

विवेक कुलकर्णी
रात्रीचे बारा वाजले आहेत. दुसऱ्या दिवशी ऑफिस आहे, शाळा आहे, कामाचा व्याप आहे, तरी लाखो भारतीय टीव्हीसमोर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर खिळून बसले आहेत. मैदानावर भारत नाही, तिरंगा नाही, राष्ट्रगीत नाही, तरी प्रत्येक गोलवर जल्लोष आहे. प्रत्येक सेव्हवर हळहळ आहे आणि प्रत्येक पराभवानंतर सोशल मीडियावर भावना उसळत आहेत. विश्वचषकात भारत नाही, तरी भारत फुटबॉलच्या प्रेमात का बुडतो? आणि हा खेळ अजूनही सुपरस्टारभोवतीच का फिरतो? याचाच हा रंजक आढावा...
यंदा मेस्सी जिंकणार की रोनाल्डो? फ्रान्सचा एम्बापे पुन्हा धडाकेबाज ठरणार की नॉर्वेचा हालंड नवा अध्याय लिहिणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यंदाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकात दडलेली आहेत आणि स्पर्धा जसजशी पुढे सरकत जाईल, तसतशी ती उलगडत चालली आहेत. खेळाला कोणत्याही सीमारेषा असत नाही, जाती-धर्माच्या भिंती असत नाहीत, हेच यंदाचा फिफा फुटबॉल विश्वचषक दाखवून देतो आहे. हीच खर्याअर्थाने फुटबॉल विश्वचषकाची खरी ताकद आहे. हा खेळ देशांच्या सीमा ओलांडतो, तसा थेट माणसांच्या भावविश्वात प्रवेश करतो. भारताचा संघ विश्वचषकात नसतानाही भारतीय चाहते अर्जेंटिना, पोर्तुगाल, फ्रान्स किंवा ब्राझीलसाठी तितक्याच उत्कटतेने प्रार्थना करतात. अनेक घरांत विश्वचषकाच्या काळात भिंतीवर तिरंगा नसतो, तर मेस्सी किंवा रोनाल्डोचे पोस्टर असते. यावरून एक प्रश्न अपरिहार्यपणे उभा राहतो, फुटबॉल हा संघाचा खेळ असताना त्याची कथा अजूनही काही सुपरस्टारभोवतीच का फिरते?
याचे पहिले उत्तर मानवी स्वभावात दडलेले आहे. माणसाला कथा आवडते आणि प्रत्येक कथेला नायक हवा असतो. संघ हा एक विचार असतो; पण खेळाडू ही भावना असते. पेलेने फुटबॉलला जादू दिली, मॅराडोनाने बंडखोरीचा चेहरा दिला, मेस्सीने नम्रतेतून महानता दाखवली, तर रोनाल्डोने अथक मेहनतीची नवी व्याख्या लिहिली. एम्बापे आणि हालंड हे त्या परंपरेचे नवे अध्याय आहेत. चाहते संघाशी कमी आणि या प्रवाशांशी अधिक जोडले जातात. म्हणूनच विश्वचषक सुरू झाला की सामने नव्हे, तर नायकांचे अध्याय सुरू होतात. यामागे आधुनिक फुटबॉलचे अर्थकारणही तेवढेच जबाबदार आहे. आज एखादा सुपरस्टार हा फक्त खेळाडू नसतो. तो चालता-बोलता ब्रँड असतो. त्याच्या नावावर जर्सी विकल्या जातात, जाहिराती तयार होतात, प्रसारण हक्कांचे मूल्य वाढते आणि सोशल मीडियावर कोट्यवधी लोक त्याचा प्रत्येक क्षण पाहतात. त्यामुळे माध्यमांनाही 'अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स'पेक्षा 'मेस्सी विरुद्ध एम्बाप्पे' ही लढत अधिक आकर्षक वाटते. खेळ संघाबरोबर बहरतोच; पण त्याची सुरुवात खेळातील ज्या-त्या व्यक्तिमत्त्वांमुळे होते, हे बाजारपेठेने बरोबर ओळखले आहे.
भारतात हा अनुभव अधिक ठळकपणे दिसतो. क्रिकेट हा देशाचा श्वास मानला जातो; पण फुटबॉल विश्वचषक सुरू झाला की, क्रिकेट चाहताही काही काळासाठी फुटबॉलच्या प्रेमात पडतो. कारण, त्याला आपल्या देशासाठी जल्लोष करण्याची संधी नसली, तरी आपल्या आवडत्या खेळाडूसाठी आनंद व्यक्त करण्याची संधी असते. कोणी अर्जेंटिनाचा चाहता असतो. कारण, त्याला मेस्सी आवडतो. कोणी पोर्तुगालला पाठिंबा देतो. कारण, रोनाल्डो त्याच्या प्रेरणेचा स्रोत असतो. काहीजण फ्रान्सचा झेंडा हातात घेतात, तर काहीजण नॉर्वेला पाठिंबा देतात, जरी त्या संघाची विश्वचषकातील परंपरा फार मोठी नसली, तरी हालंड त्यांचा नायक असतो. अशारितीने भारतात फुटबॉल अनेकदा देशांचा नव्हे, तर व्यक्तिमत्त्वांचा उत्सव बनतो; मात्र या झगमगाटात एक सत्य अनेकदा दुर्लक्षित राहते. सुपरस्टार सामने जिंकवू शकतो; पण विश्वचषक नाही. याचेच यंदाचे उत्तम उदाहरण म्हणजे पोर्तुगाल आणि त्यांचा सुपरस्टार रोनाल्डो!
आजवर तब्बल ६ फिफा विश्वचषक खेळणार्या सुपरस्टार रोनाल्डोच्या एक विश्वचषक सोडला तर ट्रॉफी कॅबिनेटमध्ये काय नाही, असे नाही. युरो स्पर्धा जिंकली, अनेक लीग जिंकल्या. एक फुटबॉलपटू म्हणून जे जे साध्य करावेसे वाटते, ते सारे काही त्याने साध्य केले; पण फुटबॉलचा हवाहवासा विश्वचषक मात्र त्याच्यासाठी जितका जवळ राहिला, तितकाच दूरही राहिला! याचा अर्थ सरळ हाेता. एक सुपरस्टार म्हणून तो जरुर नावारूपास आला; पण विश्वचषक मात्र कधीच जिंकून देऊ शकला नाही.
रोनाल्डोचे वैयक्तिक विक्रम अफाट आहेत; पण पोर्तुगालला प्रत्येक मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. जी गोष्ट रोनाल्डोची, तीच थोड्याफार फरकाने ब्राझीलच्या नेमारची. आज क्लब फुटबॉलमध्ये या खेळाडूंची किती फरफट होते, हे ते वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी तंदुरुस्तीही राखू शकत नाहीत, यावरून सुस्पष्ट होते. दुखापतींशी झगडत असणारा नेमार यंदा आपल्या नैसर्गिक खेळाला न्याय देऊच शकला नाही आणि त्याच्यासारखा सुपरस्टार खेळाडू संघात असतानाही ब्राझीलला अपेक्षा नसतानाही अचानक गाशा गुंडाळावा लागला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. सुपरस्टार प्रकाशझोतात असतो; पण ट्रॉफीपर्यंतचा रस्ता अकरा जणांनी मिळूनच तयार करावा लागतो. दुसरीकडे, सांघिक खेळाचा कसा प्रभाव पडतो, हेदेखील तितकेच लक्षवेधी. २०१४ मध्ये जर्मनीने विश्वविजेतेपद मिळवले, ते एखाद्या एकमेव महासिताऱ्याच्या जोरावर नव्हे, तर विलक्षण संघभावनेच्या बळावर. दुसरीकडे अनेक वर्षे जगातील सर्वोत्तम खेळाडू मानला गेलेला मेस्सीही जोपर्यंत त्याला संतुलित आणि लढवय्या संघ मिळाला नाही, तोवर मागील स्पर्धेपर्यंत हा विश्वचषक उंचावू शकला नव्हता. मागील कतारमधील स्पर्धेत मात्र त्याने ही कसर उत्तमरीत्या भरून काढली होती.
अर्थात, काही असले, तरी सुपरस्टारचे महत्त्व कमी होत नाही. उलट ते या खेळाचे खर्याअर्थाने राजदूत असतात. आफ्रिकेतील एखादे मूल, भारतातील एखादा विद्यार्थी किंवा युरोपमधील एखादा चाहता... सर्वजण एका खेळाडूमुळे फुटबॉलच्या प्रेमात पडतात. नायक लोकांना खेळाकडे आणतात. त्यानंतर त्यांना खेळाचे सौंदर्य कायमचे बांधून ठेवते. म्हणूनच फुटबॉलचा हा विरोधाभास कधीच संपणार नाही. पोस्टरवरील चेहरे बदलतील. आज मेस्सी-रोनाल्डो आहेत. उद्या एम्बाप्पे, हालंड किंवा आणखी कोणी असेल; पण प्रत्येक विश्वचषक पुन्हा एकदा सिद्ध करेल की, जगाला फुटबॉलइतकाच त्याचा नायकही हवा असतो.
कारण, शेवटी विश्वचषकाची ट्रॉफी एका कर्णधाराच्या हातात दिसते; पण त्या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी अकरा खेळाडूंची पराकोटीची मेहनत, लाखो चाहत्यांच्या भावना आणि एका सुपरस्टारचे स्वप्न हे तिन्ही तितकेच आवश्यक असतात. फुटबॉलची खरी जादू याच संतुलनात आहे. म्हणूनच हा खेळ केवळ खेळ राहत नाही, ती जगाला जोडणारी, नायक घडवणारी आणि प्रत्येक चाहत्याला एखाद्या देशाशी नव्हे, तर एका स्वप्नाशी जोडणारी सार्वत्रिक भाषा बनते.
....जग जिंकणारे पाय आणि मने जिंकणारे चेहरे यापुढेही अशाच रितीने उलगडत जाणार आहेत, हाच याचा मथितार्थ!