Sambhajinagar News | संवादाची दरी अन्‌ तणावाचा डोंगर !

क्षणाच्या रागापायी संपले चांदगुडे कुटुंब
Sambhajinagar News |
Sambhajinagar News | संवादाची दरी अन्‌ तणावाचा डोंगर !
Published on
Updated on

प्रमोद अडसुळे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरकरांच्या मनावर कायमचा ओरखडा उमटवणारी घटना नुकतीच खवड्या डोंगरावर घडली. केवळ १८ वर्षांचा तरुण, त्याला वाचवायला धावलेला बाप आणि डोळ्यांदेखत आपला संसार संपल्याचे पाहून थेट मृत्यूच्या दरीत झोकून देणारी जन्मदात्री! चांदगुडे कुटुंबाच्या या सामूहिक आणि करुण मृत्यूने समाजासमोर अनेक अस्वस्थ करणारे वास्तव प्रश्न उभे केले आहेत.

'नीट'ची तयारी करणारा कुणाल हा कुटुंबाचा एकुलता एक आधार होता. आठ वर्षांपूर्वी मोठ्या मुलाच्या निधनाचे दुःख पचवून हे कुटुंब कसेबसे सावरले होते; मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या घरात संवादाची दरी निर्माण झाली आणि दिवसेंदिवस तणावाचा डोंगर वाढत गेला. सध्या समाजमाध्यमांवर कुणालच्या 'आयफोन १५'च्या हट्टाची आणि ईएमआयच्या तणावाची जोरदार चर्चा आहे; मात्र पोलिसांनी यावर अत्यंत सावध भूमिका घेत स्पष्ट केले आहे की, केवळ मोबाईल हेच या टोकाच्या निर्णयामागचे कारण असू शकत नाही.

या घटनेला एक अत्यंत गडद आणि अस्वस्थ करणारी किनार आहे, ती म्हणजे कुणालची आई संगीता यांचे सोशल मीडियावरील व्हिडीओ. त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओंमध्ये कौटुंबिक वाद, संपत्तीचे तंटे आणि एका नातेवाईक महिलेच्या हस्तक्षेपाबद्दल उद्वेेग व्यक्त केला होता. आठ वर्षांपूर्वी गमावलेल्या मोठ्या मुलाचे दुःख आणि नातेवाईकांकडून मिळणारा त्रास यामुळे हे कुटुंब आतून पोखरले गेले होते का, हा खरा प्रश्न आहे. एका बाजूला मुलाचा मोबाईलचा हट्ट आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातील अंतर्गत कलह, या दुहेरी कात्रीत सापडलेल्या या कुटुंबाने नैराश्याच्या अंधाऱ्या गर्तेत स्वतःला ढकलले. नियतीचा क्रूर खेळ असा की, ज्या कुणालला वर्षभरापूर्वी याच कड्यावरून पोलिसांनी मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते, त्याच कड्यावर यावेळी मृत्यूने त्याला गाठले. सलग दोन तास मनधरणी करूनही 'आता दुसरं सोल्युशन नाही' म्हणत त्याने मृत्यूला कवटाळले. पोटच्या गोळ्याला वाचवण्याच्या झटापटीत बाप दरीत कोसळला आणि हे पाहून उद्ध्वस्त झालेल्या आईनेही त्यांच्या पाठोपाठ दरीत उडी घेतली.. जिवंतपणी एकत्र असलेल्या या कुटुंबाची मरणानंतर मात्र ताटातूट झाली. वडिलांवर गावी, तर माय-लेकावर शहरात अंत्यसंस्कार झाले. आज कुणाल नाही, त्याचे आई-वडील नाहीत. मागे उरलाय तो फक्त खिडकीत बसून आपल्या मालकाची वाट पाहणारा आणि त्यांच्या आठवणीत रात्रभर भुंकणारा त्यांचा मुका पाळीव श्वान 'शेरू'! या मुक्या प्राण्याला आता कोण काय उत्तर देणार?

शुल्लक कारण; भयावह वास्तव!

खवड्या डोंगर आज 'सुसाईड पॉईंट' बनला आहे; पण खरी दरी आज माणसांच्या आणि नात्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्यात समस्यांचे डोंगर उभे राहत आहेत. आजच्या धावपळीच्या जगात घरातला संवाद हरवला आहे का? नात्यांमधला ताणतणाव वेळीच ओळखला नाही आणि घरातील घुसमट दूर केली नाही, तर क्षुल्लक वाटणारे कारणही संपूर्ण कुटुंबाला कसे गिळंकृत करू शकते, याचे हे भयावह उदाहरण आहे. माणसांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला नाही, तर 'शेरू'सारखे मुकेपण आणि एकटेपण समाजाच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही, हाच धडा या शोकांतिकेने दिला आहे.

घडलेली नेमकी घटना...

१. आत्महत्येचा प्रयत्न : कौटुंबिक वाद, घरातील तणाव आणि नैराश्यातून १८ वर्षीय कुणाल चांदगुडे हा शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास आत्महत्या करण्यासाठी तिसगाव येथील खवड्या डोंगराच्या २०० फूट उंच अगदी कड्यावर जाऊन उभा राहिला.

२. दोन तास मनधरणी : याची माहिती मिळताच कुणालचे वडील मुरलीधर, आई संगीता, एमआयडीसी वाळूज पोलिस आणि काही स्थानिकांनी डोंगरावर धाव घेतली. 'आईसाठी तरी जग, खाली ये...' असे म्हणत सर्वांनी सलग दोन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

३. मुलाला वाचवताना बाप-लेक दरीत कोसळले : कुणाल कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सव्वाबाराच्या सुमारास वडील मुरलीधर यांनी जीवाच्या आकांताने पुढे झेप घेतली आणि कड्यावर उभ्या असलेल्या कुणालला मागे ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र या झटापटीत कड्यावरून दोघांचाही तोल गेला आणि बाप-मुलगा सुमारे दोनशे फूट खोल खाणीत कोसळले.

४. धक्क्याने आईचीही दरीत उडी : आपल्या डोळ्यांदेखत नवरा आणि आपला एकुलता एक पोटचा गोळा दरीत पडल्याचे पाहून आई संगीता यांनी क्षणाचाही विचार न करता कुटुंबाच्या मागोमाग त्याच दरीत उडी मारली.

logo
Pudhari News
pudhari.news