हिंगोली: लोहरामध्ये 'मुन्नाभाई' पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लोहारा येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणार्या बोगस डॉक्टरला आरोग्य विभाग व पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी पकडले. केशव दत्ता धाडवे (रा. लोहारा) असे या मुन्नाभाई डॉक्टरचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तालुक्यातील दुर्गम भाग समजल्या जाणार्या लोहारा व लिंबी या चौरस्त्यावर केशव दत्ता धाडवे या बोगस डॉक्टरने दवाखाना थाटला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमाची कुठल्याही प्रकारची पदवी नसतानाही तो रुग्णांची तपासणी करू लागला होता. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारही करण्यात आली होती. दरम्यान शनिवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू सह पथकाने आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लिंबी लोहरा चौफुलीवर असलेल्या टीनशेडच्या दवाखान्यावर छापा टाकला.
अधिक वाचा : गाढ झोपलेल्या लहान भावाचा केला खून
यामध्ये त्या ठिकाणी केशव धाडवे हा रुग्णाची तपासणी करून आला होता. तर दोन रुग्ण प्रतीक्षेत होते. आरोग्य विभागाच्या पथकाने त्यास वैद्यकीय अभ्यासक्रमाची माहिती विचारली असता धाडवे याची बोबडीच वळली. त्याला कुठल्याही प्रकारची माहिती देता आली नाही. त्याच्या दवाखान्यात असलेले वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देखील बनावट असल्याचे दिसून आले. पोलिसांनी व आरोग्य विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन बासंबा पोलीस ठाण्यात आणले आहे.
अधिक वाचा :किती दिवसांत मान्सून संपूर्ण भारत व्यापतो?
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये केशव धाडवे हा हिंगोली येथील एका रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करत होता. त्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणार्या औषधांची माहिती झाल्यानंतर त्याने लिंबी लोहरा चौफुलीवर टीनशेड मध्ये दवाखाना थाटला.
मागील दोन वर्षापासून तो रुग्णांची तपासणी करत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. तर कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याने अनेक रुग्णांवर उपचार केल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. त्याच्या दवाखान्यात अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे औषधी आढळून आले आहे. सदर औषधीदेखील जप्त करण्यात आली आहे.
अधिक वाचा : पाऊस, एकच छत्री आणि बरच काही…
केशव दत्ता धाडवेला बासंबा पोलीस ठाण्यात आणले असून त्याची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे सापडलेल्या पदव्यांची चौकशी केली जाणार असून त्याने या पदव्या कशा प्राप्त केल्या याची माहितीही घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.