Accident Alert Cyber ​​Scam | अपघाताचा फोन आणि खातं रिकामं

Accident Alert Cyber ​​Scam
Accident Alert Cyber ​​Scam | अपघाताचा फोन आणि खातं रिकामं
Published on
Updated on

आशिष शिंदे, कोल्हापूर

अ‍ॅक्सिडेंट अलर्ट स्कॅम

दुपारी ऑफिसमधून बाहेर पडताना आदित्यचा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. समोरून घाईतला आवाज आला. तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा मोठा अपघात झाला आहे. गंभीर अवस्था आहे. फोटो पाठवतो लगेच बघा. इतके बोलून कॉल कट झाला. आदित्यची छाती दडपली गेली. कोणाचा अपघात? कुठे? काही विचार करण्याआधीच व्हॉटस्अ‍ॅपवर एक फाईल आली. नाव होते ‘अ‍ॅक्सिडेंट इमेज जेपीईजी.’

भीती आणि गोंधळात त्याने फाईल उघडली. स्क्रीनवर काही सेकंद स्कॅनर चालल्यासारखे दिसले. काहीच स्पष्ट फोटो नव्हता. आदित्यला संशय आला. त्याने लगेच फाईल डिलिट केली आणि मोबाईल बंद केला. काहीतरी गडबड आहे, असे म्हणत तो घरी पोहोचला. त्याला वाटले धोका टळला; पण सायंकाळी खरी धक्कादायक गोष्ट समोर आली. एटीएममधून पैसे काढायला गेल्यावर व्यवहार नाकारला गेला. खात्याची चौकशी केली असता त्याला धक्काच बसला. खात्यातून एकामागोमाग एक व्यवहार झाले होते. तब्बल पंचेचाळीस हजार रुपये आधीच गायब झाले होते. ना ओटीपी आला होता, ना त्याने कुणाला माहिती दिली होती.

अपघाताच्या फोटोच्या नावाखाली आलेली ती फाईल प्रत्यक्षात घातक सॉफ्टवेअर होते. ते उघडताच आदित्यच्या मोबाईलमध्ये हाईड झाले. मोबाईलवरील परवानग्यांचा गैरवापर करून सॉफ्टवेअरने बँकिंग अ‍ॅप्सवर नजर ठेवली आणि काही तासांतच ऑनलाईन व्यवहार करून पैसे काढले. आदित्यने फाईल डिलिट केली, फोन बंद केला, तरी तोपर्यंत सायबर चोरट्यांनी आपले काम उरकले होते.

हा अपघात अलर्ट सायबर स्कॅम भीती आणि घाई यांचा वापर करून रचला जातो. सायबर चोरटे आधी अनोळखी नंबरवरून फोन करून तुमच्या जवळच्या व्यक्तीचा अपघात झाला आहे, अशी धक्कादायक माहिती देतात आणि लगेच फोटो पाठवतो, असे सांगून कॉल कट करतात. काही क्षणात व्हॉटस्अ‍ॅपवर फोटो किंवा डॉक्युमेंटसारखी दिसणारी फाईल पाठवली जाते; ही फाईल प्रत्यक्षात घातक सॉफ्टवेअर असते. ती फाईल उघडताच मोबाईलमध्ये लपून बसते आणि वापरकर्त्याच्या नकळत बँकिंग अ‍ॅप्स, संदेश आणि व्यवहारांवर नजर ठेवते. यामध्ये ओटीपी, पिन किंवा पासवर्ड देण्याची गरजच पडत नाही. यापासून वाचण्यासाठी अपघात, रुग्णालय किंवा पोलिसांच्या नावाने आलेले अनोळखी कॉल व फाईल्सवर कधीही विश्वास ठेवू नका, कोणतीही फाईल उघडण्याआधी तिची खात्री करा, मोबाईलमध्ये अनावश्यक परवानग्या देऊ नका, संशयास्पद फाईल आली असल्यास ती उघडू नका आणि त्वरित बँकेला व 1930 या सायबर गुन्हे हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news