Water Budget | वॉटर बजेटवर बोलू काही...

Water Budget |
Water Budget | वॉटर बजेटवर बोलू काही...
Published on
Updated on

डॉ. मंगेश कश्यप

आपण सर्व प्रपंचात किंवा आपल्या संसारात अनेक गोष्टी खरेदी करत असताना आपलं त्यासंदर्भात बजेट ठरवतो. आपलं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करतो. असाच ताळमेळ नैसर्गिक साधन संपत्तीबद्दल आपल्याला घालायला लागतो. वॉटर बजेट म्हणजे एखाद्या ठरावीक क्षेत्रात किंवा घरात किती पाणी येते आणि किती पाणी वापरले जाते, याचा हिशेब ठेवणे.

जसे आर्थिक बजेटमध्ये उत्पन्न आणि खर्च असतो, तसेच वॉटर बजेटमध्ये पाण्याची आवक (Input) व पाण्याचा वापर (Output) असतो. या वर्षी अल निनोचा प्रभाव जास्तच जाणवणार आहे. त्याचा गंभीर परिणाम आपल्या मान्सूनवर होणार आहे, याचे भाकीत आपल्या हवामान खात्याने आधीच वर्तवून आपल्याला सावध केले आहे. तेव्हा आपल्याला पंतप्रधानांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला पाण्याचा कमीत कमी वापर करून अथवा पूर्ण क्षमतेने, पाणी वाया जाऊ न देता वापर करून जल संपत्तीचं संवर्धन करावे लागणार आहे. आता या वॉटर बजेटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, ते आपण या पावसाच्या महिन्यात पाहणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, पाण्याचे शास्त्र, ज्याला आपण वैज्ञानिक भाषेत हायड्रोलॉजी असे म्हणतो. पाण्याच्या अद़ृश्य यात्रेचा अनुबंध म्हणजे हायड्रोलॉजीची गोष्ट.

कधी विचार केला आहे का, की तुम्ही आज जे पाणी पिता, ते कदाचित कोट्यवधी वर्षांपूर्वी एखाद्या डायनोसॉरच्या शरीरातून गेलेले असेल? हो, हे खरे आहे! पृथ्वीवरील पाणी कुठेही नाहीसे होत नाही. ते फक्त रूप बदलते. कधी पाऊस, कधी नदी, कधी भूजल, कधी वाफ. या सतत चालणार्‍या प्रवासाला आपण ‘जलचक्र’ म्हणतो आणि या जलचक्राचा अभ्यास करणार्‍या शास्त्राला म्हणतात हायड्रोलॉजी. हायड्रोलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे. ‘हायड्रो’ म्हणजे पाणी आणि ‘लॉजी’ म्हणजे शास्त्र. थोडक्यात, पाण्याचे शास्त्र! पण, हे केवळ ‘पाणी कुठे जाते’ एवढ्यापुरते मर्यादित नाही. पाणी किती वेगाने वाहते, जमिनीत किती मुरते, किती बाष्पीभवन होते, पाण्याचे वितरण कसे होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हायड्रोलॉजी देते.

जलचक्र - निसर्गाचा अनोखा चक्रीय खेळ

जलचक्र म्हणजे पाण्याचा एक न थांबणारा प्रवास. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या, तलावांमधून पाण्याचे बाष्पीभवन होते. हे वाफेचे ढग बनतात आणि वार्‍यासोबत प्रवास करतात. डोंगराळ भागांवर किंवा थंड हवामानात हे ढग थंड होऊन पाऊस किंवा बर्फ म्हणून पडतात. हे पाणी नद्यांमधून वाहत पुन्हा समुद्रात मिळते, काही जमिनीत मुरते आणि भूजल बनते आणि मग पुन्हा बाष्पीभवन... हे चक्र असेच चालू राहते, कधीही न थांबता.

एक मजेशीर गोष्ट - पृथ्वीवर एकूण पाण्यापैकी फक्त 3 टक्के पाणी गोडे (षीशीहुरींशी) आहे आणि त्यातील 70 टक्के बर्फ स्वरूपात ध्रुवांवर आणि हिमनद्यांमध्ये आहे. म्हणजे आपण वापरतो ते पाणी एकूण पाण्याच्या केवळ 0.9 टक्के आहे. किती चिंताजनक आहे ना?

वॉटर बजेटशी हायड्रोलॉजीचा संबंध

वॉटर बजेट समजण्यासाठी हायड्रोलॉजी हा पाया आहे. एखाद्या शेतात किंवा गावात पाण्याचे बजेट तयार करायचे असेल, तर आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे की, या भागात किती पाऊस पडतो? किती पाणी जमिनीत मुरते? किती वाहून जाते? किती बाष्पीभवन होते?

हायड्रोलॉजीचे सूत्र असे आहे

पाऊस = बाष्पीभवन + वाहून जाणारे पाणी + जमिनीत मुरलेले पाणी + साठवलेले पाणी. हेच वॉटर बजेटचे मूळ तत्त्व आहे

पुण्यातील पाणी - एक व्यावहारिक उदाहरण

पुणे शहराचा विचार करा. खडकवासला धरणातून पुण्याला पाणीपुरवठा होतो. हायड्रोलॉजिस्ट सतत अभ्यास करतात की, मुळा-मुठा नदीच्या खोर्‍यात किती पाऊस पडतो, धरणात किती पाणी येते, किती बाष्पीभवन होते, किती गळती आहे. या सगळ्याच्या आधारे पुण्याला पुढील वर्षी किती पाणी मिळेल, याचा अंदाज बांधला जातो.

हवामान बदल आणि हायड्रोलॉजी

आजच्या काळात हायड्रोलॉजी आणखी महत्त्वाची झाली आहे. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण आणि वेळ बदलत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दीर्घकाळ दुष्काळ. कोकणात आलेला महाप्रलय असो किंवा मराठवाड्यातील वारंवार पडणारा दुष्काळ, हे सगळे हायड्रोलॉजीशी निगडित आहे.

हायड्रोलॉजिस्ट आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची उपलब्धता अधिक अचूकपणे सांगू शकतात. ISRO चे उपग्रह भारतातील नद्यांचे पाणी, भूजल पातळी यांचे सतत निरीक्षण करतात.

रोजच्या जीवनातील हायड्रोलॉजी

हायड्रोलॉजी फक्त शास्त्रज्ञांसाठी नाही. जेव्हा तुम्ही बातमीत ऐकता ‘धरण 90 टक्के भरले’ किंवा ‘भूजल पातळी खालावली’ ही हायड्रोलॉजीच आहे. शेतकरी जेव्हा पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करतो, विहीर खणायची जागा ठरवतो ही अनुभवजन्य हायड्रोलॉजी आहे.

थोडक्यात, पाणी जीवसृष्टीला जगवते आणि हायड्रोलॉजी पाण्याला जगवते. या शास्त्राशिवाय आपण पाण्याचे नियोजन करू शकत नाही. म्हणूनच वॉटर बजेट समजायचे असेल, तर हायड्रोलॉजी समजणे अत्यावश्यक आहे. पुढच्या वेळी पाऊस पडेल तेव्हा त्या थेंबांचा विचार करा. हे थेंब कुठून आले, कुठे जाणार आहेत? तुम्हीही एक छोटे हायड्रोलॉजिस्ट आहात!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news