शरद देऊळगावकर (ज्येष्ठ पत्रकार)
मानवत हत्याकांडावर आधारित वेबसीरिज लवकरच येत आहे. त्यामुळे पन्नास वर्षांनंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या पिढीला या घटनेबद्दल माहीत असण्याची शक्यता नाही. काय आहे हे मानवत हत्याकांड प्रकरण?
गुप्तधन आणि अपत्यप्राप्ती या दुहेरी हेतूसाठी अंधश्रद्धेचा आधार घेऊन सहा ते दहा वर्षांच्या कुमारिकांचे खून करून, त्यांच्या शरीराच्या विशिष्ट भागाचे मांस व रक्त काढून ते देवतेला अर्पण करण्याचा भयाण प्रकार परभणी जिल्ह्यातील व्यापारी पेठ असलेल्या मानवतमध्ये 1972 ते 1974 या कालावधीत घडला होता. एक-दोन नव्हे, तर सात कुमारिकांचे निष्कारण बळी गेले. लोकांच्या मनात या खून मालिकेबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, पोलिसांच्या तपासणी दिशेला हूल द्यावी म्हणून अन्य चार महिलांचे आणि एका मुलाचा, असे एकूण 12 जणांचे खून केले गेले. भीती आणि दहशत काय असते, याचा अनुभव या काळात मानवत आणि परिसरातील लोकांनी घेतला. त्या काळात संध्याकाळ झाली की, सर्व शहर चिडिचूप होई. परगावातले नातेवाईकसुद्धा भीतीपोटी मानवतमध्ये जाण्यास घाबरत असत. अन्यत्र गावी जाणारे बसमधील प्रवासीसुद्धा, मानवत शहरातून बस जात असताना बसच्या खिडक्या लावून घेत असत. इतकेच नव्हे, तर सहा किलोमीटर अंतरावरील मानवत रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडीतील प्रवासी काचेच्या खिडक्या बंद करून काचेतून मानवत शहराच्या दिशेने पाहत असत. आज ही बाब कदाचित काही जणांना अतिशयोक्तीपूर्ण वाटेल; पण हे खरे आहे.
मानवत खून मालिका हे प्रकरण मानवत शहरातील राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा लाभलेले, माजी नगराध्यक्ष उत्तमराव बाराहाते आणि त्यांची रखेली रुक्मिणी भागोजी काळे यांच्याभोवती वलयांकित झालेले होते. ते या खटल्याच्या दोषारोपपत्रातील 16 आरोपींपैकी एक आणि दोन क्रमांकाचे आरोपी होते. त्यातील 13 जण रुक्मिणी भागोजी काळे यांचे वडील, बहिणी-भाऊ, तसेच अन्य जवळचे नातेवाईक होते. परभणी जिल्हा सत्र न्यायाधीश ना. शं. मानधने यांच्या न्यायालयात 18 ऑगस्ट 1975 रोजी या खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ झाला.
या प्रकरणातील माफीचा साक्षीदार गणपत साळवे याने आपल्या साक्षीत आरंभी सांगितले की, मुंजाखाली असलेले गुप्तधन पाहिजे असेल, तर कुमारिकांच्या गुप्तांग रक्ताची रुजुता व्हायला पाहिजे. त्यानुसार पुढील घटना घडत गेल्या. माफीचा दुसरा साक्षीदार शंकर काटे याने चार खून कसे झाले, कसे केले हे आपल्या साक्षीत सांगितले. चौथा खून दहा वर्षांच्या नसीमा बेगमचा करण्यात आला. त्या घटनेबाबत शंकरने सांगितले की, पिठाच्या गिरणीतून दळण घेऊन जाणारी ती पोरगी होती. तिचा पाठलाग बैलगाडीतून करत तिला गाठले. बैलगाडीत तिला घेऊन तिच्या तोंडात धोतराचा बोळा कोंबला. बैलगाडी ओढ्यामध्ये येताच तिचे तोंड दाबून तिला खाली उतरविले. तिचा गळा दाबला. चाकूने तिच्या छातीचा भाग कापला. उजव्या हाताची करंगळी कापली आणि तिचे मुंडके कापून धडावेगळे केले अन् ते धोतरात बांधले आणि मृतदेह तसाच ओढ्यात टाकून दिला. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी असलेला एकमेव साक्षीदार उमाजी पितळे याने आपल्या साक्षीत, एकाच वेळी तिघींचा (एक आई आणि तिच्या दोन मुली) 4 जानेवारी 1974 रोजी कसे खून केले, एक वर्षाच्या मुलीचे पाय धरून दगडावर डोके कसे आपटले ते आपल्या साक्षीत सांगितले. असा हा कू्ररतेचा कळस मानवत हत्याकांडात गाठला गेला होता.
जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्ती मानधने यांनी 20 नोव्हेंबर 1975 रोजी या खटल्याचा निकाल दिला. त्यात रुक्मिणी भागोजी काळे, उत्तमराव जिवाजी बाराहाते आणि सोपान थोटे या तिघांना फाशीची शिक्षा आणि दगडू, देव्या, सुकल्या, वामनअण्णा या चौघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अन्य नऊ जणांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले. मुंबई उच्च न्यायालयात याच खटल्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन 8 मार्च 1976 रोजी निकाल देण्यात आला. त्यात रुक्मिणी भागोजी काळे आणि उत्तमराव जिवाजी बाराहातेची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच सोपान थोटे याची फाशीची शिक्षा कायम ठेवून दगडू देव्या, सुकल्या वामन या चौघांना जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यासंदर्भात दगडू भागोजी काळे आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल 19 एप्रिल 1977 रोजी लागून रुक्मिणी आणि उत्तमराव यांना उच्च न्यायालयातील निर्दोष मुक्ततेचा आदेश कायम ठेवण्यात आला. सोपान, दगडू, देव्या, सुकल्या या चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि वामन यास निर्दोष मुक्त केले. मानवत हत्याकांड सुमारे सहा वर्षांच्या कालावधीत गाजत होते.
या हत्याकांडाचा खटला न्यायालयात सुरू झाला तेव्हा दैनंदिन सुनावणीचा वृत्तांत वार्ताहर या नात्याने मी देत होतो. या निकालानंतर हा इतिहास सर्वसामान्य जनता आणि वाचकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावा, या हेतूने खटल्याच्या मी दिलेल्या न्यायालयीन वृत्तांताचे ‘मानवत हत्याकांड’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले.
अंधश्रद्धेच्या होमकुंडात काहीही संबंध नसलेल्या निष्पाप बारा जीवांच्या आहुत्या देऊन, शेवटी हाती काय आले? गुप्तधन मिळाले? त्याचे उत्तर मिळत नाही. रुक्मिणीला मूलबाळ होत नव्हते का? याही प्रश्नाचे उत्तर उत्तमराव बाराहाते याने एका मुलाखतीत दिले. ‘1965 मध्ये रुक्मिणीला माझ्यापासून मुलगा झाला होता; पण तो लहानपणीच वारला. त्यानंतर मानवत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काही वर्षांनी 1980 मध्ये रुक्मिणीला माझ्यापासून मुलगी झाली.’
मानवत आणि परिसरातील सर्व वातावरण स्थिरस्थावर झाल्यावर, पंधरा वर्षांनंतर उत्तमराव बाराहाते याची मानवत येथे 26 ऑगस्ट 1989 रोजी भेट घेऊन काही दैनिकांसाठी मुलाखत घेतली. ती मुलाखत ‘मानवत हत्याकांड’ या पुस्तकाच्या दुसर्या सुधारित आवृत्तीत 2013 मध्ये प्रकाशित केली. या मुलाखतीत उत्तमराव बाराहाते याने आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी मनमोकळेपणाने सांगितल्या. त्यात मानवत खून मालिकेच्या संदर्भात प्रश्न विचारला असता, तो म्हणाला की, ‘केवळ पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी चार माणसे फासावर चढविण्यात आली. माझ्याजवळ पैसा नसता तर मीही फासावर लटकलो असतो. मी निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी मला साडेचार लाख रुपये खर्च झाला.’ उत्तमराव बाराहाते याचे वयाच्या 92 व्या वर्षी मानवत येथे 30 नोव्हेंबर 2011 रोजी निधन झाले.
मानवत खून मालिकेस पन्नास वर्षे होऊन गेली; परंतु त्यातील काही प्रश्नांची उकल अद्याप झालेली नाही. खरोखरच या मालिकेतील सर्व गुन्हेगार पोलिस तपासात निष्पन्न झाले काय? कारण याप्रकरणी एकूण नऊ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी आठ गुन्हे एकत्र करून एकच दोषारोपपत्र सेलूच्या न्यायालयात 19 जून 1974 रोजी दाखल करण्यात आले होते. कोंडीबा रुळे खूनप्रकरणी स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
जे आठ गुन्हे एकत्रित करून एकच दोषारोपपत्र दाखल केले होते; त्यातील हालिमा, कलावती बोंबले, पार्वती बाराहाते आणि आरिफाबी यांचे मारेकरी पोलिसांच्या हाती लागले का? यांच्या हत्येबाबत कोणाला शिक्षा झाली? कारण पहिल्या चार गुन्ह्यांत (गया, शकिला, सुगंधा आणि नसिमा बेगम हत्या प्रकरणात) सोपान थोटे व शंकर काटे सहभागी होते. त्या दोघांपैकी शंकर काटे माफीचा साक्षीदार झाला. त्याला माफी मिळाली आणि सोपान थोटे यास फाशीची शिक्षा झाली. 4 जानेवारी 1974 रोजी झालेल्या तिहेरी खून प्रकरणात दगडू, देव्या, सुकल्या यांच्या सहभागाचे पुरावे सिद्ध झाले म्हणून त्यांना फाशीची शिक्षा झाली. याचा अर्थ असा की, आठपैकी दोन गुन्ह्यांचे तपास लागून गुन्हेगारांना शिक्षा झाली. बाकीच्या गुन्ह्यांचे व गुन्हेगारांचे काय झाले, याबाबत निर्माण झालेला संभ्रम लोकांच्या मनात अजूनही कायम आहे.