

विवेक कुलकर्णी
विम्बल्डन म्हणजे, लॉन कोर्टवर सफेद ड्रेसकोड... विम्बल्डन म्हणजे, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम... विम्बल्डन म्हणजे, टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमणारे सेंटर कोर्ट.. विम्बल्डन म्हणजे, टेनिसविश्वातील परंपरेचा आणि प्रतिष्ठेचा सर्वोच्च मानबिंदू... याच प्रतिष्ठेच्या विम्बल्डनमध्ये यंदा दोन नव्या नावांनी इतिहास रचला, तो म्हणजे, इटलीचा शांत, संयमी; मात्र तितकाच आक्रमक यानिक सिन्नर व पोलंडची क्ले कोर्ट क्वीन म्हणून ओळखली जाणारी आणि आता हिरवळीवरही साम्राज्य प्रस्थापित करणारी इगा स्वायटेक यांनी!
‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती,’ हे तंतोतंत लागू होते ते यानिक सिन्नरसारख्या ताज्या दमाच्या युवा खेळाडूला, विम्बल्डनच्या यंदाच्या पुरुष एकेरीतील जेत्याला! खरं तर, सिन्नरमधील ‘सिन’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ थेट पापाशी निगडीत; पण येथे सेंटर कोर्टवर त्याचा खेळ ज्याप्रमाणे बहरला, ते पाहता त्याने किती ‘पुण्यसंचय’ केला असावा, याचेच जणू प्रत्यंतर आले. तसे पाहता सिन्नरच्या जेतेपदाच्या वाटचालीत जितके खाचखळगे होते, तितकेच काटेही; पण त्या खाचखळग्यांहून, त्या काट्यांहून अधिक बुलंद होते ते सिन्नरचे इरादे! जेतेपदाच्या निर्णायक फायनलमध्ये सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचसारखा तगडा प्रतिस्पर्धी असतानाही त्याचे हेच बुलंद इरादे त्याला जेतेपदापर्यंत घेऊन गेले. यशश्रीने सिन्नरच्या गळ्यात विजयाची माळ घातली.
सिन्नरने खरं तर सेंटर कोर्टवरील निर्णायक अंतिम सामन्यात पहिला सेट गमावलेला. साहजिकच, तेथे उपस्थित असंख्य प्रेक्षकांना आणि जगभरातील टेनिसरसिकांना असेच वाटले की, अनुभव तरुणाईवर भारी पडणार; पण सिन्नरने कमालीचा संयम आणि ‘पुण्यवान’ वृत्ती दाखवली. पहिला सेट गमावल्यानंतरही त्याचा चेहरा निर्विकार होता. त्याच्या डोळ्यात कशाची धास्ती नव्हती, तर एक द़ृढनिश्चय होता. त्याने वेळेची नजाकत ओळखत आपल्या खेळाचा स्तर उंचावला. त्याचे बेसलाईनवरून मारलेले सपाट, वेगवान फटके, अचूक सर्व्हिस आणि अविश्वसनीय कोर्ट कव्हरेज पाहून जोकोविचसारखा दिग्गजही क्षणभर गोंधळला. सिन्नरने केवळ सामना फिरवला नाही, तर त्याने जोकोविचच्या मानसिक कणखरतेच्या किल्ल्यालाच सुरुंग लावला. चार सेटपर्यंत चाललेल्या या महामुकाबल्यात अखेर सिन्नरने बाजी मारली आणि विम्बल्डन ट्रॉफीला गवसणी घातली. बोरिस बेकरनंतर (1985) विम्बल्डन जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू. त्याचप्रमाणे इटलीसाठी पुरुष एकेरीचे विम्बल्डन जिंकणारा तो पहिलावहिला ग्रँडस्लॅम विजेता!
जेतेपदापर्यंत सहज गवसणी घालणार्या सिन्नरचा प्रवास एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. उत्तर इटलीच्या बर्फाळ डोंगराळ प्रदेशात वाढलेला सिन्नर लहानपणी एक व्यावसायिक स्किअर होता. वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत तो स्किईंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकत होता; पण एका क्षणी त्याला जाणवले की, स्किईंगमधील एका छोट्या चुकीची किंमत खूप मोठी असू शकते आणि तिथे पुनरागमन करणे कठीण असते. याउलट टेनिसमध्ये एका पॉईंटवर चूक केली, तरी पुढच्या पॉईंटवर ती सुधारण्याची संधी असते. हाच विचार करून त्याने रॅकेट हाती घेतली आणि टेनिस हेच आपलं विश्व बनवलं. त्याचा शांत आणि थंड डोक्याने विचार करण्याचा स्वभाव कदाचित त्याला याच बर्फाळ प्रदेशातून मिळाला असावा. आज जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सिन्नर हा त्याच्या याच मानसिक कणखरतेमुळे इतरांपेक्षा वेगळा ठरतो.
सिन्नरने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मैलाचे दगड पार केले. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिले ग्रँडस्लॅम, त्याच वर्षात विम्बल्डनमध्ये दुसरे ग्रँडस्लॅम जिंकत त्याने टेनिस जगताला आपल्या आगमनाची जोरदार वर्दी दिली. याशिवाय जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले. 2023 मध्ये डेव्हिस चषकात इटलीला 47 वर्षांनंतर डेव्हिस कप जिंकून देण्यातही त्याचा सिंहाचा वाटा राहिला. आता जशी सिन्नरची वाटचाल संघर्षाची, तशीच पोलंडच्या स्वायटेकची वाटचालदेखील तितकीच लक्ष वेधून घेणारी. खरं तर, इगा स्वायटेक आणि ग्रास कोर्ट हे समीकरण काही वर्षांपूर्वीपर्यंत जुळणारे नव्हते. फ्रेंच ओपनच्या लाल मातीवर (क्ले कोर्ट) ती एखाद्या सम्राज्ञीप्रमाणे राज्य करत आलेली; पण विम्बल्डनच्या हिरवळीच्या कोर्टवर तिला नेहमीच चाचपडत राहावे लागलेले. गवतावर चेंडू वेगाने आणि खाली राहतो, ज्यामुळे तिच्या टॉप स्पिन फटक्यांना हवी तशी उसळी मिळत नसे. त्यामुळेच यंदा विम्बल्डन जिंकणे हे तिच्यासाठी केवळ एक स्पर्धा जिंकणे नव्हते, तर स्वतःच्या मर्यादांवर मात करणे होते आणि अर्थातच तिने यात यश खर्याअर्थाने खेचून आणले.
स्वायटेकसाठी देखील यंदाच्या विम्बल्डन विजयापर्यंतचा यंदाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेर्यांमध्येही तिला संघर्ष करावा लागला. तिचा आत्मविश्वास डळमळीत वाटत होता; पण इगाने आपल्या खेळावर प्रचंड मेहनत घेतली. तिने आपल्या खेळात बदल केले, फटक्यांमध्ये अधिक धार आणली आणि नेटजवळ येऊन खेळण्याचे धाडस दाखवले. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत तिने आपला सर्वोत्तम खेळ दाखवला आणि त्याचवेळी दिसून आले, स्वायटेक आता केवळ क्ले कोर्टपुरती मर्यादित नाही.
अंतिम फेरीत मांडा निमिसोव्हाविरुद्धचा सामना तिच्या मनोधैर्याची कसोटी पाहणारा होता. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसर्या सेटमध्ये तिला कडवी झुंज मिळाली; पण इगा खचली नाही. तिने शांत राहत योग्य वेळी आपला अव्वल खेळ साकारला आणि सरळ सेटमध्ये चॅम्पियनशिप जिंकत आपली पहिलीवहिली विम्बल्डन ट्रॉफी उंचावली. तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू सांगत होते, हे जेतेपद तिच्यासाठी किती खास आहे. या विजयाने तिने स्वतःला ‘ऑल कोर्ट प्लेयर’ म्हणून सिद्ध केले.
इगाच्या या यशामागे तिची शारीरिक तंदुरुस्ती जितकी महत्त्वाची आहे, तितकीच तिची मानसिक कणखरतादेखील. ती आपल्या टीममध्ये एका स्पोर्टस् सायकॉलॉजिस्टला (क्रीडा मानसशास्त्रज्ञ) नेहमीच सोबत ठेवते. कोर्टवर आणि कोर्टबाहेर दबाव कसा हाताळायचा, याचे धडे ती सातत्याने घेत असते. तिची हीच तयारी तिला कठीण प्रसंगात तारून नेते. पोलंडसारख्या देशातून येऊन टेनिस विश्वावर राज्य करणे, हे तिच्या याच तयारीचे आणि प्रचंड इच्छाशक्तीचे फलित.
इगा स्वायटेकने यापूर्वी फ्रेंच ओपन चार वेळा जिंकलेले, अमेरिकन ओपन एकवेळ जिंकलेले. विम्बल्डनचे जेतेपद तिला आजवर हुलकावणी देत आलेले. यंदा मात्र तिने ही कसरही भरून काढली आणि तीन वेगवेगळ्या सरफेसवर ग्रँडस्लॅम जिंकत ख्रिस इव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा, स्टेफी ग्राफ, सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा आणि अॅश्ले बार्टी आदी दिग्गजांच्या मांदियाळीत ती सन्मानाने डेरेदाखल झाली. या सर्व प्रवासादरम्यान तिने सलग 100 पेक्षा जास्त आठवडे अव्वल स्थान गाजवले. सलग 37 सामने जिंकत सर्वात मोठी विजयी मालिका नोंदवली आणि महिला एकेरीत आपले नवे साम्राज्य येतेय, याचाही दाखला दिला.
एकंदरीत, पुरुष एकेरीत सिन्नर आणि महिला एकेरी स्वायटेक यांचा हा विजय केवळ वैयक्तिक नाही. हा विजय रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच या ‘बिग थ्री’च्या युगाचा अस्त आणि नव्या युगाच्या उदयाची नांदी आहे. सिन्नर-अल्काराझ यांच्यातील स्पर्धा भविष्यात टेनिसला नव्या उंचीवर घेऊन जाईल, यात शंका नाही. त्याचप्रमाणे महिला एकेरीत स्वायटेक, सबालेंका आणि कोको गॉफ यांसारख्या टेनिसपटूंत सातत्याने वर्चस्वासाठी जबरदस्त संघर्ष रंगत राहील, यातही शंकेचे कारण नाही. विम्बल्डनचे हे राजा-राणी भविष्यातही तळपत राहिले, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.