तिशीच्या उंबरठ्यावरील तरुणाई या भामट्याच्या जाळ्यात अडकून आर्थिक आणि मानसिकद़ृष्ट्या खचली आहे. फसवणूक झालेल्या तरुणांचा आकडा सध्या 25 असला, तरी हा आकडा कित्येक पटींनी मोठा असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पीडित तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि पोलिस यंत्रणा या आंतरराज्यीय फसवणुकीच्या मुळाशी जाणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
अशी आहे फसवणुकीची पद्धत : तरुणांच्या भावना आणि महत्त्वाकांक्षांचा फायदा घेत या भामट्याने एक अत्यंत सुनियोजित आणि कायदेशीर भासणारी पद्धत वापरली आहे.
डिजिटल मोहजाल : इन्स्टाग्राम, फेसबुकवर स्वतःला एका जागतिक ई-कॉमर्स कंपनीचा तज्ज्ञ भासवून व्यावसायिक प्रशिक्षणाच्या जाहिराती दिल्या जातात. विश्वासार्हतेसाठी नामांकित वृत्तपत्रांमध्ये जाहिरातवजा लेख प्रसिद्ध करून तरुणांना आकर्षित केले जाते. प्रवेश शुल्क : जाहिरातीला भुलून जे तरुण संपर्क साधतात, त्यांना विद्यार्थी संबोधून सुरुवातीलाच प्रत्येकी 50 हजार रुपये शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली उकळले जातात. नावीन्यपूर्ण उत्पादनाचे आमिष : यानंतर, जगात कोठेही उपलब्ध नसलेले एक नावीन्यपूर्ण उत्पादन विकायला देऊन त्यातून मोठा नफा कमावण्याचे चित्र रंगवले जाते. यासाठी कायदेशीर करारही केले जातात. करारामधील खेळी : उत्पादनाची आकर्षक गुणवैशिष्ट्ये व्हॉटस्अॅपवर पाठवली जातात; पण करारात मात्र त्यांचा उल्लेख खुबीने टाळला जातो. हीच या फसवणुकीतील मुख्य खेळी आहे. प्रत्यक्षात मिळते भंगार : चीनमधून कवडीमोल दराने आयात केलेल्या वस्तू भरमसाट किमतीला या तरुणांच्या माथी मारल्या जातात. प्रत्यक्षात वस्तू हातात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पैसे वसूल झालेले असतात आणि त्यानंतर सुरू होतो धमक्यांचा खेळ.
स्वप्ने भंगलेली, कुटुंब उद्ध्वस्त :
या भामट्याच्या जाळ्यात अडकलेले तरुण मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. अनेकांनी कर्ज काढून, तर काहींनी घरातील सोने-नाणे विकून या मेंटॉरला पैसे दिले आहेत. आता फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पीडित तरुण जेव्हा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधतात, तेव्हा हे प्रकरण दिवाणी असल्याचे सांगून फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा उद्विग्न सवाल हे तरुण विचारत आहेत.