AI Warning | ‘एआय’च्या इशार्‍यांमागचे खरे इंगित काय?

AI Warning |
AI Warning | ‘एआय’च्या इशार्‍यांमागचे खरे इंगित काय?
Published on
Updated on

महेश कोळी, आय.टी. तज्ज्ञ

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत गेल्या दीड-दोन वर्षांत व्यक्त होणारी भीती आता या तंत्रज्ञानाचा विकास करणार्‍या कंपन्यांचे प्रमुख आणि संशोधकच अधिक तीव्रपणाने मांडत आहेत. गेल्या काही दिवसांत या महारथींकडून दिल्या गेलेल्या इशार्‍यांमुळे जगभरात खळबळ माजली आहे; पण प्रगत एआयमुळे मानवी प्रजातीवर संक्रांत येण्याची शक्यता असताना कंपन्या त्यांचा विकास का करत आहेत, असा प्रश्न पडतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात गेल्या काही महिन्यांत एक विचित्र विरोधाभास दिसत आहे. ज्या कंपन्या अधिक शक्तिशाली एआय मॉडेल तयार करण्यासाठी अब्जावधी डॉलर ओतत आहेत, त्याच कंपन्यांचे प्रमुख आता या तंत्रज्ञानाचा वेग कमी करण्याची भाषा बोलत आहेत. काही महिन्यांपूर्वी चर्चा होती ती एआयमुळे किती रोजगार जातील याची. त्यानंतर हे संकट लगेच येणार नाही, असे सांगितले गेले. आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे ‘रिकर्सिव्ह सेल्फ इम्प्रूव्हमेंट’ अर्थात आरएसआय. म्हणजे एआयने पुढच्या पिढीतील अधिक सक्षम एआय विकसित करण्याच्या प्रक्रियेत स्वतःच निर्णायक भूमिका घेणे. अशा प्रक्रियेचा वेग मानवी नियंत्रणाच्या पलीकडे गेला, तर काय होईल, हा प्रश्न आता या उद्योगातील महारथी विचारत आहेत.

अँथ्रॉपिकने या विषयावर १५४ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. ओपन एआयच्या मुख्य वैज्ञानिकाने जवळपास ३,००० शब्दांचा निबंध लिहिला आणि अँथ्रॉपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमोडेई यांनी आणखी सुमारे ३,८०० शब्दांत आपली भूमिका मांडली. सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क यांनीही अशा चिंतेशी सहमती दर्शवली. या सर्व प्रस्तावांमधून पुढे आलेला तुलनेने ठोस उपाय म्हणजे अधिक शक्तिशाली मॉडेल विकसित करण्यापूर्वी अनिवार्य सुरक्षा निकष लागू करणे आणि स्वतंत्र लेखापरीक्षक, सरकारी यंत्रणा व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांची तपासणी करून घेणे.

यातील धोका पूर्णतः काल्पनिक म्हणून उडवून लावता येणार नाही. अँथ्रॉपिकने यापूर्वी सांगितले होते की, त्याच्या उत्पादन व्यवस्थेत समाविष्ट होणार्‍या कोडपैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक कोड क्लॉडच्या मदतीने लिहिला जातो. कंपनीच्या मते एआयच्या साहाय्याने अभियंत्यांचे उत्पादनही अनेक पटींनी वाढले आहे. याचा अर्थ आज एआय स्वतःहून पुढील एआय तयार करीत आहे, असा होत नाही; मात्र एआय संशोधन, कोडिंग, चाचणी आणि पुढील मॉडेलच्या विकासात मशिनची भूमिका झपाट्याने वाढत आहे. याहून अधिक अस्वस्थ करणारा प्रश्न वेगळा आहे. इतका गंभीर धोका खरोखरच समोर दिसत असेल, तर उद्योगाची प्रत्यक्ष कृती त्याच्या इशार्‍यांशी जुळते का? आकडे त्याचे सरळ उत्तर देत नाहीत. २०२६च्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिकेच्या ग्रोथ इक्विटी क्षेत्रात १०० दशलक्ष डॉलरपेक्षा मोठ्या ३३६ व्यवहारांतून ३७२ अब्ज डॉलर उभारले गेले. त्यातील जवळपास ७५ टक्के पैसा ओपन एआय, अँथ्रॉपिक, एक्सएआय आणि प्रोमिथियस या चार कंपन्यांनी खेचला. या पैशाचा मोठा भाग संशोधकांची संख्या वाढवण्यापेक्षा प्रचंड संगणकीय क्षमता उभारण्यासाठी वापरला जात आहे.

त्यामुळे बोलण्यात ‘वेग कमी करा’ आणि व्यवहारात अधिक डेटा सेंटर, अधिक चिप्स, अधिक संगणकीय शक्ती आणि अधिक सक्षम मॉडेल यांची स्पर्धा, हा विरोधाभास दुर्लक्षित करता येत नाही. उद्योगातील इशार्‍यांमागे खरोखर सुरक्षेची चिंता आहे की त्यातून दुसरे व्यावसायिक हित साधले जात आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या कंपन्यांना आधीच मिळालेली आघाडी कायम ठेवण्यासाठी कठोर प्रवेश अडथळे निर्माण करणे, नव्या स्पर्धकांसाठी सुरक्षा अनुपालनाचा खर्च वाढवणे, सायबर सुरक्षेच्या नव्या उत्पादनांना बाजार तयार करणे किंवा खासगी भांडवल उभारणीला मर्यादा येऊ लागल्यावर उद्योगाचा वेग नियंत्रित करणे अशी रणनीती हेतूपुरस्सर राबवत नाहीत ना, अशी शंका घेण्यास वाव आहे.

संशोधकांच्या पातळीवरही तितकाच गुंतागुंतीचा प्रश्न आहे. जेकब कॉक्सन यांनी ओपन एआय सोडल्यानंतर अँथ्रॉपिकमध्ये प्रवेश केला आणि आता अँथ्रॉपिकही सोडले. दोन्ही कंपन्या स्वयंसुधारणा करणार्‍या अतिबुद्धिमान एआयच्या दिशेने धावत असून मानवाच्या भवितव्याशी जुगार खेळत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या पोस्टला २४ तासांत १००० दशलक्ष व्ह्यूज मिळाल्याचे टीओआयने नमूद केले आहे. त्यांच्या एका माजी सहकार्‍याने पुढील १० वर्षांत एआयमुळे मानवजातीचा विनाश होण्याचा धोका १० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा वैयक्तिक अंदाज व्यक्त केला. अशा टक्केवारीला स्थापित वैज्ञानिक निष्कर्ष समजणे चुकीचे ठरेल; ती संबंधित संशोधकाची जोखीम आकलनावर आधारित मते आहेत.

याबाबत सामान्य माणसाचा प्रश्न रास्त ठरतो. एखाद्या तंत्रज्ञानामुळे मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका आहे, असे त्यावर प्रत्यक्ष काम करणारे संशोधक सांगत असतील, तर त्याच तंत्रज्ञानाची क्षमता वाढवण्याचे काम ते का सुरू ठेवतात? आणि हा धोका सरकारांना विश्वसनीय वाटत असेल, तर नियम कंपन्यांच्या स्वेच्छेवर का सोडले जात आहेत, हे प्रश्न अनाठायी नाहीत. एआयविषयी भीती निर्माण करणे किंवा धोका नाकारणे, या दोन्ही टोकांपासून सार्वजनिक धोरणाला दूर राहावे लागेल. उद्योगप्रमुखांच्या विधानांपेक्षा कंपन्या प्रत्यक्षात किती संगणकीय क्षमता वाढवत आहेत, कोणत्या सुरक्षा चाचण्या बंधनकारक आहेत, स्वतंत्र तपासणीला किती प्रवेश दिला जातो आणि धोक्याची ठरावीक पातळी ओलांडल्यास मॉडेलचे प्रशिक्षण थांबवण्याची अंमलबजावणीयोग्य व्यवस्था आहे का, यावर लक्ष ठेवणे अधिक उपयुक्त ठरेल. अब्जावधी डॉलरची स्पर्धा सुरू ठेवून त्याच वेळी जगाला सावध राहण्याचा सल्ला देणे हा विरोधाभास फार काळ स्पष्टीकरणाविना चालणार नाही.

मानवी नैतिकता आणि तंत्रज्ञानाचा विस्तार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियंत्रणाबाबत जगभरात उफाळून आलेला हा वाद मानवी नैतिकतेची आणि तंत्रज्ञानाच्या अमर्याद विस्ताराची कसोटी पाहणारा आहे. एका बाजूला अब्जावधी डॉलरच्या भांडवलावर उभी असलेली कॉर्पोरेट शर्यत आणि दुसरीकडे मानवी अस्तित्वाच्या संभाव्य धोक्यांची दिलेली ही इशार्‍यांची झालर, यामुळे एआयच्या भविष्याविषयी प्रचंड संदिग्धता निर्माण झाली आहे. अमेरिकन भांडवली बाजारातही त्याचे पडसाद उमटले आहेत. बाजारातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सुरक्षेचा बागुलबुवा उभा करायचा आणि पडद्यामागे प्रचंड संगणकीय क्षमता वाढवत राहायची, या उद्योगाच्या दुटप्पी धोरणावर आता ठोस नियंत्रण आणण्याची वेळ आली आहे. कंपन्यांनी स्वतःहून आखलेल्या स्वेच्छानियमांवर विसंबून न राहता जागतिक पातळीवर अंमलबजावणीयोग्य, पारदर्शक आणि कठोर कायदेशीर चौकट उभारणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा विकास मानवी कल्याणासाठी असावा की तेच मानवी नियंत्रणाच्या पलीकडे जाऊन एका नव्या आव्हानाला जन्म देईल, याचा निर्णय केवळ मूठभर तंत्रज्ञान कंपन्यांच्या हाती सोडून चालणार नाही. धोरणकर्त्यांनी व्यापारी हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन, भविष्यातील संभाव्य जोखमींचे अचूक आकलन करून या अभूतपूर्व तंत्रज्ञानाला वेळेतच शिस्तबद्ध आणि जबाबदार चौकटीत आणणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news