

कावेरी गिरी
जगभरात 26 एप्रिल हा दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी बुद्धिमत्ता, कल्पकता आणि नावीन्यपूर्ण विचारांचा गौरव करणारा हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला, उद्योग आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांमध्ये निर्माण होणार्या नवकल्पना आणि शोध यांचे संरक्षण करण्यासाठी बौद्धिक संपदा हक्कांची संकल्पना उदयास आली.
बौद्धिक संपदा म्हणजे मानवी मेंदूच्या कष्टातून आणि कल्पकतेतून निर्माण झालेली अमूल्य मालमत्ता होय. एखादी नवीन कल्पना, संशोधन, साहित्यिक कृती, संगीत, चित्रकला, सॉफ्टवेअर, औद्योगिक डिझाईन किंवा एखादे ब्रँड नाव या सर्व गोष्टी बौद्धिक संपदेच्या कक्षेत येतात. या संपदेचे संरक्षण करण्यासाठी पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि औद्योगिक डिझाईन यांसारखे विविध कायदेशीर हक्क अस्तित्वात आहेत. या हक्कांमुळे क्रिएटिव्ह पर्सनला त्याच्या निर्मितीवर मालकी हक्क मिळतो आणि त्याच्या कल्पनांचा गैरवापर होण्यापासून संरक्षण मिळते. त्यामुळे सर्जनशीलतेला योग्य सन्मान आणि प्रोत्साहन मिळते.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात नावीन्य हेच यशाचे खरे गमक ठरले आहे. उद्योग क्षेत्रात असो वा शिक्षण क्षेत्रात नवीन, वेगळ्या आणि उपयुक्त कल्पनांना अधिक महत्त्व दिले जाते. एखाद्या उत्पादनात किंवा सेवेत असलेली नावीन्यपूर्णता ग्राहकांना आकर्षित करते आणि त्या माध्यमातून उद्योगाची प्रगती साधली जाते. उदाहरणार्थ, तंत्रज्ञान क्षेत्रात सतत नवनवीन अॅप्स, सॉफ्टवेअर आणि डिजिटल सेवा विकसित होत आहेत, ज्यामुळे मानवी जीवन अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे बौद्धिक संपदा हक्क ही केवळ कायदेशीर चौकट नसून आर्थिक विकासाचे प्रभावी साधन बनले आहे.
भारतासारख्या देशात बौद्धिक संपदेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. आपल्या देशात प्रतिभावान तरुणांची मोठी संख्या आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये संशोधन व नवकल्पनांची मोठी क्षमता आहे. स्टार्टअप संस्कृतीच्या वाढीसोबत अनेक तरुण उद्योजक नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित उद्योग उभारत आहेत. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे नवकल्पनांना चालना मिळत आहे; मात्र या कल्पनांचे संरक्षण करण्यासाठी बौद्धिक संपदा हक्कांविषयी जागरूकता आणि त्यांचा योग्य वापर अत्यंत गरजेचा आहे. अन्यथा कल्पनांची चोरी होऊन क्रिएटिव्ह पर्सनला त्याचा योग्य लाभ मिळू शकत नाही.
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणार्या विकासामुळे बौद्धिक संपदेच्या संरक्षणासमोर नवी आव्हानेही निर्माण झाली आहेत. डिजिटल माध्यमांमुळे माहिती सहजपणे उपलब्ध होते; परंतु त्याचवेळी साहित्य, संगीत आणि चित्रपट यांची अनधिकृत प्रतिकृती तयार करून त्याचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेटवरील पायरसी ही एक गंभीर समस्या बनली आहे. यामुळे क्रिएटिव्ह पर्सनच्या आर्थिक हक्कांवर परिणाम होतो. त्यामुळे कायद्याबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येकाने क्रिएटिव्ह पर्सनच्या मेहनतीचा आदर करून बेकायदेशीर वापर टाळला पाहिजे. कल्पकता ही केवळ कलाकार किंवा शास्त्रज्ञ यांच्यापुरती मर्यादित नसते. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. दैनंदिन जीवनातील समस्यांवर नवे उपाय शोधणे, कामाच्या पद्धतीत सुधारणा करणे किंवा समाजोपयोगी कल्पना मांडणे या सर्व गोष्टी नावीन्याच्या कक्षेत येतात. त्यामुळे बौद्धिक संपदा ही संकल्पना सर्वसामान्य माणसाशी जोडलेली आहे आणि प्रत्येकाला तिचा लाभ घेण्याची संधी आहे.
आज जागतिक स्तरावर देशांची प्रगती त्यांच्या नवकल्पनांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. संशोधन आणि विकासावर भर देणारे देश आर्थिकद़ृष्ट्या अधिक सक्षम ठरत आहेत. त्यामुळे बौद्धिक संपदेचे संरक्षण हे राष्ट्रीय धोरणाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. भारतानेही या क्षेत्रात सकारात्मक पावले उचलली असून पेटंट प्रक्रियेला गती देणे, स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देणे यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर 26 एप्रिलचा दिवस आपल्याला एक प्रेरणादायी संदेश देतो, कल्पना करा, निर्माण करा आणि त्या जपा! सर्जनशीलतेला वाव देणे आणि नवकल्पनांचा सन्मान करणे हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, तर देशाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते.
बौद्धिक संपदा दिन साजरा करण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे, जनजागृती निर्माण करणे. अजूनही अनेकांना बौद्धिक संपदा हक्कांविषयी पुरेशी माहिती नाही. विशेषतः ग्रामीण भागात आणि लघुउद्योगांमध्ये या विषयाविषयी जागरूकतेचा अभाव दिसून येतो. योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून या घटकांना सक्षम करणे अत्यावश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कल्पनांना योग्य दिशा देणे, ही काळाची गरज आहे.