खरीप मक्याची लागवड | पुढारी

खरीप मक्याची लागवड

जोराच्या वार्‍याने फळे पडणे, फांद्या तुटणे वा झाड कोलमडणे असे झाडाचे प्रत्यक्ष नुकसान होते आणि या व्यतिरिक्‍त आपल्या नजरेला न पडणारे अप्रत्यक्ष नुकसान वार्‍यापासून फळझाडांना होते. म्हणून फळबागांत वार्‍याचा वेग कमी करून होणारे नुकसान टाळण्यासाठी फळबाग लावण्यापूर्वी दोन वर्षे आधीच अशी वारासंरक्षकांच्या झाडांची ओळ लावतात. त्यानंतर ही वारासंरक्षक झाडांमुळे वार्‍याचा वेग कमी होऊन फळझाडांच्या पानांवाटे होणारे बाष्पीभवन कमी होते. वार्‍यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते. हिवाळ्यात थंडीच्या लाटेपासून फळांचे संरक्षण होते. वारासंरक्षक झाडे त्यांच्या उंचीच्या चारपट क्षेत्रातल्या झाडांना वार्‍यापासून संरक्षण देऊ शकतात. वारासंरक्षक म्हणून अशोक, सिल्वर ओक, शिसम, बांबू इत्यादी झाडे उपयोगी असतात.

भारतामध्ये भात आणि गहू पिकानंतर उत्पादकतेच्या बाबतीत मक्याचा तिसरा क्रमांक आहे. भारतामध्ये एकूण उत्पादनापैकी मानवी आहारात अन्‍नधान्य (20 टक्के), जनावरांसाठी खाद्य (14 टक्के) स्टार्च (12 टक्के), कोेंबडी खाद्य (47 टक्के), प्रक्रियायुक्‍त खाद्य (7 टक्के) म्हणून मक्याचा उपयोग होतो. मका हे तृणधान्य असे एकमेव पीक आहे की, ज्याचा त्याच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आहारामध्ये तसेच चार्‍यासाठी उपयोग होतो. पीक फुलोर्‍यात असताना बेबी कॉर्नसाठी, दुधाळ अवस्थेत हिरवी कणसे आणि पक्‍वतेनंतर धान्यासाठी उपयोग होतो. ज्वारीप्रमाणे मक्यामध्ये हायड्रोसायानिक अ‍ॅसिडसारखे अपायकारक द्रव्य नसल्याने मक्याचा चारा म्हणून वाढीच्या कोणत्याही अवस्थेत चांगला उपयोग होतो.

मका पीक हे उष्ण, समशीतोष्ण आणि शीत (थंड) अशा वेगवेगळ्या हवमानाशी समरस होण्याची क्षमता असणारे पीक आहे. पीकवाढीच्या कोणत्याही काळात धुक्याचे हवामान मक्यास मानवत नाही. मका उगवणीसाठी 10 सेल्सिअस तापमान योग्य, त्यापेक्षा कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसरपणामुळे उगवणीनंतर प्रतिकूल परिणाम होतो. मक्याच्या योग्य वाढीसाठी तसेच विकासासाठी 25-30 अंश सेल्सिअस तापमान चांगले. मका विविध प्रकारच्या जमिनीत घेता येतो. मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्‍त, उत्तम निचर्‍याची, सेंद्रिय पदार्थयुक्‍त आणि जलधारणाशक्‍ती असलेल्या जमिनीत हे पीक फार चांगले येते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा; परंतु अधिक आम्ल (सामू 4.5 पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्‍त (सामू 8.5 पेक्षा अधिक) जमिनीत मका घेऊ नये.

दलदलीची जमीनसुद्धा टाळावी. जमिनीच्या खोल नांगरटीमुळे पिकांची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी जमिनीत गाडले जातात आणि जमिनीस सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची खोल 15 ते 20 सें.मी) नांगरट करावी. कारण, खोल नांगरटीमुळे मका उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. पिकांची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीस सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जमिनीचा पोत सुधारतो. कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळव्याच्या पाळीच्या पूर्वी हेक्टरी 10-12 टन (25 ते 30 गाड्या) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.

मक्याच्या संमिश्र आणि संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60-80 टक्के अधिक उत्पन्‍न देतात. विविध कालावधीमध्ये पक्‍व होणार्‍या मक्याचे संमिश्र आणि संकरित वाण उपलब्ध असून जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणांची निवड करणे फारच महत्त्वाचे आहे. यासाठी मक्याचे सुधारित तसेच संकरित वाण उदा. करवीर, राजर्षी, फुले महर्षी, महाराजा, विवेक-9, महाबीज 1114 (उदय), बायो-9637 आणि इतर शिफारशीत वाणांची निवड करावी. खरीप हंगामात अधिक उत्पादनासाठी मक्याची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. खरिपातील पेरणीस उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य न राहिल्याने उत्पन्‍न घटते.

– मिलिंद सोलापूरकर

Back to top button