

शेती करताना जमिनीच्या रंगाची दखल घेतली जात असली, तरी त्यामागील पार्श्वभूमी मात्र अनेकांना माहीत नसते. खरे तर, जमिनीचा रंग हा एक महत्त्वाचा गुणधर्म असून जमीन तयार होण्यासाठी लागणार्या अनेक प्रक्रियांचा तो परिपाक असतो. आपल्याकडील बहुतेक सर्व जमिनी सह्याद्रीच्या काळ्या दगडापासून (डेक्कन ट्रॅप) तयार झालेल्या आहेत. याच खडकास 'बेसाल्ट' दगड असेही म्हणतात. जमिनीचा मूळचा रंग खडकाच्या रंगाप्रमाणे असतो. उदा. काळी जमीन काळ्या खडकापासून, तर तांबडी जमीन जांभ्या खडकापासून बनलेली आहे. पांढर्या रंगाची जमीन फेल्डस्पार या खडकापासून बनलेली आहे. सेंद्रिय पदार्थ आणि लोहाचे भस्म यांच्यामुळे जमिनीचा मूळचा रंग बदलतो. सेंंद्रिय पदार्थामुळे (ह्युमस) जमिनीचा रंग काळा पडतो. जमिनीत ह्युमस कमी असेल, तर जमीन फिकट रंगाची दिसते.
मातीत सेंंद्रिय पदार्थ, चुना विपुल प्रमाणात असेल, तर मातीला गडद रंग येतो. जमिनीत लोहाचे क्षार जास्त असतील, तर जमिनीला तांबडा रंग येतो. निरनिराळ्या प्रकारच्या लोह, क्षारानुसार जमिनीस तांबूस, पिवळसर, तपकिरी रंग प्राप्त होतो. जमिनीचा रंग धुसर पांढरा दिसतो. जमिनीच्या रंगावरून जमिनीच्या सुपिकतेची कल्पना येत नाही. मातीचा रंग तपासून पाहण्याचे एक शास्त्र आहे. याकरिता रंग तक्तेअथवा फिरती तबकडी वापरून रंग ठरविता येतो. फिरत्या तबकडीमुळे जमीनीच्या प्राथमिक रंगाचे प्रमाण कळू शकते. मुनसेल कलर चार्टस्चा उपयोग करून मातीचा रंग, त्यांच्या विविध छटा आणि रंगस्तरता कळून येतात. हवामानाचा जमिनीच्या रंगावर विशेष परिणाम दिसून येतो. वेगवेगळ्या हवामानातील जमिनींचा रंग वेगवेगळा आहे.
1) उष्ण कटिबंधातील दमट हवामानातील जमिनी लाल किंवा तांबड्या, 2) समशितोष्ण कटिबंधातील काळ्या जमिनी, 3) शीत कटिबंधातील कोरड्या हवामानातील पिवळट अथवा बदामी जमिनी, 4) भूमध्य प्रदेशावरील हवामानातील तांबड्या भारी पोताच्या किंवा विटकरी रंगाच्या जमिनी. याशिवाय जमिनीचा उंच-सखलपणा, पाण्याचा होणारा निचरा आणि हवामान यावर जमिनीचा रंग अवलंबून असतो. माथ्यावरील जमिनी हलक्या आणि फिक्या रंगाच्या दिसतात, तर सखल भागातील जमिनीचा रंग गडद दिसतो. जेथे धूप होते तेथे रंग फिकट असतो. जेथे कण किंवा गाळ साचतो तेथे रंग गडद असतो. काळ्या भारी जमिनीची धूप झाल्यास तिचा रंग भुरकट काळा होतो. ज्या जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असते त्या ठिकाणच्या पृष्ठभागावरील मातीचा रंग भुरकट पांढरा दिसतो.