Wife Kills Husband Cases
अनैतिक प्रेमाचा भेसूर चेहरा(Pudhari File Photo)

Wife Kills Husband Cases | अनैतिक प्रेमाचा भेसूर चेहरा

सोनम आणि राजाचे प्रकरण हे सध्या चर्चेत असले, तरी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो आणि राज्य पोलिसांचे आकडे पाहिले तर 2020-2024 पर्यंत देशभरात 785 पतींची पत्नीने एकटीने किंवा प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे दिसते.
Published on

सुचित्रा दिवाकर

Summary

सोनम आणि राजाचे प्रकरण हे सध्या चर्चेत असले, तरी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो आणि राज्य पोलिसांचे आकडे पाहिले तर 2020-2024 पर्यंत देशभरात 785 पतींची पत्नीने एकटीने किंवा प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे दिसते. त्याचवेळी या कालावधीत 618 पत्नींची त्यांच्या पतीने प्रेमिकेशी हातमिळवणी करत निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अशाप्रकारची हत्याकांडे केवळ एफआयआरचा भाग नसून, ती समाजाचा भेसूर चेहरा दाखवणारी आहेत. यात नातेसंबंधाचा पाया प्रेम नसून लोभ, हव्यास आणि पराकोटीची शरीरभूक दडलेली असते.

शाहरूख खानचा ‘डर’ चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. यात राहुल (शाहरूख खान) हा महाविद्यालयात शिकणार्‍या किरण (जुही चावला) वर एकतर्फी प्रेम करत असतो. मात्र, किरणचा सुनीलशी (सनी देओल) विवाह ठरलेला असतो. हे लग्न मोडण्यासाठी राहुल सतत कारस्थाने रचतो. तो सुनीलला मारण्याचाही प्रयत्न करतो. अखेर राहुलचा अंत झाल्यावरच कारस्थानाचा शेवट होतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले; पण अशाप्रकारच्या चित्रपटांना यश मिळणे हे एकप्रकारे बदलत्या सामाजिक स्थितीचे प्रतीक म्हणावे लागेल. सभोवतालच्या घटना पाहिल्यास अविश्वास, प्रेमाचा त्रिकोण या कारणांमुळे जोडीदाराच्या हत्या सर्रास होताना दिसत आहेत. समाजाचे प्रतिबिंब चित्रपटांच्या कथानकात उमटत असले, तरी चित्रपटांच्या कथेलाही मागे टाकणार्‍या घटना अवतीभवती घडतात तेव्हा ती स्थिती धोकादायक असते.

प्रेम हा शब्द सर्वांनाच भावतो आणि त्याभोवतीच जग घुटमळत राहते; पण याच प्रेमाने मर्यादा ओलांडली तर केवळ हृदयच नाही, तर आयुष्यदेखील पणाला लावले जाते. अर्थात, इतिहासात निःस्पृह, निरागस प्रेमाची अविस्मरणीय उदाहरणे पाहावयास मिळतात. जीवापाड प्रेम करणारे सलीम-अनारकली असोत किंवा ताजमहाल बांधणारा शहाजहाँ असो, त्यांनी प्रेम या भावनतेला खरा अर्थ आचरणात आणून प्रेमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. मात्र, आजचे प्रेम ताजमहाल उभे करणारे नसून, सिमेंटच्या ड्रममध्ये मृतदेह बंदिस्त करण्यापर्यंत गेले आहे.

Wife Kills Husband Cases
बहार विशेष : अमेरिकेतील ‘ मोदी मॅजिक’

गेल्या काही वर्षांतील घटना पाहिल्यास पतीने किंवा पत्नीने प्रेमवीराच्या मदतीने जोडीदाराची हत्या केल्याच्या कैक घटना दिसून येताहेत. पूर्वी महालांमध्ये अशाप्रकारचे क्रौर्य पाहावयास मिळायचे; पण आता फ्लॅटमध्ये किंवा निर्जन ठिकाणी दिसते. एकप्रकारे नातेसंबंधांवरचा विश्वास ढळत आहे. आता प्रेम हे कविता किंवा शेरोशायरीत नाही, तर पोलिसांच्या दफ्तरात नोंदले जात आहे. आजकालचे प्रेमसंबंध तुटल्यास त्यातून भयावह घटना घडताहेत. गुन्ह्याच्या काळ्या शाईने लिहिल्या जाणार्‍या या घटनांच्या माध्यमातून प्रेमाचा भेसूर चेहरा समोर येत आहे. या घटनांमुळे समाज व्यवस्थेला हादरे बसत आहेत.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो आणि राज्य पोलिसांचे आकडे पाहिले तर 2020-2024 पर्यंत देशभरात 785 पतींची पत्नीने एकट्याने किंवा प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे दिसते. त्याचवेळी या कालावधीत 618 पत्नींची त्यांच्या पतीने प्रेमिकेशी हातमिळवणी करत निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या आकडेवारीचा आधार घेतला तर दर तीन दिवसाला एका पतीचा किंवा एक पत्नीचा खून होताना दिसतो.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांत प्रेमाचा त्रिकोण सर्वाधिक जीवघेणा ठरला आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 275 पतींची हत्या पत्नींनी घडवून आणली आहे; तर मध्य प्रदेशात पतीकडून पत्नीच्या हत्येची 90 प्रकरणे घडली आहेत. पत्नीकडून पतीची हत्या होण्याच्या तुलनेत हे प्रमाण थोडे अधिक आहे.

Wife Kills Husband Cases
बहार विशेष : विकासाभिमुख अर्थसंकल्प

पत्नीकडून पतीची हत्या करण्याच्या प्रकरणांची राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास ती धक्कादायक आहे. त्यात बिहारमध्ये 186, राजस्थानमध्ये 138, महाराष्ट्रात 100 आणि मध्य प्रदेशात 87 पतींची हत्या झाली. त्याचवेळी पतीकडून पत्नीची हत्या करण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेशनंतर बिहारचा नंबर लागतो. यात बिहारमध्ये 130, राजस्थानमध्ये 115, महाराष्ट्रात 85 आणि मध्य प्रदेश 90 अशा घटना नोंदल्या गेल्या आहेत.

पती आणि पत्नीच्या नात्यात कटुता आल्यानंतर आणि संवाद थांबल्यानंतर आत्मीयतेची जागा फसवणूक आणि द्वेषभावना घेते. कालांतराने ते कारस्थानाचे रूप धारण करते. परंतु, पत्नी आता पीडित राहिली नसून, तीही कारस्थाने रचून पतीचा काटा काढत आहे. कित्येक प्रकरणांमध्ये पती निष्पाप असूनही, पत्नीवर प्रेम करणारा असूनही त्याच्याशी प्रतारणा करून प्रियकराच्या ओढीने पतीचा खून केल्याचे दिसून आले आहे. सोनम आणि राजाचे सध्या गाजत असलेले प्रकरण याच धाटणीतले आहे.

एकविसाव्या शतकातील भारताच्या समाजात वाढीस लागलेली ही प्रवृत्ती भयावह आहे. जोडीदाराची हत्या करण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जबरदस्तीने केलेला विवाह, पहिल्या प्रेमाचा दबाव, प्रेमविवाह करण्याची इच्छा, पतीसोबत होणारे वाद, व्यसनाधीन पती किंवा पतीकडून सासरच्या मंडळींसोबत केला जाणारा छळ, यामुळे पतीचा खून करण्याचा निर्णय पत्नींकडून घेतला जातो. काही प्रकरणात अपत्य असतानाही जोडीदाराने टोकाची भूमिका घेतलेली असते.

देशभरात घडलेल्या विविध घटनांतील काही घटनांचा इथे उल्लेख करता येईल. इंदूरची घटना ताजी असून, 23 मे 2025 रोजी हनिमूनला गेलेल्या जोडप्यातील पती राजा याची हत्या पत्नी सोनमने प्रेमवीर राज याच्या मदतीने घडवून आणली. पती राजाचा मृतदेह दरीत सापडला आणि तेव्हापासून पत्नी गायब होती. सुरुवातीला हे प्रकरण लुटीचा प्रकार वाटत होते. मात्र, पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. मेरठ येथील पत्नी मुस्कान आणि तिचा प्रेमवीर साहिल याने 3 मार्च 2025 रोजी पती सौरभ याची हत्या करत त्याचा मृतदेह ड्रममध्ये ठेवला. या खुनाला कन्येमुळे वाचा फुटली.

कानपूरच्या घाटमपूर भागात राहणार्‍या धीरेंद्रची हत्या त्याची पत्नी रिना हिने आपला भाचा सत्यमच्या साथीने केली. सत्यमसमवेत रिनाचे प्रेमसंबंध होते. एक दिवस रिनाचे पतीशी भांडण झाल्यानंतर तिने सत्यमला घरी बोलावले आणि दोघांनी धीरेंद्रला बेदम मारहाण केली. यात धीरेंद्रचा मृत्यू झाला. हत्येनंतर रिनाने खोटे चित्र तयार करत शेजार्‍यांनी हत्या घडवून आणल्याचे भासविले. मात्र, पोलिस तपासात खरे सत्य बाहेर आलेच.

हरियाणाची 26 वर्षीय मॉडेल एंजल गुप्ताने दहा वर्षांनी मोठा असलेल्या विवाहित प्रेमवीर मनजितचे प्रेम मिळवण्यासाठी कारस्थान रचले. मनजितची पत्नी सुनीता ही शाळेत शिक्षिका होती. ती या दोघांच्या प्रेमातला अडथळा होती. एंजलचे मानलेले वडील राजीव आणि प्रेमवीर मनजित यांनी एकत्र येत सुनीताची हत्या गुंडाकडून घडवून आणली. या प्रकरणात पोलिसांनी खोलवर तपास केला असता तिन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शोहरतगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या पत्नीने प्रेमवीराच्या मदतीने पतीला रात्री नदीत फेकले. 48 वर्षीय कन्ननची हत्या त्याची पत्नी संगीता शुक्लाने अनिल शुक्ला नामक आपल्या प्रियकराच्या मदतीने घडवून आणली. संगीता आणि अनिल यांच्यात बर्‍याच काळापासून प्रेमसंबंध होते. परंतु, या दोघांना पतीचा अडथळा होता. 2 जून 2025 रोजी संगीताने जेवणात विष कालवले आणि त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर अनिलला घरी बोलावले आणि या दोघांनी बेशुद्ध कन्ननला रात्री नदीत फेकून दिले. कन्ननचा मृतदेह सापडल्यानंतर संगीता आणि अनिल यांची चौकशी केली असता हत्याकांड उघडकीस आले.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, डिजिटल माध्यमातून वाढती जवळीक, भावनिकतेचा अभाव आणि नातेसंबंधातील गैरसमज, या कारणांमुळे अशाप्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत. पूर्वी पत्नीला निराधार आणि पीडित मानले जात होते. मात्र, आज अनेक प्रकरणात पत्नी आरोपी असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ असते,’ असे म्हटले जाते. परंतु, या म्हणीमागे केवळ निखळ भावना राहिली नसून, काही प्रेमप्रकरणे रक्ताने माखलेली दिसत आहेत. गेल्या काही वर्षांत देशात नातेसंबंधातील कटुतेमुळे होणार्‍या अप्रिय घटनांचे वाढलेले प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. अशाप्रकारची हत्याकांडे केवळ एफआयआरचा भाग नसून, ती समाजाचा भेसूर चेहरा दाखवणारी आहेत. यात नातेसंबंधाचा पाया प्रेम नसून लोभ, हव्यास आणि पराकोटीची शरीरभूक दडलेली असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news