आंब्याच्या कोयीपासून बनवा दंतमंजन, जाणून घ्या माहिती | पुढारी

आंब्याच्या कोयीपासून बनवा दंतमंजन, जाणून घ्या माहिती

आंबा आवडत नाही, अशी व्यक्ती भारतात तरी आढळणार नाही. महाराष्ट्र आणि त्यातही कोकण म्हणजे आंब्याची खाण. उन्हाळ्याची चाहूल लागली की, जो तो आंब्याच्या आगमनाची वाट पाहू लागतो. आता बाजारात नाना प्रकारचे आंबे आहेत. त्यांच्या सुवासानेही मन सुखावते. आंबा आणि ग्राहक यांचे नाते हे असे अतूट आहे; पण आंब्याच्या कोयींचे पुढे काय होते, हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. आंब्याच्या कोयींचे अनेक उपयोग आहेत. त्यापैकी आंब्याच्या कोयीपासून दंतमंजन बनविण्याची माहिती जाणून घेणे औचित्याचे ठरेल.
भारतामध्ये आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

वापरलेल्या आंब्याच्या कोयींचा सध्या कुठलाच उपयोग होताना दिसत नाही. अशा कोयींपासून उत्तम प्रकारचे दंतमंजन बनवता येते. या दंतमंजनामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे दातांची आणि हिरड्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते. या गुणधर्मामुळे तोंडात रोज निर्माण होणार्‍या ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते. दंतमंजन बनवण्यासाठी ताजा आंबा घेऊन जास्तीत जास्त गर काढून घ्यावा. त्याचा खाण्यासाठी किंवा इतर प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी उपयोग करावा. गर काढल्यानंतर आंब्याची कोय पाण्याखाली व्यवस्थित घासून आणि धुवून घ्यावी. कोयीवरील तंतू काढून कोय चाकूच्या किंवा इतर साहित्याने उघडून आतील बी बाहेर काढावी. कोयीच्या आतील बी सावलीत साधारणपणे एक आठवडा वाळविण्यास ठेवावी. बी पूर्णपणे वाळल्यावर त्याचा रंग बदलतो आणि कशावर तरी आपटल्यास त्यातून विशिष्ट आवाज येतो.

वाळलेल्या बीपासून मशिनच्या सहाय्याने बारीक पावडर करावी. ही पावडर काचेच्या बरण्यात भरावी. या पावडरच्या सहाय्याने दात घासावेत. काहींना टूथब्रशच्या सहाय्याने दात घासण्याची सवय असल्यास तळहातावर किंचित पाणी घेऊन त्यावर ही पावडर टाकावी आणि पेस्ट तयार करावी. हीच पेस्ट दात घासण्यासाटी टूथपेस्ट म्हणून वापरता येते. या पावडरची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यात तेवढ्याच प्रमाणात नीम पावडर, अल्पशा प्रमाणात बेकिंग सोडा आणि हळदीचे मिश्रण करता येते. आंब्याच्या कोयी गोळा करून त्यातील कोयीतून बी वेगळी करून नंतर त्यापासून दंतमंजन बनविण्याचा उद्योग सुरूकरता येतो. हे शक्य नसल्यास दंतमंजन बनविणार्‍या कंपन्यांशी करार करून त्यांना आंब्याच्या कोयी किंवा त्यांच्यापासून बनविलेली पावडर पुरविता येऊ शकते.

Back to top button