सत्यजित दुर्वेकर
कोकमच्या सालीपासून मोठ्या प्रमाणावर तयार केला जाणारा अमसूल हा पदार्थ आहे. रोजच्या जेवणात तसेच सोलकढी तयार करताना तो वापरला जातो. कोकमपासून अनेक प्रकारचे टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. कोकमचे फळे साधारणपणे एप्रिल – मे महिन्यात तयार होतात.
या फळामध्ये हायड्रॉक्सी सायट्रिक आम्ल मोठ्या प्रमाणात असते. तसेच विविध औषधी गुणधर्म असलेल्या या कोकमच्या फळांपासून कच्ची फळे, सुकविणे, कोकम सोल किंवा आमसूल, अमृत कोकम आणि कोकम अगळ असे विविध पदार्थ तयार करता येतात. नंतर हे पदार्थ हवे त्या वेळी आहारात उपयोगात आणता येतात.
आमसूल : (कोकम सोल)
आमसूल तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली, लाल, ताजी टणक अशी फळे निवडून घ्यावीत. ही फळे पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने कोरडे करून गर आणि साली वेगवेगळ्या ठेवाव्यात. बिया आणि गराच्या मिश्रणाचे वजन करून घ्यावे आणि त्यात दहा टक्के या प्रमाणात मीठ टाकावे.
मीठ आणि गर विरघळून त्याचे द्रावण तयार होईल, ते गाळून त्यातील बिया वेगळ्या कराव्यात. नंतर या द्रावणामध्ये कोकमच्या साली सुमारे दहा मिनिटे बुडवून नंतर 24 तास उन्हात सुकवाव्यात. याप्रमाणे चार ते पाच वेळा साली रसात बुडवाव्यात आणि सुकवाव्यात. नंतर या साली 50 ते 55 अंश से. तापमानात ड्रायरमध्ये किंवा उन्हामध्ये सुकवाव्या. अशाप्रकारे सुकलेल्या साली प्लास्टिकच्या पिशव्या हवाबंद करून कोरड्या आणि बंद जागेत साठवून ठेवाव्यात.