

धुळे : धुळे शहरात वाहतूक नियम तोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर मोठी कारवाई करण्यात आली असून 388 वाहनचालकांकडून एकूण 2 लाख 69 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 10 जणांच्या वाहन परवाना (लायसन्स) निलंबनासाठी प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात बुलेटला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसविणे, ट्रिपल सीट प्रवास, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, विनालायसन्स वाहन चालवणे असे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषी माता चौक, बारापत्थर, पंचवटी, दत्तमंदिर चौक, देवपूर, लोकमान्य हॉस्पिटल आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.
कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवणाऱ्या 40 बुलेटचालकांकडून 37,000 रुपये दंड,
51 बुलेट स्वारांचे सायलेन्सर जप्त.
फॅन्सी नंबर प्लेट (जसे की ‘दादा’, ‘मामा’ इ.) वापरणाऱ्या 291 वाहनचालकांकडून 1,75,500 रुपये दंड.
प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या 5 जणांवर 5,000 रुपये दंड.
चालत्या दुचाकीवर मोबाईलवर बोलणाऱ्या 52 चालकांकडून प्रत्येकी 1,000 रुपये याप्रमाणे एकूण 52,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेद्वारे एकूण 388 नियमभंग प्रकरणांमध्ये 2,69,500 रुपये दंड वसूल करण्यात आला असून, 10 चालकांचे वाहतूक परवाना लायसन्स निलंबनासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवले आहेत. वाहनधारकांनी मोटार वाहन कायद्याचे पालन करावे, अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.