आठवणींचा गुंजारव

लेखिकेच्या संघर्षमय जीवनाची कहाणी
Writer Nalini Bahulekar's story of a struggling life
आठवणींचा गुंजारव Pudhari File Photo
Published on
Updated on
ज्ञानेश्वर कुलकर्णी

लेखिका नलिनी बहुलेकर यांचे ‘आठवणींचा गुंजारव’ हे पुस्तक म्हणजे एकप्रकारे त्यांच्या जीवनाची स्मरणयात्रा आहे. कोल्हापुरातील लहानपणीच्या आठवणीपासून ते अगदी जीवन साथीदार नंदकुमार बहुलेकर यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीपर्यंत कालपट पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. लेखिकेच्या संघर्षमय जीवनाची कहाणीच आहे. यातून लेखिकेच्या अनेक गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश पडला आहे.

शालेय जीवनातील शिक्षक, आजोळच्या आठवणी, वडिलांची शिस्त, आईची संगीताची आवड, पुढे तीच कला लेखिकेनेही जोपासली. बालपणीच्या अशा असंख्य आठवणी, राजाराम कॉलेजमधील शिक्षक, वर्गमित्र, संस्कृतचा अभ्यास, कुसुमाग्रज यांची भेट हे सर्व अगदी बारीक तपशिलासह लेखिकेने मांडले आहे. सासुबाई व सासरे यांनी सांगितलेल्या दुसर्‍या महायुद्धाच्या वेळच्या आठवणी, घरातील प्रसंग हे त्या काळातील अडचणी व त्यावर कशी मात केली हे सांगून जातात. विवाहानंतर सुरू असलेले बीएडचे शिक्षण, घरकाम, आर्थिक ताळमेळ, पतीची सरकारी नोकरी, त्यांनतर केलेले एमएड व त्यावेळी पतीची झालेली मदत हे सर्व पाहता त्यांनी केलेला संसार आताच्या पिढीला मार्गदर्शकच आहे. 1967 साली झालेला कोयनेचा भूकंप, त्यावेळची भीती, विविध प्रसंग, यातूनच सुरू असलेला अभ्यास हे सर्व त्यांची कठीण परीक्षा घेणारचे ठरले.

त्यांच्या पतीच्या कोल्हापूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) अशा विविध शहरांत होत असलेल्या बदल्या. नोकरीचा व्याप सांभाळत त्यांनी केलेले बीए, बीएड, एलएल.बी., एमए, एमएड, यादरम्यान दोघांनी पार पाडलेल्या घरातील जबाबदार्‍या हे सर्व अथक प्रयत्नांचे फळच म्हणावे लागेल. पतीने लेखिकेला रोज न चुकता करून दिलेला गजरा आजही आठवणीच्या रूपात सुगंध दरवळत आहे. त्यांच्या पतीला आलेला हार्टअ‍ॅटॅक, त्यावेळची धावाधाव, लहान मुले, पैशांची अडचण, हे सर्व प्रसंग त्यांनी हिमतीने पार पाडले. पतीच्या बदल्यांमुळे त्यांनाही नोकरी बदलावी लागत असे. कधी कधी शिकवण्यादेखील घेतल्या. दोघांच्या आजारपणात एकमेकांनी केलेली सेवा म्हणजे लेखिकेच्या शब्दातच सांगायचे, तर भाळणं संपल्यावर उरत ते फक्त सांभाळणं.

पुण्याच्या वसंत विहार सोसायटी व अवनीश परांजपे स्कीममधील रहिवासी व त्यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते, मुलगा नरेंद्र व मुलगी निरुपमा यांचे उच्च शिक्षण, त्यांच्यावर केलेले संस्कार, त्यांचे करिअरमधील विविध टप्पे या सह सर्वच आठवणींचे तपशीलवार दिनांक व वेळेसह केलेले वर्णन अधिकच भावणारे आहे. देश-विदेशातील प्रवास, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे त्यांचे निवृत्तीनंतर सहजीवन अगदी सुखात गेले. पतीच्या निधनाच्या वेळी पुत्र नरेंद्र विदेशात होता. कोरोना लॉकडाऊनमुळे येऊ न शकल्याची खंत नरेंद्र व लेखिकेच्या मनात कायम राहिली. या सर्व प्रसंगांतून लेखिकेचा धीटपणा, समयसूचकता, जागरूकता, सेवावृत्ती प्रकर्षाने दिसून येते. आयुष्यभर केलेल्या संघर्षाची फलप्राप्ती म्हणजेच त्यांच्या उत्तरायणात मिळालेले समाधान, समृद्धता व कौटुंबिक स्वस्थता होय. सुखी संसाराची गुरुकिल्ली शोधताना ‘आठवणींचा गुंजारव’ नक्कीच प्रेरणादायी ठरेल. हे पुस्तक लेखिकेने डॉ. ल. ज. नागावकर व सुशीला नागावकर या आई-वडिलांना, तसेच डॉ. श्रीधर बहुलेकर व विमलाबाई बहुलेकर या सासू-सासर्‍यांना अर्पण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news