

घोटी (नाशिक): इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क चाकू, पत्त्याचे कॅट, कंडोम आणि सायकलच्या चेन अशा आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे विद्यार्थी इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील असल्याचेही समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने शाळेतील शिक्षकांकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून शिक्षकांकडून अचानक विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी केली असता इयत्ता आठवी, नववी व दहावीतील काही विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये या आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. त्यामुळे शिक्षकही आवाक झाले आहेत. विद्यार्थ्यांकडून या वस्तू कशासाठी दप्तरात बाळगल्या गेल्या जाण्याचे कारण मात्र समोर आलेले नाही. या बाबत शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांकडून अशा आक्षेपार्ह वस्तू बाळगल्या जात असल्याने पालकांसह सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी याच शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी चित्र-विचित्र हेअरस्टाईल करण्याचा ट्रेड आणला होता. वारंवार सांगूनही काही विद्यार्थी ऐकत नसल्याने अखेर शिक्षकांनीच शाळेत अशा विद्यार्थ्यांचे केस कापून चित्र-विचित्र हेअरस्टाइलला पायबंद घातला होता. त्यानंतर आता थेट दप्तरात आक्षेपार्ह वस्तू आढळल्याने शिक्षकही चक्रावून गेले आहेत.
या घटनेबाबत संबंधित शाळेशी संपर्क साधून माहिती घेतली असता विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी अचानकपणे दप्तर तपासणी केली जाते. यात गेल्या काही वर्षांत अनेक वस्तू आढळल्या आहेत. आता नवीन काहीही आढळलेले नसल्याचा खुलासा शाळेकडून करण्यात आला आहे.