

पंचवटी (नाशिक) : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.१७) आडगाव शिवार परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाने सोशल मीडियातून बंदचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत परिसरातील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती.
सरपंच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या ही निंदनीय घटना असून, या घटनेचे आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. मराठा समाजकडून सोमवारी रात्री बंद पुकारण्याचे ठरविण्यात आले. तसेच काही समाज बांधवांनी सकाळी परिसरात फेरी मारून सुरू असलेल्या दुकानात जाऊन त्यांना बंदचा हेतू सांगताच व्यावसायिकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत शांततेत बंद पाळला. आडगाव गावठाण, आडगावातील मेनरोड, जत्रा चौक परिसर, कोणार्क नगर, वैद्यकीय महाविद्यालय, आडगाव फाटा, धात्रक फाटा, नांदूर रोड, स्वामी समर्थ नगर, वृंदावन नगर आदी परिरातील दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.