व्हर्टिकल फार्मिंगची गरज | पुढारी

पाश्चात्त्य देशांत लोकप्रिय ठरलेली ही शेतीची पद्धत भारताकडे रुळायला वेळ लागेल. कारण, तेवढे तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचवेळी पारंपरिक शेतीत अडकलेल्या शेतकर्‍याला व्हर्टिकल फार्मिंगचे प्रशिक्षणही द्यावे लागेल. तसे पाहिले तर कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास व्हर्टिकल फार्मिंग महत्त्वाचे ठरत आहे. 

संयुक्त राष्ट्र संघाची खाद्य आणि कृषी संघटना (एफएओ) च्या अंदाजानुसार, 1970 च्या तुलनेत जगात प्रतिव्यक्तीची कृषीयोग्य जमिनीची उपलब्धता 2050 पर्यंत कमी होऊन ती एक तृतीयांश इतकीच राहील. एफएओचा अंदाज लक्षात घेता भारतासह जगभरातील सर्व शास्त्रज्ञांनी व्हर्टिकल फार्मिंगची व्यवहारिकता पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. व्हर्टिकल फार्मिंग ही पर्यावरण अनुकूल आहे, त्याचबरोबर पाणी आणि मातीची गरजदेखील तुलनेने कमी लागते. व्हर्टिकल फार्मिंगचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेता माहिती-तंत्रज्ञान, अंदाज आणि आकलन परिषद (टीआयएफएसी) ही व्हर्टिकल फार्मिंगचे आव्हाने आणि शक्यतांवर कार्यशाळा आयोजित करत आहे. 

व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय?

हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून एकाच ठिकाणी अनेक थर तयार केले जातात. या तंत्रात पोषक तत्त्वापासून समृद्ध पाणी (हायड्रोपॉनिकली) आणि पोषक तत्त्वांपासून समृद्ध हवा (एअरोपॉनिकली) यांच्या मदतीने शेती केली जाते. पिकांना सूयर्र्प्रकाश काचेच्या खिडकीतून किंवा एलईडीसारख्या कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून दिला जातो. अमेरिका, जपान, सिंगापूर, चीनसारख्या देशांनी या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. 

पोषक तत्त्वांची मुबलकता : 

टेक्नॉलॉजी इन्फर्मेशन, फॉरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलशी (टीआयएफएसी) निगडित एका ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते, व्हर्टिकल फार्मिंग पारंपरिक शेतीचे महत्त्व कमी करू शकत नाही. मात्र, ती पर्यावरण अनुकूल आहे आणि सध्याच्या काळात ती गरज म्हणून त्याकडे पाहता येईल. त्यात तांत्रिक प्रयोगांच्या शक्यतांवर काम करण्याची गरज आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि शहरी भागातील नागरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा र्‍हास भरून काढण्यासाठी व्हर्टिकल फार्मिंग महत्त्वाची कामगिरी करू शकते. टीआयएफएसीच्या वतीने कार्यशाळा आयोजित केली जात असून, त्यात व्हर्टिकल फार्मिंगच्या आव्हांनाचा आणि शक्यतांवर विचार करून त्यासंदर्भात रोडमॅप तयार केला जाणार आहे. या माध्यमातून होणार्‍या उत्पादनाच्या पोषण मूल्यांसंदर्भात  विचारमंथन केले जाणार आहे. 

शेतजमिनीत होतेय घट

कृषी शास्त्रज्ञांच्या मते, भारतात दरवर्षी सरासरी 30 हजार हेक्टर कृषी भूमीत घट होत आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांकडे कृषी भूमीची उपलब्धतादेखील कमी होत आहे. देशात 35 टक्के शेतकरी कुटुंबांकडे एक ते अडीच एकर, तर 30 टक्के कुटुंबांकडे अडीच एकरपेक्षा अधिक जमीन नाही.एवढेच नाही, तर शेतकर्‍यांकडे जमिनीची सरासरी 1995-96 च्या 1.41 हेक्टरने घट होऊन 1.15 हेक्टर राहिली आहे. याशिवाय 2001 मध्ये भारतात एकूण शेतमजुरांची उपलब्धता 57 टक्के असताना 2011 मध्ये त्यात घट होऊन 54.61 टक्क्यांवर पोहोचली. अशा स्थितीत शेतीचे तंत्रज्ञान भविष्यातील अन्नधान्यांच्या उत्पादनातील संकटाचा सामना करण्यासाठी हातभार लावू शकते.  

– कीर्ती कदम

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news