Missile Tests | क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे खळबळ कशासाठी?

क्षेपणास्त्र चाचणी करणे ही काही नवी गोष्ट नाही
why-missile-tests-are-causing-alarm
Missile tests | क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे खळबळ कशासाठी?Pudhari File Photo
Published on
Updated on

कर्नल संजय बॅनर्जी (निवृत्त)

भारताने 16, 17 जुलै रोजी तीन क्षेपणास्त्रांची चाचणी करून एक प्रकारची खळबळ निर्माण केली आहे. यापैकी दोन क्षेपणास्त्रे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहेत. क्षेपणास्त्र चाचणी करणे ही काही नवी गोष्ट नाही. ती एक नियमित प्रक्रिया असून ती नवीन क्षेपणास्त्रांसोबतच सेवेत असलेल्या क्षेपणास्त्रांचीदेखील केली जाते; मात्र या तिन्ही चाचण्या अवघ्या 24 तासांच्या आत घेण्यात आल्या आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तान संघर्ष आणि भारत-चीन संबंधांच्या पार्श्वभूमीवर या चाचण्या झाल्याने आपल्या पूर्व आणि पश्चिमेकडील शेजारी असलेल्या भूराजकीय परिस्थितीच्या द़ृष्टीने त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

भारताने अलीकडच्या वर्षांमध्ये आपली संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत; पण ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारे संरक्षण क्षेत्राला जबरदस्त आणि घातक शस्त्रास्त्रांनी सज्ज केले जात आहे, ते अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. विशेष बाब म्हणजे, भारत हे सर्व काही आपल्या स्वतःच्या क्षमतेवर करीत आहे. कारण, यापूर्वीपर्यंत भारताला संरक्षण साहित्याकरिता जगातील बलाढ्य देशांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळेच भारत संरक्षण साहित्य खरेदी करणार्‍या देशांमध्ये क्रमांक एकवर होता. तसेच आज भारत संरक्षण क्षेत्रावर खर्च करणार्‍या देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हे सर्व यश प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद ठरत आहे; पण खरी गौरवाची बाब म्हणजे, आता भारत आधुनिक तंत्रज्ञानयुक्त क्षेपणास्त्र, बंदुका आणि संरक्षण प्रणाली स्वतः विकसित करीत आहे. याचे उत्तम उदाहरण अलीकडेच पाहायला मिळाले आहे.

भारताने 16-17 जुलै रोजी तीन क्षेपणास्त्रांची चाचणी करून दक्षिण आशियामध्ये खळबळ उडवून दिली. यापैकी दोन क्षेपणास्त्रे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहेत, हे विशेष. क्षेपणास्त्र चाचणी करणे ही काही नवी गोष्ट नाही. ती एक नियमित प्रक्रिया असून ती नवीन क्षेपणास्त्रांसोबतच सेवेत असलेल्या क्षेपणास्त्रांचीदेखील केली जाते; मात्र या तिन्ही चाचण्या अवघ्या 24 तासांच्या आत घेण्यात आल्या आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तान संघर्ष आणि भारत-चीन संबंधांच्या पार्श्वभूमीवर या चाचण्या महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील शेजारी सुरू असलेल्या भू-राजकीय परिस्थितीच्या द़ृष्टीनेही या चाचण्यांचे मोल अनन्यसाधारण आहे. या तिन्ही चाचण्या भारतीय सशस्त्र दलांच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. चाचणी घेण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये अग्नी-1 आणि पृथ्वी-2 या शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईलचा (एसआरबीएम) समावेश असून ही क्षेपणास्त्रे पारंपरिक तसेच अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहेत.

पृथ्वी-2 ची मारक क्षमता 250 ते 350 किलोमीटर असून पेलोड क्षमता 500 ते 1000 किलोपर्यंत आहे. अग्नी-1 ची मारक क्षमता 700 ते 1200 किलोमीटर असून 1000 किलो पेलोड नेण्यास समर्थ आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या या दोन्ही क्षेपणास्त्रांचा वापर चीन व पाकिस्तान यांच्या महत्त्वाच्या आणि सामरिक उद्दिष्टांवर केला जाऊ शकतो. अग्नी-1 ची 1200 किलोमीटरची जाहीर केलेली क्षमता संपूर्ण पाकिस्तानला कव्हर करण्यास पुरेशी आहे. या दोन्ही क्षेपणास्त्रांना ट्रकवरून लाँच करता येत असल्यामुळे त्यांची तातडीने तैनाती करणे सोपे आहे. ही क्षेपणास्त्रे विविध ठिकाणांवरून डागता येतात. तिसरे क्षेपणास्त्र आकाश प्राईम हे आकाश-1 आणि 1एस या जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचे सुधारित स्वरूप आहे. याचा वापर ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान करण्यात आला होता. पाकिस्तानने पाठवलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रे याच क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने अत्यंत प्रभावीपणे पाडण्यात आली होती. आकाश प्राईममध्ये हिमालयासारख्या अतिउंच ठिकाणी तैनातीसाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. 15 हजार फूट उंचीवरील लडाखच्या थंड हवामानात आणि ऑक्सिजनची कमतरता असणार्‍या भागात आकाश प्राईमने दोन वेगवान हवेत असलेल्या लक्ष्यांचा अचूक वेध घेतला.

आकाश प्राईम हे भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणेचा भाग आहे. हे 20 किलोमीटर अंतरावर 60 किलो पेलोड वाहू शकते. त्याची स्वयंचलित मार्गदर्शन पद्धत आणि आत्मसंकट मूल्यांकन क्षमता यामुळे हे क्षेपणास्त्र अत्युच्च उंचीवर क्षेपणास्त्रे, विमाने व ड्रोन यांच्या विरोधात अत्यंत प्रभावी आहे. कार्यप्रदर्शनादरम्यानही हे क्षेपणास्त्र आवश्यकतेनुसार दिशा किंवा योजना बदलण्यास सक्षम आहे. हे एक घातक क्षेपणास्त्र असून ते एकदा डागल्यावर लक्ष्याचा अचूक विनाश करते. आकाश प्राईमचे लाँचर हलके असून एका जागेतून दुसर्‍या जागी सहज हलवता येतात व प्रत्येक लाँचर एकावेळी तीन क्षेपणास्त्रे डागू शकतो. भारतीय स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडनुसार, तिन्ही क्षेपणास्त्रांची अग्नी-1, पृथ्वी-2 आणि आकाश प्राईम यांची तांत्रिक व परिचालन निकषांवर यशस्वी चाचणी झाली आहे. यामुळे गरज पडल्यास या क्षेपणास्त्रांची त्वरित तैनाती व वापर शक्य आहे. पृथ्वी आणि आकाश क्षेपणास्त्रे नवीन नाहीत. त्यांचा विकास अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि ती आधीच सशस्त्र दलांत समाविष्ट आहेत; मात्र या चाचण्यांमुळे या क्षेपणास्त्रांच्या नेव्हिगेशन, मार्गदर्शन व अन्य प्रणालींमध्ये कोणते बदल व सुधारणा झाल्या याचा आढावा घेतला गेला असणार आहे.

ज्या अचूकतेने या चाचण्या पार पडल्या आहेत, त्याने निश्चितच रावळपिंडी आणि बीजिंगमध्ये बसलेल्या शक्तींना हादरवले असेल. भारत-चीनदरम्यान अलीकडील चर्चेनंतर चीनकडून संबंध सामान्य स्थितीत आणण्याचे संकेत मिळत असले, तरी लडाख आणि अरुणाचलच्या सीमांवर घडलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लडाखमधील गलवान खोरे, पँगाँग सरोवर आणि डेपसांग मैदान तसेच अरुणाचलमधील तवांग सेक्टरमधील घडामोडी विसरता येणार नाहीत. दुसरीकडे पाकिस्तान ‘ऑपरेशन सिंदूर’मधील लाजिरवाण्या पराभवानंतर अपमानित आणि अस्वस्थ असेल आणि नक्कीच पुन्हा नव्या धाडसी कारवाईची तयारी करत असेल. भारताच्या या यशस्वी व तातडीच्या क्षेपणास्त्र चाचण्या अनेक प्रकारे आपल्या युद्धसज्जतेचा पुरावा देतात. मग, तो आक्रमणासाठी असो वा संरक्षणासाठी. या चाचण्या आपल्या विरोधकांकडून होणार्‍या कोणत्याही दुःसाहसाविरुद्ध आपल्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणाच्या संकल्पनाही स्पष्ट करतात.

या यशस्वी क्षेपणास्त्र चाचण्यांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, आपल्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेत मिळालेली प्रगती. हे ‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचे सशक्त व गौरवास्पद प्रदर्शन आहे. भारताचं सर्वात मोठं यश म्हणजे, इतर देश आता आपलं संरक्षण साहित्य विकत घेण्यास उत्सुक आहेत. यावरून आपण उत्तम दर्जाच्या प्रणाली तयार करत आहोत, हे लक्षात येते. फिलिपिन्ससारख्या देशांनी आपल्याकडून ब्रह्मोस मिसाईल्स खरेदी केले आहे. अनेक संरक्षणतज्ज्ञांनी आपल्या अहवालांमध्ये मान्य केले आहे की, भारताच्या स्वदेशी संरक्षण प्रणालींनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी प्रभावी कामगिरी केली. या ऑपरेशनमध्ये तुलनेने कमी खर्चात भारतीय प्रणालींनी जेवढा प्रभाव दाखवला, तेवढा प्रभाव महागड्या परदेशी प्रणालींनाही दाखवता आला नाही, हे विशेषत्वाने लक्षात घ्यावे लागेल.

भारत सरकारने ‘स्टेल्थ फायटर जेट’ भारतात तयार करण्यासाठी फ्रान्सला सहमती दिली आहे. सुमारे 61,000 कोटी रुपयांच्या संरक्षण करारानंतर पाचव्या पिढीचे अत्याधुनिक स्टेल्थ फायटर जेटस् भारतात तयार होऊ शकतील. हे यश केवळ पाकिस्तानसारख्या देशांसाठी नव्हे, तर चीनच्या तुलनेतही भारताला सक्षम करण्याच्या द़ृष्टीने अत्यंत आवश्यक होते. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आपल्या मोठ्या गरजांच्या अनुषंगाने स्वतःला सज्ज करीत आहे, ही बाब उल्लेखनीय आहे.

भारत पास, पाकिस्तान नापास!

एकीकडे भारताने तीन क्षेपणास्त्रांची चाचणी यशस्वी केलेली असताना दुसरीकडे पाकिस्तान आपल्या स्वतःच्या क्षेपणास्त्रांवरच नियंत्रण ठेवू शकत नाही, ही गंभीर बाब जगापुढे आली आहे. पाकिस्तानचे 22 जुलै रोजी अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या शाहीन-3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण करत असताना हे क्षेपणास्त्र चुकून बलुचिस्तानमधील डेरा बुगती या अशांत परिसरात कोसळून फुटले. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, हे ठिकाण पाकिस्तानच्या अणुऊर्जा प्रकल्पापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. असे सांगितले जाते की, या प्रकल्पात दररोज 10,000 पाऊंडपर्यंत युरेनियमचे प्रक्रिया कार्य चालते. त्यामुळे येथे अशा प्रकारचा स्फोट होणे फार मोठ्या प्रमाणात विनाशक ठरू शकते. ही माहिती बाहेर जाऊ नये म्हणून पाकिस्तानने त्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करून प्रसारमाध्यमांनाही रोखले. या घटनेमुळे पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र सुरक्षा आणि चाचणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news