

Shaheed Diwas 23 March
"मृत्यू... हा शब्द उच्चारताच कितीही धैर्यवान असला तरी व्यक्तीच्या काळजाचा ठोका चुकतो. एकदिवस सर्वकाही संपणार आहे, अशी ही एक भयाण जाणीव काही क्षण मनात निर्माण होते. खरं तर, मृत्यूच्या वेदनेपेक्षाही त्याचं भय माणसाला अधिक भेदरवून सोडतं; पण अवघ्या २३ वर्षांचा एक तरुण मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून त्यालाच आव्हान देतो! 'व्यक्तींना मारणे सोपे आहे, पण विचार मारता येत नाहीत; मोठी साम्राज्ये कोसळली, पण कल्पना चिरंतन राहिल्या,' असा हुंकार देत भगतसिंग नावाचा तरुण देशासाठी बलिदान देतो. त्यामुळेच त्यांचं जगणं जेवढं उदात्त होतं, तेवढंच त्यांचं बलिदान प्रेरक ठरलं, ज्यातून लाखो 'भगतसिंग' घडले. स्वतःच्या शरीराच्या विनाशापेक्षा आपल्या विचारांच्या अमरत्वावर अढळ विश्वास ठेवणारे भगतसिंग म्हणूनच आजही करोडो भारतीयांसाठी 'क्रांतीची मशाल' आहेत. २३ मार्च या 'शहीद दिना'निमित्त, जाणून घेऊया भगतसिंग यांनी स्वाभिमानाने जीवन जगण्याबाबत दिलेल्या शिकवणीविषयी.....!
"आमचं सरळ कोर्टमार्शल करा किंवा सरळ आम्हाला तोफेच्या तोंडी द्या, तोफेचे गोळे आम्ही फुलांसारखे झेलू; आम्हाला फाशीसारखी भेकड शिक्षा देऊ नका," अशा शब्दांमध्ये मृत्यू कसा असावा, हे ब्रिटिशांविरोधातील लढ्याचे सशस्त्र क्रांतीचे मूर्तिमंत प्रतीक भगतसिंग यांनी न्यायाधीशांना सुनावले होते. भगतसिंगांच्या जगण्याइतकेच त्यांचे बलिदान उदात्त होते. त्यांनी ठामपणे सांगितले होते की, "व्यक्तींना मारणे सोपे आहे, परंतु तुम्ही विचार मारू शकत नाही. मोठी साम्राज्ये कोसळली, पण कल्पना जिवंत राहिल्या." स्वतःच्या शरीराच्या विनाशापेक्षा आपल्या विचारांच्या चिरंतनतेवर त्यांचा जास्त विश्वास होता. म्हणूनच, समोर मृत्यू दिसत असतानाही ते डगमगले नाहीत. त्यांच्या याच निधड्या छातीच्या बलिदानातून देशाच्या कानाकोपऱ्यात लाखो 'भगतसिंग' तयार झाले.
पिस्तौल और बम कभी इन्किलाब नहीं लाते बल्कि इन्किलाब की तलवार विचारों की सान पर तेज होती है (पिस्तूल व बॉम्ब कधीही क्रांती घडवू शकत नाहीत; पण क्रांतीच्या तलवारीला विचारांच्या सहानीवर धार काढता येते.) भगतसिंग यांचे हे विचार त्यांच्यामधील दार्शनिक तरुणाचे दर्शन घडवतात. असेम्ब्ली बॉम्ब प्रकरणात ब्रिटिशांनी अटक केल्यापासून फाशीवर जाईपर्यंत भगतसिंग यांनी अखंड वाचन, मनन आणि चिंतन करत राहिले. शहीद भगतसिंग यांनी लाहोर जेलमध्ये फाशीची वाट पाहत असताना जे चिंतन केले, ते आजच्या तरुणाईसाठी केवळ प्रेरणा नाही, तर एक महान जीवनदर्शन आहे.
भगतसिंग यांना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी त्यांचे वडील किशनसिंग यांनी ट्रिब्युनलमार्फत व्हाईसरायला एक पत्र सादर केले. या पत्रात त्यांनी साँडर्सचा खून झाला तेव्हा भगतसिंग हे कलकत्त्यात होते, याचा पुरावाही दिला. याची माहिती मिळताच भगतसिंग संतप्त झाले. त्यांनी आपल्या वडिलांना एक खरमरीत पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी नमूद केले की, क्रांतिकारकांनी ब्रिटिश न्यायालयाची जाणूनबुजून उपेक्षा केली पाहिजे, त्याबद्दल कठोर शिक्षा भोगायला तयार असलं पाहिजे. तुम्ही समजता तेवढे माझं जीवन अमूल्य नाही. जीवनातील अमूल्य आदर्शांना तिलांजली देऊन माझं जीवन वाचवण्याएवढं माझं जीवन खचितच महत्त्वाचं नाही. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले होते: "जिवंत राहण्याची इच्छा माझ्यातही आहे, पण मी अटींवर जगू इच्छित नाही. माझे नाव हिंदुस्तानी क्रांतीचे प्रतीक बनले आहे... आणि जर मी हसत-हसत फासावर चढलो, तर भारतीय माता आपल्या मुलांनी 'भगतसिंग' व्हावे अशी इच्छा धरतील."
३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग यांची आपल्या कुटुंबीयांशी शेवटची भेट झाली. आई-वडील, आजोबा, दोन्ही काकी आणि दोन्ही भाऊ त्यांना भेटण्यासाठी आले. आजोबा सरदार अर्जुनसिंग हे सर्वात अस्वस्थ होते. एकीकडे नातू देशासाठी बलिदान देणार असल्याचे दिसत होते. याचवेळी आई आणि काकूंचे अश्रू थांबत नव्हते. आपल्या मुलाला पुन्हा कधीच पाहता येणार नाही, ही शब्दातीत वेदनेने दोघीही पूर्णपणे कोसळल्या. यावेळी भगतसिंग आईला म्हणाले, तुम्ही माझा मृतदेह घेण्यासाठी येऊ नका, कुलबीरला (लहान भाऊ) पाठवा. तुम्ही रडलात तर लोक म्हणतील भगतसिंगची आई रडते, असे म्हणत भगतसिंग मोठमोठ्याने हसले. २३ वर्षांच्या तरुणाचा निर्धार पाहून कुटुंबाचं मनोधैर्य वाढले.
३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग यांनी आपल्या १२ वर्षांच्या लहान भावाला पत्र लिहिलं.
प्रिय कुलतार, आज तुझ्या डोळ्यातील अश्रू बघून मन भरून आले. तुझ्या बोलण्यातही दुःख होतं. आता शिक्षणाकडे पूर्ण लक्ष दे. मनोधैर्य मजबूत ठेव. आणखी काय लिहू. भगतसिंग यांचे हे शेवटचे पत्र राष्ट्राला आनंदी राहण्याचा शुभसंदेश देणारे होते. आम्ही प्रवासाला निघालो, आमचा संदेश घ्या, असे उद्गार त्यांनी या पत्रात काढले.
भगतसिंगांसाठी मृत्यू हा प्रवासाचा शेवट नव्हता, तर तो क्रांतीचा पुढील टप्पा होता. त्यांच्या मते, त्यांचा देह संपला तरी त्यांनी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल देशवासीयांच्या मनात कायम धगधगत राहील.
मृत्यूच्या दारात उभे असतानाही त्यांनी कोणत्याही काल्पनिक स्वर्गाची किंवा मोक्षाची अपेक्षा ठेवली नाही. 'मी नास्तिक का आहे?' यातून त्यांनी अत्यंत तार्किकपणे मृत्यूला एक नैसर्गिक प्रक्रिया मानले.
भगतसिंगांनी त्यांच्या डायरीत आणि लेखात स्पष्ट केले की, जो व्यक्ती आपल्या ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असतो, त्याला मृत्यू कधीच पराभूत करू शकत नाही. मृत्यू हा केवळ शरीराचा बदल आहे, आत्म्याचा किंवा विचारांचा नाही.
२३ मार्च १९३१ हा दिवस उजाडला. तुम्हाला काही सांगायचं आहे का, असं मॅजिस्ट्रेटनी विचारलं. भगतसिंग म्हणाले, आझादी और जिंदगी एक बात है, गुलामी और मौत एक बात है, त्यांनी राष्ट्राला दिला हा अखेरचा संदेश होता.
भगतसिंगांसाठी मृत्यू ही हताश होऊन स्वीकारलेली गोष्ट नव्हती, तर तो जाणीवपूर्वक निवडलेला एक सर्वोच्च सन्मान होता. त्यांना खात्री होती की, त्यांच्या बलिदानानंतर ब्रिटीश सत्तेचा पाया खिळखिळा होईल. झालंही तसेच भगतसिंग यांचेहौताम्याने लाखो भगतसिंग तयार झाले. पुढील काही वर्षांमध्ये ब्रिटीश सत्तेचा डोलारा कोसळला. म्हणूनच २३ मार्च हा दिवस देशभरात 'शहीद दिन' म्हणून साजरा होतो. या निमित्ताने, केवळ एका क्रांतिकारकाची आठवण काढणे पुरेसे नाही, तर त्यांनी जीवन जगताना ज्या निर्भयतेने प्रत्येक गोष्टींकडे पाहिले, तीच वृत्ती आजच्या तरुणाईने देशाच्या विकासात कार्यरत होताना आत्मसात करणे हीच खरी भगतसिंग यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.