बागायती फळझाडांचे पाणी व्यवस्थापन | पुढारी

बागायती फळझाडांचे पाणी व्यवस्थापन

फळझाडांची लागवड प्रामुख्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार, फळझाडांचा प्रकार, स्थानिक हवामान आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. याशिवाय फळझाडांची पाण्याची गरज इतर पिकांच्या मानाने वेगळी असते. त्यामध्ये फळझाडांच्या लागवडीचे अंतर, लागवडीची पद्धती, जमिनीचा उंच सखलपणा, आंतरपीक, वळण देण्याची पद्धत, छाटणीची पद्धत, वरखते, इतर बागेचे व्यवस्थापन आणि वारा प्रतिबंधक लावलेली झाडे या बाबींचा समावेश होतो. शिवाय प्रत्येक झाडाला त्याच्या आयुष्यात किती पाण्याची गरज आहे. हे सुद्धा आपण शास्त्रीयद‍ृष्ट्या शोधून काढले आहे. त्याकरिता जमीन आणि जमिनीतील पाणी यांचा परस्पर संबंधांचा अभ्यास करून पिकाला किती अवधीनंतर आणि किती पाणी द्यावे हे ठरविता येते. प्रत्येक झाडाला पाण्याची गरज वेगवेगळी असते.

फळझाडांचे दोन मूलभूत प्रकार आहेत, पहिला प्रकार म्हणजे सदाहरित आणि दुसरा म्हणजे पानगळ होणारे. सदाहरित फळझाडांमध्ये आंबा, केळी, चिकू, द्राक्षे, पपई ही फळझाडे आहेत. त्यांना नियमित पाणी द्यावे लागते, तर पानगळ होणार्‍या फळझाडांमध्ये पानगळ झाल्यानंतर ही फळझाडे तीन ते चार महिने सुप्‍तावस्थेत राहतात. या काळात त्यांची पाण्याची गरज फारच कमी असते. या फळझाडांना पानगळ होऊन विश्रांती देण्यासाठी आणि एकाच हंगामात बहर येण्यासाठी, बहर धरण्यापूर्वी दोन महिने पाणी तोडून ताण द्यावा. यामध्ये पेरू, डाळिंब आणि मोसंबी ही फळझाडे येतात.

फळझाडांना पाणी देण्यासाठी आळे पद्धत, सरी पद्धत, तुषार सिंचन किंवा ठिंबक सिंचन पद्धत आणि मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये प्लास्टिक नळीच्या साहाय्याने पिकाच्या मुळाजवळ झाडांच्या गरजेपुरते पाणी देता येतेे. पाणी थेंबाथेंबाने दिल्यामुळे सतत ओलावा राहत असल्यामुळे पाण्याची बचत 50 ते 60 टक्के होते. शिवाय उत्पादनात 30 टक्के वाढ होते. तुषार सिंचन पद्धती ही उंच-सखल जमीन जी समपातळीत आणणे अवघड आहे अशा क्षेत्रात ही पद्धत वापरणे फायद्याचे असते. या पद्धतीत नेहमीच्या पद्धतीपेक्षा 25 ते 30 टक्के पाण्याची बचत होते. अशा पद्धतीने आपणास फळबागायतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन करून उत्पादन वाढविता येईल.

– डॉ. दत्तात्रय पाचारणे

Back to top button