Crime Diary : शंभराची नोट! सखुबाईंनी ‘असा’ उघड केला बनावट नोटांचा काळाबाजार | पुढारी

Crime Diary : शंभराची नोट! सखुबाईंनी 'असा' उघड केला बनावट नोटांचा काळाबाजार

गौरव अहिरे, नाशिक

उंबरठाण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव. तालुक्यातील व्यापारी आपापला माल घेऊन बाजारात येत असत. सखुबाईचा भाजीपाल्याचा व्यापार होता. सखुबाई या नेहमीप्रमाणे आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आल्या. अनेक वर्षांपासून त्या भाजीपाला विक्री करून स्वत:सह कुटुंबयांचा उदरनिर्वाह करीत होत्या. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी सामाजिक अनुभवांनी त्या समृद्ध होत्या. नेहमीप्रमाणे आठवडी बाजारात त्यांनी स्टॉल मांडला होता. ( Crime Diary )

दुपारी बाराच्या सुमारास बाजारातील गर्दी वाढत असतानाच त्यांच्यासमोर दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी सखुबाईकडून 10 रुपयांचा लसूण खरेदी केला आणि 100 रुपयांची नोट दिली. सखुबाईंनी लसूण व 90 रुपये परत केले. मात्र खूप दिवसांनी बाजारात बाहेरगावची सुटा-बुटातील लोक खरेदीसाठी आल्याने त्यांच्यात या सूट-बूट वाल्यांबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यांनी दोघांकडे निरखून पाहण्यास सुरुवात केली. हे दोघेजण वेगवेगळ्या व्यापार्‍यांकडून कांदा, भाजीपाला असा वेगवेगळा माल खरेदी करीत होते, मात्र प्रत्येक व्यापार्‍याकडे त्यांनी 100 रुपयांचीच नोट दिली. इनमीन दहा रुपयांची खरेदी करून ही लोकं शंभराची नोट का देताहेत म्हणून सखुबाईला थोडे आश्चर्य तर वाटलेच, पण काहीसा संशयही वाटू लागला.

त्यामुळे सखुबाईंनी त्या दोघांनी त्यांच्याकडे दिलेली 100 रुपयांची नोट कुतूहलापोटी निरखून पाहिली. त्यांना ती वेगळी वाटल्याने त्यांनी इतर विक्रेत्यांकडे आपली नोट दाखवत त्यांच्याकडीलही नोट तपासली. इतरांनाही त्या दोघांनी दिलेल्या नोटांमध्ये खोट वाटल्याने एक एक करीत सगळे व्यापारी गोळा झाले आणि त्यांनी त्या दोघांना घेरले. दोघांकडे चौकशी करीत असतानाच त्या दोघांनी विक्रेत्यांना दिलेली 100 रुपयांची नोट बनावट असल्याचे समजले. त्यामुळे व्यापार्‍यांनी त्या दोघांकडे बनावट नोटांबाबत जाब विचारला. त्यावर दोघांपैकी एक गांगरला आणि त्याची बोबडी वळली आणि नुसताच तत-फफ करू लागला. त्यामुळे विक्रेत्यांचा संशय आणखीनच बळावला आणि व्यापार्‍यांनी त्या दोघांना पकडून ठेवून तातडीने सुरगाणा पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली.

सुरगणा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्यावेळी दोघांकडे बनावट नोटा आढळून आल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सखोल तपास केला. त्यावेळी दोघांनी या नोटा विंचुर येथून भेटल्याचे सांगितले. पोलिसांनी विंचुर येथे कारवाई करीत एकास पकडले. त्याची स्वत:ची प्रिंटिंग प्रेस असल्याचे उघड झाले. या प्रिंटिंग प्रेसमधून पोलिसांना 100 रुपयांच्या एका बाजूने छापलेल्या नोटा सापडल्या.

याप्रकरणी एकूण सात जणांची धरपकड करीत त्यांच्याकडून 100 रुपयांच्या 194 व 500 रुपयांची एक अशा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. बनावट नोटा छापल्यानंतर त्या नोटांचा वापर आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी करून नोटा चलनात आणण्याचा डाव संशयितांनी रचला होता; मात्र सखुबाईंची चाणाक्ष नजर व अनुभवामुळे त्यांचा हा डाव उघड झाला होता. ( Crime Diary)

Back to top button