YouTuber career decision | ‘प्रभावक’ माघारी का वळताहेत?

YouTuber career decision
YouTuber career decision | ‘प्रभावक’ माघारी का वळताहेत?Pudhari file Photo
Published on
Updated on

महेश कोळी, संगणक अभियंता

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि समाजमाध्यमे हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता उत्पन्नाचे एक प्रमुख स्रोत बनले आहेत. किंबहुना हल्लीचे बरेच तरुण-तरुणी पारंपरिक नोकरीपेक्षा यूट्यूबर किंवा इन्फ्ल्यूएन्सर (प्रभावक) बनण्याच्या मागे अधिक प्रमाणात धावताना दिसताहेत. अशा काळात लोकेश कुमारसारख्या एका प्रस्थापित यूट्यूबरने घेतलेला निर्णय सर्वांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि समाजमाध्यमे हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता उत्पन्नाचे एक प्रमुख स्रोत बनले आहेत. किंबहुना हल्लीचे बरेच तरुण-तरुणी पारंपरिक नोकरीपेक्षा यूट्यूबर बनण्याच्या किंवा इफ्ल्यूएन्सर बनवण्यामागे अधिक प्रमाणात धावताना दिसताहेत. अशा काळात लोकेश कुमारसारख्या एका प्रस्थापित यूट्यूबरने घेतलेला निर्णय सर्वांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.

समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी, लाखो फॉलोअर्स आणि त्यातून मिळणारा बक्कळ पैसा हे आजच्या तरुणाईसाठी यशाचे सर्वोच्च शिखर मानले जाते. अशा वातावरणात पूर्णवेळ व्हिडीओ निर्मिती किंवा कंटेंट क्रिएशन सोडून पुन्हा एकदा ‘नऊ ते पाच’च्या पारंपरिक नोकरीकडे वळणे हा निर्णय वरवर पाहता अनेकांना माघार वाटू शकतो; परंतु या निर्णयाच्या मुळाशी असलेले कौटुंबिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि भविष्यातील सुरक्षितता हे पैलू अत्यंत महत्त्वाचे आहेत. सोशल मीडियाच्या ग्लॅमरस जगात वावरताना बाहेरून सर्वकाही आलबेल वाटत असले, तरी पडद्यामागचे वास्तव हे सततचा तणाव, अनिश्चितता आणि अल्गोरिदमच्या शर्यतीने व्यापलेले असते. लोकेश कुमारने घेतलेला हा धाडसी निर्णय केवळ एका व्यक्तीचा वैयक्तिक बदल नसून, तो डिजिटल अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेवर भाष्य करणारा एक मोठा वस्तुपाठ आहे.

एखादी व्यक्ती इन्फ्लुएन्सर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतो, तेव्हा सतत काहीतरी नवीन, आगळेवेगळे आणि व्हायरल होईल असे देण्याचा प्रचंड दबाव त्याच्यावर असतो. यूट्यूब किंवा इतर समाजमाध्यमांवरील उत्पन्न हे पूर्णपणे जाहिराती, प्रायोजकत्व आणि प्रेक्षकांच्या संख्येवर अवलंबून असते. एखाद्या महिन्यात व्हिडीओ चालले नाहीत किंवा प्लॅटफॉर्मच्या नियमात बदल झाला, तर उत्पन्नाचा स्रोत अचानक आटू शकतो. या अनिश्चिततेचा थेट परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर आणि कौटुंबिक नियोजनावर होतो. लोकेश कुमारला यूट्यूबच्या माध्यमातून चांगली कमाई होत असतानाही त्याने नियमित नोकरीचा मार्ग निवडला. कारण, त्याला एका ठरावीक उत्पन्नाची आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज जाणवली. नोकरीमध्ये मिळणारा दरमहा पगार हा केवळ आकडा नसून, तो कुटुंबाला देणारा एक आधार असतो, ज्यातून घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि आपत्कालीन गरजा पूर्ण करण्याची खात्री मिळते. समाजमाध्यमांच्या जगात ही खात्री कधीही देता येत नाही. कारण, तिथे आजचा सुपरस्टार उद्या विस्मृतीत जाऊ शकतो.

लोकेशच्या या निर्णयामुळे ‘इन्फ्लुएन्सर’ संस्कृतीच्या मर्यादांवर आता गंभीर चर्चा सुरू झाली आहे. अनेक तरुण केवळ प्रसिद्धी पाहून आपल्या हातातली स्थिर नोकरी सोडून पूर्णवेळ यूट्यूबर बनण्याचे स्वप्न पाहतात; मात्र या क्षेत्रातील स्पर्धा इतकी तीव्र आहे की, प्रत्येक व्यक्तीला तिथे यश मिळेलच असे नाही. यश मिळाले, तरी ते टिकवून ठेवण्यासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक ओढाताण ही अनेकदा वैयक्तिक आयुष्याचा बळी घेते. सतत कॅमेर्‍यासमोर असणे, लोकांच्या कमेंटस्ना सामोरे जाणे आणि स्वतःच्या खासगी आयुष्याचे प्रदर्शन करणे हे कालांतराने थकवणारे ठरते. लोकेशने या झगमगाटापेक्षा कौटुंबिक शांततेला प्राधान्य दिले, ही गोष्ट आजच्या धावपळीच्या युगात खूप मोठी आहे. प्रसिद्धी क्षणभंगूर असते; परंतु कुटुंबासोबत घालवलेले दर्जेदार क्षण आणि मिळणारे मानसिक समाधान हे शाश्वत असते. यशाची व्याख्या केवळ फॉलोअर्सच्या आकड्यांवरून न ठरवता ती आपल्या आयुष्यातील शांततेवरून ठरवली पाहिजे, हेच लोकेशच्या कृतीतून अधोरेखित होते.

पारंपरिक नोकरीकडे वळणे म्हणजे प्रगतीला खीळ बसणे असा जो एक समज समाजात रूढ झाला आहे, तो लोकेशने खोडून काढला आहे. कोणत्याही कामात लज्जा न बाळगता आपल्या जबाबदार्‍यांचे भान ठेवून घेतलेला निर्णय हा नेहमीच सन्मानजनक असतो. नेटिझन्सनी लोकेशच्या या निर्णयाचे स्वागत करताना त्याला ‘वास्तववादी’ म्हटले आहे. कारण, त्याने जमिनीवर राहून विचार केला. आजच्या काळात ‘मल्टिटास्किंग’ आणि ‘पॅसिव्ह इन्कम’च्या नावाखाली अनेकजण स्वतःला इतके गुंतवून घेतात की, त्यांना विश्रांतीसाठीही वेळ उरत नाही. अशावेळी लोकेशने घेतलेली ही माघार प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यातील एक मोठी झेप असू शकते. ज्या क्षेत्रातून आपल्याला केवळ ताण मिळतो, ते क्षेत्र वेळेत सोडून पुन्हा शून्यातून सुरुवात करणे यासाठी खूप मोठ्या आत्मविश्वासाची गरज असते. लोकेश कुमारचे हे उदाहरण अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे, जे चुकीच्या प्रवाहात वाहून जात आहेत आणि ज्यांना आपल्या मूळ अस्तित्वाकडे परत यायचे आहे.

शेवटी करिअरमधील बदल हा नेहमीच आर्थिक निकषांवर आधारित नसून तो आयुष्याच्या गुणवत्तेवर आधारित असावा. लोकेशने पुन्हा एकदा कार्यालयातील नऊ ते पाचची नोकरी स्वीकारून हे सिद्ध केले आहे की, आयुष्यात कधीही मागे वळून पुन्हा सुरुवात करणे चुकीचे नसते. समाजमाध्यमांचे जग हे आभासी आहे, तर नोकरी आणि त्यातून मिळणारे सामाजिक संवादाचे स्वरूप हे वास्तववादी आहे. एका बाजूला लाखो अनोळखी लोकांच्या लाईक्स आहेत आणि दुसर्‍या बाजूला आपल्या माणसांच्या चेहर्‍यावरील समाधान आहे, अशा द्वंद्वात लोकेशने सार्थपणे दुसर्‍या पर्यायाची निवड केली. त्याच्या या निर्णयामुळे कंटेंट क्रिएटर म्हणून काम करणार्‍या इतर अनेकांनाही आपल्या भविष्याबद्दल पुनर्विचार करण्याची दिशा मिळाली आहे. ग्लॅमरच्या शर्यतीत धावण्यापेक्षा स्वतःची शांतता शोधणे हेच खरे यश आहे आणि लोकेश कुमार याने हे यश मिळवले आहे, असे म्हणता येईल. भारतीय तरुणाईसाठी हा एक महत्त्वाचा धडा असून आयुष्यातील प्राथमिकता कशा ठरवाव्यात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

एका ताज्या सर्वेक्षणानुसार जवळपास 52 टक्के कंटेंट क्रिएटर सध्या ‘बर्नआऊट’ अनुभवत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील 37 टक्के लोक आपले हे करिअर पूर्णपणे सोडून देण्याचा विचार करत आहेत. या मानसिक ताणाचे मुख्य कारण म्हणजे सतत नवीन काहीतरी देण्याचा दबाव (40 टक्के), कामाचा अवाढव्य व्याप (31 टक्के) आणि स्क्रीनसमोर घालवलेला अतिरिक्त वेळ (27 टक्के) हे आहे. उत्पन्नातील अनिश्चितता हे तणावाचे सर्वात मोठे कारण असल्याचे 55 टक्के क्रिएटर्सनी मान्य केले आहे.

सोशल मीडियावर लाखो रुपये कमावले जातात, असे चित्र भासवले जात असले, तरी जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. एका अहवालानुसार, सुमारे 50.71 टक्के इन्फ्लुएन्सर्सचे वार्षिक उत्पन्न 15,000 डॉलर्सपेक्षाही (अंदाजे 12-13 लाख रुपये, जे जागतिक स्तरावर कमी मानले जाते) कमी आहे. केवळ 15.41 टक्के क्रिएटर्स वर्षाला 1 लाख डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करू शकतात. भारतातही ही दरी मोठी आहे. नॅनोइन्फ्लुएन्सर्सना एका पोस्टसाठी 2,000 ते 7,000 रुपये मिळतात, तर मोठ्या सेलिब्रिटींना लाखो रुपये मिळतात; मात्र ही कमाई कायमस्वरूपी नसते. महिन्याला ठरावीक पगार देणारी नोकरी आणि व्ह्यूजवर अवलंबून असलेले उत्पन्न यांतील फरक लोकेश कुमारसारख्या क्रिएटर्सना पारंपरिक नोकरीकडे वळवण्यास भाग पाडतो.

लोकेश कुमार हे एकमेव उदाहरण नाही. जगभरात असे अनेक ‘प्रोफेशनल’ क्रिएटर्स आहेत, ज्यांनी लाखो फॉलोअर्स असतानाही निवृत्ती घेतली किंवा नोकरी स्वीकारली. यातील अनेकांनी मान्य केले आहे की, सुरुवातीला जो छंद वाटत होता, त्याचे रूपांतर एका थकवणार्‍या व्यवसायात झाले. खेळाच्या किंवा मनोरंजनाच्या व्हिडीओनिर्मितीमध्ये काम करणार्‍या काही क्रिएटर्सनी तर असे म्हटले आहे की, व्हिडीओ बनवण्याच्या नादात त्यांना स्वतःला त्या खेळाचा आनंद घेता येणेच बंद झाले होते. त्यामुळेच केवळ प्रसिद्धीच्या मागे न धावता शाश्वत करिअर आणि कौटुंबिक सुख शोधण्यासाठी पारंपरिक नोकरी हा एक सन्मानजनक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. पारंपरिक नोकरीकडे वळण्याची काही कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, दिवसाचे 24 तास कामात व्यग्र राहणे. अनेक क्रिएटर्स दिवसातील 10-15 तास केवळ व्हिडीओ एडिटिंग, आयडिया शोधणे आणि प्रेक्षकांच्या कमेंटस्ना उत्तरे देणे यात घालवतात. यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक संबंध धोक्यात येतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, अल्गोरिदमवरील अवलंबित्व. समाजमाध्यमांचे नियम कधी बदलतील आणि तुमचे व्ह्यूज कधी कमी होतील, याची कोणतीही शाश्वती नसते. याउलट नऊ ते पाचच्या नोकरीमध्ये कामाचे तास निश्चित असतात आणि आठवड्याच्या शेवटी सुट्टी मिळते, जी मानसिक शांततेसाठी अत्यंत आवश्यक असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news