

‘सर्वम एम’ हे भारताचे सर्वांत मोठे लार्ज लँग्वेज मॉडेल नुकतेच लाँच झाले. हा स्वदेशी एआय तंत्रज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे; मात्र दुसर्या एआय मॉडेलची ज्या पद्धतीने जगात आणि सोशल मीडियावर चर्चा होते तशी या मॉडेलची झाली नाही. विज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि गणित या विषयांतील सर्वाधिक पदवीधर असताना स्वदेशी ‘एलएलएम’साठी उत्साहाचा अभाव राहणे निराशाजनक आहे.
देशातील ‘सर्वम’ या एआय स्टार्टअप कंपनीने अलीकडेच सर्वात मोठे लार्ज लँग्वेज मॉडेल ‘सर्वम एम’ लाँच केले. बंगळुरूच्या या कंपनीची निवड भारत सरकारने देशातील पहिल्या आत्मनिर्भर लार्ज लँग्वेज मॉडेलच्या (एलएलएम) विकासासाठी केली होती. ‘एलएमएम’चा संबंंध जनरेटिव्ह एआय मॉडेलशी असून त्यास ‘अथाह टेस्ट डेटा’च्या माध्यमातून विकसित केले जाते. या प्रशिक्षणातून त्यांच्यात असामान्य एआय क्षमता विकसित होते. विशेष म्हणजे, चॅटजीपीटीदेखील असेच मॉडेल आहे.
सर्वम एम लाँच होणे हा स्वदेशी एआय तंत्रज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे; मात्र दुसर्या एआय मॉडेलची ज्या पद्धतीने जगात आणि सोशल मीडियावर चर्चा होते तशी या मॉडेलची झाली नाही. एआयच्या क्षेत्रात भारताची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही आणि आपल्या सरकारने या आघाडीवर काम करत 10.370 कोटी रुपयांच्या ‘इंडिया एआय मिशन’ लाँच केले. या माध्यमातून ‘सर्वम’ची निवड करण्यात आली; पण सर्वम एम मॉडेलला मिळणार्या सामान्य प्रतिसादावरून आयटी उद्योगात निराशेचे वातावरण आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणार्या देशात विज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि गणित या विषयांतील सर्वाधिक पदवीधर असताना स्वदेशी ‘एलएलएम’साठी उत्साहाचा अभाव राहणे निराशाजनक आहे. प्रामुख्याने सर्वम-एम हे 10 भारतीय भाषांवर केंद्रित लॉर्ज लँग्वेज मॉडेल आहे. देशातील 90 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक हीच भाषा बोलतात.
मॅनलो वेंचर्स नावाच्या वेंचर कॅपिटल फर्मचे तज्ज्ञ डी. डी. दास यांनी सर्वम एमच्या डाऊनलोडची कमी असणारी संख्या ही अस्वस्थ करणारी असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतीय भाषांच्या स्वदेशी मॉडेलला बाजारात खरोखरच मागणी आहे का, असा प्रश्न केला. त्यांनी कोरियाच्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘दिया’ नावाच्या ‘एलएलएम’ मॉडेलचा उल्लेख केला. या मॉडेलला एक महिन्यात सुमारे दोन लाख डाऊनलोड केल्याची नोंद आहे; मात्र चीनचे डीपसीक, क्वेन आणि अन्य दुसर्या मॉडेलला काही दिवसांतच लाखोंच्या संख्येने कशारितीने डाऊनलोड करण्यात आले, हे सर्वांनाच ठाऊक आहे. संकेतस्थळावर लाखो खाती तयार करून लोकांनी त्याचा वापरही सुरू केला. चॅटजीपीटी, गुगल जेमिनी, क्लॉड, परप्लेक्सिटी आदींची लोकप्रियता आपण सर्वांनीच पाहिली आहे. चॅटजीपीटीला पहिल्या पाच दिवसांतच दहा लाख लोकांनी सबस्क्राईब केले होते. केंद्र सरकार आणि आयटी उद्योगाचे प्रयत्न व संकल्प हे प्रामाणिक आहेत; मात्र बाजारात मागणीच राहत नसेल, तर काय करणार?
काही महिन्यांपूर्वी ओला कंपनीचे संस्थापक भविष अग्रवाल यांच्या एआय स्टार्टअप ‘कृत्रिम’ने देखील एलएलएम लाँच केले. त्यांनादेखील बर्याच प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. यामागचे कारण म्हणजे, अनुवाद योग्यरितीने न होणे, तथ्यातील चुका आणि आकलन क्षमतेतील उणिवा यासारख्या गोष्टी होत्या; पण अशाप्रकारची टीका करणारी मंडळी काही गोष्टी विसरतात. जेमिनी, चॅटजीपीटी आणि एलॉन मस्क यांच्या ग्रोकसारख्या अमेरिकी कंपन्यांनीदेखील कमी चुका केलेल्या नाहीत. या चुका हळूहळू कमी झाल्या आणि त्या नावारूपास आल्या असे म्हणता येईल. ‘सर्वम एम’ हे सक्षम लार्ज लँग्वेज मॉडेल असून ते फ्रेच ओपन सोर्स मॉडेल ‘मिस्त्राल’च्या आधारावर विकसित करण्यात आले आहे. म्हणजे शंभर टक्के भारतीय उत्पादन नाही, तरीही भारतीय भाषेतील 24 अब्ज पॅरामीटर्स असणार्या या ओपन सोर्स मॉडेलने अनेक पातळीवर ‘एलएलएम’पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. यात लामा-4 स्काऊट (मेटा) याचा समावेश आहे.
भारताला स्वदेशी मॉडेलची गरज आहे आणि यात शंका असण्याचे कारण नाही. कारण, टेक्नॉलॉजी, सामरिक, राजनैतिक आणि व्यापारी क्षेत्रात जागतिक शक्ती होण्यासाठी आपण दुसर्या तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाहीत. आपल्या देशात चांगल्या प्रकारे एआय इको सिस्टीम विकसित होत आहे आणि सरकारचा प्रयत्न देशाला एआय हब करण्याचा आहे. यासाठी वातावरण तयार होत असले, तरी त्याचा वेग कमी दिसून येत आहे. याला बूस्ट द्यावा लागेल. देशाच्या कानाकोपर्यांत नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत केवळ कुतूहलता राहू नये, तर कौशल्यही वाढावे, संशोधनात गती यावी आणि शोधही युद्धपातळीवर व्हायला हवेत. मागणी आणि पुरवठा या दोन्हीत आपली छाप पाडणे आवश्यक आहे. यासाठी लोकांनाही पुढे यावे लागेल. आपल्या देशात तयार होणार्या कामाची दखल घ्यायला हवी. केवळ समीक्षकांच्या द़ृष्टीने न पाहता त्याला महत्त्व आणि प्रोत्साहन द्यायला हवे. अशा पद्धतीने प्रयत्न यशस्वी होत असतील तेव्हाच स्वदेशी तंत्रज्ञानाचा सर्वत्र डंका वाजेल आणि त्याचा परिणाम म्हणजे देश एआयच्या पातळीवर वेगाने वाटचाल करेल शिवाय आपलाही याबाबत विकास होईल.