Actor Arrested Case | ड्रग्ज इन बॉलीवूड...

Actor Arrested Case |
Actor Arrested Case | ड्रग्ज इन बॉलीवूड...
Published on
Updated on

नरेंद्र राठोड, ठाणे

बॉलीवूड आणि ड्रग्ज यांचा संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मुंबई व ठाणे पोलिसांनी केलेल्या अनेक बड्या कारवायांमध्ये बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शन वेळोवेळी उघड झाले आहे. अभिनेता रोहुल्लाह मेहदीला मीरा भाईंदर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. त्याच्याकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे २८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा बॉलीवूड अन्‌ ड्रग्जचे कनेक्शन समोर आले आहे.

बॉलीवूड आणि ड्रग्ज याचा संबंध फार जुना आहे. ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या इफेड्रीन ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीचा असलेला सहभाग असो वा ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी पकडलेल्या एलएसडी पेपर ड्रग्ज प्रकरणात टीव्ही अभिनेत्रींचे आढळून आलेले कनेक्शन असो, या साऱ्याच घटनांमधून ड्रग्ज हा प्रकार बॉलीवूडमध्ये किती खोलात रुजलेला आहे, हेच स्पष्ट झाले आहे. अनेक बड्या सेलिब्रिटीजच्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अनेकवेळा मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज आणि बॉलीवूड यांना जोडणारा दुवा म्हणजे बॉलीवूडमधील लेट नाईट चालणाऱ्या पार्ट्या!

बॉलीवूडमध्ये नवीन टॅलेंटचा शोध घेणे असो किंवा फिल्मी जगात काम मिळवणे असो, या सगळ्या बाबी जुळून येतात त्या म्हणजे बॉलीवूडच्या लेट नाईट पार्ट्यांमध्ये. बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी आणि येथे टिकून राहण्यासाठी पार्टी कल्चरशी या क्षेत्रात येणाऱ्यांना जुळवून घ्यावेच लागते. त्यामुळे गेल्या दोन दशकांत अशा बॉलीवूड पार्टी कल्चरला फिल्मी जगात अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. साहजिकच या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा खुलेआम वापर केला जातो, हे वेगळे सांगायची गरज नाही. या पार्ट्यांमध्ये बडे बडे स्टारदेखील सर्रास नशा करतात.

परंतु, बड्या स्टार मंडळींना ड्रग्ज मिळवणे सहज शक्य नसते. त्यामुळे अशी बडी स्टार मंडळी ड्रग्ज मिळवण्यासाठी आपले मॅनेजर व इतर स्टाफचा उपयोग करतात. काही स्ट्रगलर ॲक्टरदेखील बॉलीवूडला ड्रग्जचा पुरवठा करीत असतात. अशा ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या अनेक स्ट्रगलर ॲक्टरना बॉलीवूडमध्ये कामदेखील याच अटीवर दिले जाते की, ते ड्रग्जची व्यवस्था करतील. शुक्रवारी मीरा रोड येथे ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला अभिनेता रोहुल्लाह मेहदीदेखील असाच एक बॉलीवूडमधला ड्रग्ज सप्लायर असू शकतो, असा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास सुरू झाला आहे.

अशी होते तस्करी

बॉलीवूड पार्ट्या अथवा सेलिब्रिटीजपर्यंत पोहोचणाऱ्या ड्रग्जची अत्यंत गुप्तपणे तस्करी केली जाते. त्यासाठी अत्यंत हायटेक टेक्नॉलॉजी वापरून बनवलेल्या टॅब्लेट्स‌ असतात. ही टॅबलेट वरून हुबेहुब तापाच्या अथवा इतर कोणत्याही आजारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या टॅबलेटसारखीच दिसतात. त्यामुळे या टॅबलेटची मेडिकल औषधांमध्ये लपवून तस्करी केली जाते; मात्र अलीकडे तस्करीचा हा प्रकारदेखील पोलिसांच्या नजरेत आल्याने एका पेपरवर ड्रग्ज साठवून त्यावर कार्टून चित्र बनवली जातात. यास एलएसडी पेपर अथवा पेपर बॉम्ब म्हणतात. गंधहीन आणि कार्टूनच्या स्टिकरवर असलेले हे ड्रग्ज सहजासहजी ओळखणे अत्यंत अवघड असते. त्यामुळे या पेपरची चव घेतल्याशिवाय ते ओळखणे जवळपास अशक्य आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खास हे ड्रग्ज डिझाईन करण्यात आले आहे. विशिष्ट प्रकारच्या पारदर्शक पेपरला को लाईक ॲसिडमध्ये भिजवून नंतर त्यास डाईएथाईलामाईंड नावाच्या केमिकलमध्ये कम्पोनेट करून ट्रान्सपरंट फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट केले जाते. या प्रक्रियेनंतर ही पेपरशीट ड्राय करून त्यावर कार्टूनचे स्टिकर लावले जातात. एकदा का हे पेपर मार्केटमध्ये पोहोचले की, त्यास पिंक सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन, आय-२५, प्रमोदम, टपरी अशा विविध कोडवर्डने संबोधले जातात. एका एलएसडी पेपरची किंमत १६५ डॉलर म्हणजेच सुमारे १२ हजार रुपयांपर्यंत असते. त्याव्यतिरिक्त गांजापासून ते कोकेनपर्यंतचा ड्रग्ज सप्लायदेखील बॉलीवूडमध्ये होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news