Water consumption | पाण्याचा वापर लोकसंख्येहून जास्त

Water consumption
Water consumption | पाण्याचा वापर लोकसंख्येहून जास्त
Published on
Updated on

डॉ. मंगेश कश्यप

भूराजकीय स्थितीत भारतात मोठ्या प्रमाणामध्ये युवाशक्ती उपलब्ध आहे. त्या युवाशक्तीला निसर्गाकडे वळवून नदीशी, जलस्रोतांशी जोडलं पाहिजे. त्यासाठी सर्व स्तरावर नियोजनपूर्वक प्रयत्न 2047 पर्यंत करावा लागेल, तरच आपण विकसित भारत होण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य करू शकू. जलसंपत्तीचा विकास व त्याचा संयमित योग्य वापर करून देशासाठी अन्नसुरक्षा, पेयजलसुरक्षा तसेच शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आपण नियोजनबद्ध जीवनशैली विकसित करायला हवी. त्यामुळेच पर्यावरणाची हानी कमी होईल. शुद्ध हवा, स्वच्छ पिण्याचे पाणी या दोन्ही गोष्टी आपल्या उत्तम राष्ट्रीय आरोग्याशी निगडित आहेत आणि ज्याचे आरोग्य उत्तम त्यांचे अर्थकारणही उत्तम. त्या देशातले नागरिकही उत्तम आणि त्यांचा हॅपीनेस इंडेक्ससुद्धा उत्तम...

असं जर आपल्याला घडवायचं असेल, तर आपल्याला सर्व जलसंपत्तीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. यापुढे आपणा सर्वांना नदी नैसर्गिक प्रवाहानुसार कशी वाहत राहील, तिचं प्रदूषण कसं नष्ट करून सर्व नद्यांतील पाण्याचा रंग पूर्वीसारखा नितळ, निर्मळ निळा असा कसा करता येईल, या संदर्भामध्ये खूप काम करावं लागणार आहे. हे आव्हान सोपं नाही. बदलत्या जागतिक परिस्थितीत आपण सर्वांनी मिळून, जर हे आव्हान पेलले आणि त्याप्रमाणे कृती केली, तरच जलस्रोतांच्या पाण्याचा रंग बदलून आपण म्हणू शकू पाण्या तुझा रंग कसा? फार वर्षांपूर्वी होता तसा!! मागील लेखात आपण पाण्याविषयी विविध रंजक माहिती जाणून घेतली. त्यातल्याच अजून महत्त्वाची बाबी आपण जाणून घेऊ या..

पाणी हा विषय सर्वस्पर्शी असल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये त्याचे स्थान तर अनन्यसाधारण आहे, तरीही आपण त्याच्याकडे किती डोळसपणे पाहतो, हा विचार प्रत्येकाने आपल्या मनाशीच करून पाहायला हवा. पाण्याच्या क्षेत्रामध्ये गेले तीन-चार दशके काम केल्यानंतर मला जाणवले की, सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणावणार्‍या लोकांमध्ये पण पाण्याशी निगडित प्रश्नांबाबत बरेचसे अज्ञान आहे व काहीशी अनास्थाही आहे. कदाचित ‘अतिपरिचयात अवज्ञा’ असे होत असेल. त्यामुळेच पाणी म्हणजे जलसंपत्ती आणि सुरक्षित जलसंपत्ती म्हणजेच राष्ट्राचा विकास. कारण, पाण्यावरच आपला आर्थिक, भौतिक विकास अवलंबून आहे आणि जलसंपत्तीचा विकास हा फार महत्त्वाचा भाग आहे. जलसंपत्तीचा वापर आणि व्यवस्थापन अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. सर्वसामान्य सुशिक्षित माणसाला असे वाटत असते की, पाणी आपण कसेही वापरले तरी चालेल; पण मित्रांनो हा आपला गोड गैरसमज आहे. पाणी ही जबाबदारीने वापरण्याची गोष्ट आहे, ज्याला युनायटेड नेशनच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये ‘रिस्पॉन्सिबल कंझमशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस’ अशी संज्ञा दिलेली आहे. या लेखमालेचा उद्देशच मुळामध्ये सर्वसामान्य वाचकाला, अभ्यासकांना, शासकीय, अर्धशासकीय यंत्रणांना, स्वयंसेवी संस्थांना आणि पाण्याच्या संदर्भामध्ये विविध प्रश्न हाताळणार्‍या जिज्ञासूंना काही गोष्टींकडे निर्देश करत आपलंही जलज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करण्याचा आहे. आपल्याला असे वाटते की, फक्त आपल्याकडेच पाणी टंचाई आहे; पण खरं तर असे आहे की, जगभरात पाणी टंचाई निर्माण होते आहे आणि त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर तसेच आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. काय आहेत ते परिणाम हे थोडक्यात पाहू गेल्यास जे दिसते ते चित्र असे आहे...

जगभरातील पाणी टंचाई

दर तासाला 200 मुलांचा मृत्यू दूषित पाण्यामुळे होतो.

जगात 748 दशलक्ष लोक असे आहेत, ज्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही आणि दरवर्षी ही संख्या वेगाने वाढत आहे.

जगभरातील 1.8 अब्ज लोक विष्ठा दूषित पाणी पितात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) मूलभूत स्वच्छता आणि अन्न स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज दोन गॅलन आणि प्रतिव्यक्ती वापरासाठी किमान पाच गॅलनची शिफारस केलेली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या माता आणि मुले चंद्राच्या 16 फेर्‍यांइतके ट्रेक करतात आणि दररोज पाणी गोळा करतात. केवळ आफ्रिकन लोक वर्षाकाठी 40 अब्ज मानवी तास पाणी गोळा करण्यासाठी व्यतीत करतात.

मागील शतकाच्या तुलनेत लोकसंख्येच्या वाढीपेक्षा पाण्याचा वापर दुप्पट वाढला आहे.

चार लोकांच्या कुटुंबाच्या एका दिवसाच्या अन्नासाठी अंदाजे 6,800 गॅलन पाणी लागते.(जल पदचिन्ह या विषयी एक स्वतंत्र लेख या शृंखलेत येणार आहेच.)

इ.स.पूर्व 3000 पासून ते आजपर्यंत पाण्याच्या संघर्षांचे अनेक छोटी-मोठी उदाहरणे आपण पाहतो. ते संघर्ष असेच चालत राहिले, तर पाण्यावरून येत्या भविष्यात मोठा उद्रेक होईल आणि युद्धजन्य परिस्थितीचा सामना करावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news