आडसाली ऊस पिकातील हुमणी किडीचे नियंत्रण कसे करावे? | पुढारी

आडसाली ऊस पिकातील हुमणी किडीचे नियंत्रण कसे करावे?

भारतामध्ये महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनासाठी अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. उसाचे उत्पादन राज्यात घटत चालले आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे ऊस पिकावर आढळणारे रोग व किडी. ऊस पिकावर आढळणार्‍या प्रमुख किडी म्हणजे खोडकीड, हुमणी, लोकरीमावा, लष्करी अळी, खवले कीड, कांडी कीड, पांढरी माशी इ. सद्य परिस्थितीत हवामानातील बदलामुळे व सिंचनासाठी उपलब्ध पाण्याची मर्यादा यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

राज्यात मागील 3-4 वर्षांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये वाढलेला दिसतो. भारतामध्ये हुमणीच्या 300 प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी प्रामुख्याने दोन प्रजाती राज्यात आढळतात. ल्युकोलिलीस लेपिडोफोरा व होलोट्रकिया सेराटा तसेच नवीन दोन प्रकारच्या (फायलोग्याथस आणि अ‍ॅटोरेटस) हुमणीच्या प्रजाती आढळून आलेल्या आहेत. होलोट्रॅकिया सेराटा या हुमणीच्या प्रजातीपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे हलक्या जमिनीत उसाच्या उगवणीत 40 टक्केपर्यंत नुकसान होते. तसेच ऊस उत्पादनात 15 ते 20 टनापर्यंत नुकसान होते. यामुळे हुमणी किडीचा बंदोबस्त योग्यवेळी (मे-ऑगस्ट) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर केला जातो. या रासायनिक औषधांचे पर्यावरण व आरोग्यविषयक दुष्परिणाम आपणा सर्वांना ज्ञात आहेत. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी कीड नियंत्रकाच्या विविध जैविक पद्धतींचा विकास झाला आहे.

 नुकसानीचे स्वरूप ः

हुमणीची उपद्रवी जीवनक्रिया दोन भागांमध्ये आढळून येते. एक म्हणजे अळी-अवस्था जी जमिनीमध्ये आढळते. तसेच दुसरी भुंगा अवस्था झाडांवर आढळते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळीची पहिली अवस्था जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर तसेच मुळांवर देखील उपजीविका करते. दुसर्‍या व तिसर्‍या अवस्थेतील अळ्या जून-ऑक्टोबर महिन्यांत आढळतात व प्रामुख्याने उसाच्या मुळ्या खातात. उसाची मुळे खाल्ल्यामुळे अन्‍नद्रव्य व पाणी कमी पडते. ऊ स हळूहळू निस्तेज दिसायला लागतो व कालांतराने वाळक्या काठीसारखा दिसतो. एका वाळलेल्या उसाच्या बेटाखाली साधारणतः 10 ते 12 पर्यंत अळ्या सापडतात. एका उसाचे बेट एक अळी तीन महिन्यांत तर दोन किंवा जास्त अळ्या एका महिन्यात मुळ्या कुरतुडून कोरड्या करतात.

जमिनीखालील काड्यांनाही अळी उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त उसाला हलकासा झटका दिल्यास ऊ स सहजासहजी उपटून येतो. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास 100 टक्के पर्यंत नुकसान होते. हेक्टरी 25,000 ते 50,000 अळ्या आढळल्यास 15 ते 20 टनापर्यंत नुकसान होते. हुमणीची अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्यामुळे तसेच हा कालावधी जास्त दिवसांचा असल्यामुळे नुकसानीचे प्रमाण हे जास्त असते. आडसाली ऊ स पीक दोनवेळा हुमणीच्या प्रादुर्भावाला बळी पडते. भुंगा अवस्था- ही झाडांची पाने खातात. हुमणीग्रस्त शेतात पावसाळ्यात कडुनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय करावेत. आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ः एक हुमणीची अळी प्रतिएकर एक घनमीटर अंतरात आढळून आल्यास कीड नियंत्रण सुरू करावे.

हुमणी किडीचा जीवनक्रम ः


हुमणी किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थेत पूर्ण होतो. मान्सूनच्या पहिल्या सरीनंतर हुमणीचे प्रौढ भुंगेरे संध्याकाळच्या वेळी जमिनीतून कोषावस्थेतून बाहेर येतात आणि कडूनिंब, बाभूळ, बोर इ. झाडांची पाने खातात. नर- मादीचे मिलन झाल्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घालण्याचा कालावधी जूनच्या मध्यास म्हणजेच पावसाळा सुरू होताच असतो. साधारणपणे एक मादी 50 ते 60 अंडी घालते. प्रथम अंडे मटकीच्या किंवा ज्वारीच्या आकाराचे दुधी पांढरे असते. त्यानंतर ते तांबूस व गोलाकार होते. अळीची पहिली अवस्था 25-30 दिवस, दुसरी अवस्था 30 ते 45 दिवस व तिसरी अवस्था 140-145 दिवस असते. तिसर्‍या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत खोल जाऊ न मातीची गादी करते व त्यामध्ये ती कोषावस्थेमध्ये जाते. अशा पद्धतीने एक पिढी पूर्ण होण्याकरिता एक वर्षाचा कालावधी लागतो.

 हुमणीच्या नियंत्रणासाठी जीवनाक्रमानुसार उपाययोजना ः

मे ते जुलै – प्रौढावस्था नियंत्रण कसे करावे. प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात व बांधावरील यजमान झाडांची पाने खातात. रात्रीच्या वेळी प्रकाश सापळे लावून भुंगेरे आकर्षित करावे. संध्याकाळी व रात्री या झाडांच्या फांद्या जोरात हलवून प्रौढ भुंगेरे खाली पाडावेत. ते गोळा करून केरोसीन व कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावेत. हे काम सामुदायिकरीत्या केल्यास अधिक फायदेशीर ठरते.

अंडी -अळीचे नियंत्रण :

– उन्हाळ्यात खोल नांगरट केल्यास किडींची अंडी, अळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे नष्ट होतात.
– शेणखत व कंपोस्ट खत आदींद्वारे हुमणीची अंडी व अळ्यांचे शेतात प्रसरण होते. रासायनिक पद्धतीने त्यांचे नियंत्रण करता येते. त्यासाठी एक गाडी खतात एक किलो 3 जी कार्बोफ्युरॉन दाणेदार मिसळावे व नंतर शेतात टाकावे.
– अळी अवस्थेतेच्या नियंत्रणासाठी शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर केला जातो. या रासायनिक औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कीड नियंत्रणाच्या विविध जैविक पद्धतींचा विकास झाला आहे. त्यामध्ये किडींवर पोसणार्‍या अथवा नैसर्गिक शत्रूंचा वापर, कामगंध सापळ्यांचा वापर तसेच एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा समावेश होतो.

 जैविक पद्धतीने हुमणी अळीचे नियंत्रण ः

यामध्ये प्रामुख्याने हुमणी किडीच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर केला जातो. हुमणीचे नैसर्गिक शत्रू- जीवाणू, बुरशी, सूत्रकृमी यांचा वापर किडींचा नायनाट करण्यासाठी केला जातो.

1) बुरशीचा वापर ः

बव्हेरिया बसियाना, मेटारायझियम अ‍ॅनिसोपली या बुरशींचा वापर हुमणी नियंत्रणासाठी केला जातो. या बुरशी किडींच्या शरीरात वाढतात त्यामुळे हुमणी कार्यहीन होऊन संपुष्टात येते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने जैविक कीड नियंत्रक विकसित केले असून त्यामध्ये बव्हेरिया बसियाना, मेटारायझियम अ‍ॅनिसोपली, व्हर्टिसिलियम लेकानी या बुरशींसह बॅसिलस थुरिनजेनेसिस या जीवाणूंचा समावेश आहे. हे जैविक कीड नियंत्रक म्हणजे हुमणीच्या अळी व भुंगेरे यावर वाढणार्‍या परोपजीवी बुरशींचा समूह असलेले द्रवरूप कीड नियंत्रक आहे. या जैविक कीड नियंत्रकाचा वापर एकरी 2 लिटर 400 लिटर पाण्यात मिसळून जमीन वाफशावर असताना बेटाजवळ आळवणी करावी. ही आळवणी साधारणपणे मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात व त्यानंतर जून किंवा जुलैमध्ये प्रत्येकी एकदा याप्रमाणे वापर केल्यास हुमणीचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.

2) परोपजीवी सूत्रकृमीचा वापर ः

एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड (ईपीएन) म्हणजे किडीच्या शरीरावर वाढणारे सूत्रकृमी. हुमणीला रोगग्रस्त करणारे सूत्रकृमी हेटेरोरॅबडिटीस व स्टईर्ननिमिटीडीस या दोन प्रकारचे आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने हुमणी नियंत्रणासाठी द्रवरूप स्वरूपातील ईपीएन हे जैविक कीड नियंत्रक विकसित केले आहे. हे जमिनीमध्ये आढळणारे सूत्रकृमी असून जमिनीमध्ये हुमणीला शोधून तिच्या शरीरात त्वचेवरील छिद्रांद्वारे किंवा तोंडाद्वारे प्रवेश करतात. किडीला रोगग्रस्त करून तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमध्ये दुसर्‍या हुमणीला शोधून तिला रोगग्रस्त करतात. ईपीएन या जैविक कीड नियंत्रकाचा वापर प्रतिएकर 1 लिटर 200 लिटर पाण्यात मिसळून जमीन वाफशावर असताना बेटाजवळ आळवणी पद्धतीने करावा. वापर केल्यानंतर जमिनीमध्ये वाफसास्थिती सतत ठेवल्यास चांगला परिणाम दिसून येतो. ईपीएन हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्याने त्याचा जमिनीतील उपयुक्त जीवाणू, वातावरण, पिकांवर तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. हुमणीचे नियंत्रण किडीचा जीवनक्रम लक्षात घेऊ न कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब सामुदायिक मोहीम राबवून केला तर प्रादुर्भाव आटोक्यात येतो.

– सौ. सुधा घोडके, सौ. क्रांती निगडे

Back to top button