

धुळे : धुळे सह राज्यातील इतर जिल्ह्यातही गुन्हेगारी कृत्याने हैदोस घालणाऱ्या टोळी विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्हे संदर्भात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कुविख्यात गुंड सत्तार मेंटल सह त्याच्या टोळीतील पाच गुन्हेगारांविरुध्द ही करण्यात आली कारवाई करण्यात आली आहे.
समाजविघातक संघटना किंवा टोळी यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अन्वये कार्यवाही करणे बाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, दत्तात्रय कराळे यांनी आदेशित केले असून धुळे जिल्हयातील इतरही गुन्हेगारी टोळया पोलीसांच्या रडारवर आहेत.
धुळे शहरातील मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयाचा तपास सुरु असतांना पोलीस अभिलेखावरील आरोपी तथा संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख आरोपी सत्तार मासुम पिंजारी ऊर्फ सत्तार मेंटल व त्याचे नेतृत्वाखालील संघटीत गुन्हेगारी संघटनेचे सक्रीय सदस्य आरोपी सोहेल मेहमुद शेख, अज्जू कादर मनिवार शाहरुख शेख मुनीर ऊर्फ शाहरुख डीओ व नाजीम अब्दुल रहमान मलक ऊर्फ नाजीम कबुतर यांचा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे.
संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख व गुन्हेगारी संघटनेचे सदस्यांचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता त्यांनी संघटीत गुन्हेगारी संघटनेच्या वतीने संघटीतरित्या तर कधी संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख सदस्य म्हणून वेगवेगळ्या सदस्यांना सोबत घेवून मागील 10 वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे 19 गंभीर गुन्हे दाखल असून 17 गुन्हे हे तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले गुन्हे आहेत. त्यापैकी 12 गुन्ह्यांमध्ये संबंधीत कार्यक्षेत्राच्या विद्यमान न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेले आहेत.
त्यामुळे गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख सत्तार मासुम पिंजारी ऊर्फ सत्तार मेंटल व इतर सदस्य यांच्या गुन्हेगारी वर्तनावर नियंत्रण ठेवणे व त्यांचे समूळ उच्चाटन करण्या करीता सार्वत्रिक हिताच्या दृष्टीने निकडीचे झाले होते. यासाठी मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची पूर्व परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मोहाडीनगर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हयास मोक्का कायद्यान्वयेचे वाढीव कलम लावण्याची परवानगी दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे.
आरोपी सत्तार मासुम पिंजारी ऊर्फ सत्तार मेंटल वाचेविरुध्द खुन करणे, गंभीर दुखापत करुन दरोडा टाकणे, गंभीर दुखापत करुन जबरीचोरी करणे, जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय नोकरावर हल्ला करणे, विनयभंग करणे, राहते घरात चोरी करणे, रात्रीच्या वेळी घरफोडी करणे, बेकायदेशिर जमावाचा सभासद होवून गुन्हा करणे, खंडणी मागणे, दंगा करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे एकुण 43 गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, स्वानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटोल, उपनिरीक्षक चेतन मुंडे, पोउनि संदीप काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीष जाधव, संतोष हिरे, प्रशांत चौधरी व हर्षल चौधरी यांनी केली आहे.