

श्रीराम ग. पचिंद्रे
प्रतिभावंत साहित्यिक, माडगूळकर घराण्याची धाकटी पाती व्यंकटेश माडगूळकर यांची जन्मशताब्दी नुकतीच सुरू झालेली आहे. त्यानिमित्त त्यांच्या साहित्यावर एक द़ृष्टिक्षेप...
मराठीत नवकथेचा आरंभ करणार्या आघाडीच्या लेखकांपैकी एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. ते सुमारे 22 वर्षांचे असताना माणदेशी मातीचा अस्सल गाभा आणि गंध घेऊन लिहिलेली व्यक्तिचित्रं ते लिहायला लागले. ही ‘माणदेशी माणसे’ प्रसिद्ध होऊ लागली, तसं समस्त मराठी वाचकांचं लक्ष या व्यक्तिचित्रांनी वेधून घेतलं. तो 1947-48 चा काळ होता. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या माडगूळकरांच्या कथा होत्या.
व्यक्तिचित्र किंवा माडगूळकरांच्या भाषेत ही शब्दचित्र असली, तरी त्यांचा आकृतिबंध हा कथेचा आहे. माणसाच्या वाढदिवशी किंवा श्रद्धांजलीच्या दिवशी जसे परिचय वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात, तशी ही व्यक्तिचित्र नव्हती. ही व्यक्तिचित्र माणदेशी माणसांच्या सगळ्या अस्सल वैशिष्ट्यांसह जिवंत होऊन येतात. यातलं एकही व्यक्तिचित्र सुटं किंवा एकटं नाही. त्या व्यक्तीबरोबर तिचा सगळा गोतावळा येतो, परिसर येतो, समाज येतो, दगड- माती, गवताची पाती, जनावरं किंबहुना किडामुंग्याही येतात. प्रवास वर्णन वगळता व्यंकटेश माडगूळकर यांचं समग्र साहित्य हे कथात्मक स्वरूपाचं आहे. त्यांच्या गावाकडच्या कथा तर ‘कथा’ आहेतच शिवाय व्यक्तिचित्र, कादंबरी, लेख, ललित लेख, जंगलाची वर्णनं या सगळ्यात कथा आहे. व्यंकटेशांना तात्या म्हटलं जात असे. तात्यांनी तारुण्यात कविताही लिहिल्या होत्या; पण मोठे भाऊ ‘गदिमा’ यांचा वारसा चालवणं इत्यादी भरीस न पडता त्यांनी स्वतःची वाट चोखाळली.
तात्यांचे लेखन हे लिहिणं कमी आणि सांगणं जास्त गावातल्या पिंपळाच्या पारावर बसून, ऐकणार्या लोकांना रंगवून गोष्टी सांगणारा एखादा शहाणा वृद्ध असतो, त्याप्रमाणं तात्या माडगूळकर मस्त रंगवत कथा सांगत जातात. म्हणून त्यांचं कोणतंही लेखन वाचताना वाचक तल्लीन होऊन जातात. कथन करणं, हे कथा या वाङ्मय प्रकाराचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य माडगूळकरांच्या एकूणच लेखनात पानोपानी आढळून येतं. ‘माणदेशी माणसे’ या पुस्तकाव्यतिरिक्त तात्यांच्या इतर अनेक कथासंग्रहांमध्ये विविध व्यक्तिचित्रं विखुरलेली आहेत. चित्रांच्या सोबतीनं कथन करणं हे चित्रकथकाचं कौशल्य माडगूळकरांच्या अगदी पहिल्या व्यक्तिचित्रापासून उमटलेलं दिसतं. ही शब्दांनी रंगवलेली चित्रं आहेत. उदाहरणच द्यायचं झालं, तर कोंडीबा गायकवाड याचं वर्णन पाहा : ‘तो आपल्या घराच्या जोत्यावर बसून तुटलेला आसूड नीट करीत होता. उघडाच. आपली काळी कातडी उन्हात तापवीत बसला होता. एखाद्या भाजलेल्या रेड्यासारखा. सांध्यात गाठाळलेल्या जाड बोटांनी आसूड नीट करताना त्याच्या दंडावरच्या बेडक्या मागे-पुढे हलत होत्या. गळ्यात पेटी. रुंद छाताडावर केसांचं जाळ. पिंडर्यांचे गोळेही तसेच वरवंट्यासारखे कठीण. कोंडीबा अंगापिंडाने भलताच थोराड. उग्र.’
या वर्णनातील ‘भाजलेला रेडा’, ‘दंडावरच्या बेडकुळ्या’, ‘रुंद छाताडावर केसांचा जाळ’ अशा शब्दप्रयोगातून कोंडीबा गायकवाडचं नेमकं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं. या चित्रनिर्मितीत कथन आहे आणि चित्रनिर्मितीही आहे. व्यंकटेश हे चित्रकारही होते. त्यांच्यातला चित्रकार आणि कथाकथनकार हे दोघेही त्यांच्या लेखनात अभिव्यक्त होतात. ‘ओझं’ या कथा संग्रहातलं एक व्यक्तिचित्र पाहा. हा आहे ‘गोविंदा कातकरी’. तो जंगलात राहणार्या कातकरी जमातीतला आहे. गोविंदा कातकर्याला उठाव देणारं दुसरं एक पात्र आहे, ते म्हणजे भाऊसाहेब चव्हाण. त्यांना शहरात राहून शिकारीची हौस दांडगी. त्यांचा शिकारीतला हुकमी एक्का म्हणजे गोविंदा. गोविंदा हा कातकर्यांचा नायक आहे. त्याचं चित्र रेखाटताना माडगूळकर लिहितात, ‘माणसांच्या जीवनात शिकारीपेक्षाआणखी काही जरुरीचे, महत्त्वाचे असते यावर गोविंदाचा विश्वास नाही. या एका ओळीत ते गोविंदाचं जीवन उभं करतात.
गोविंदाच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन ते करतात, ‘सारा जन्म जंगलात काढलेल्या गोविंदापाशी वाघाची नजर आहे, पिसोर्याची चपळाई आहे आणि डुकराचे बळ आहे. जंगलात सावजाच्या मागावर फिरताना त्याच्या अनवाणी पायाखाली कधी पाचोळा वाजत नाही, का दगड ठोकरला जात नाही. धक्का लागून झाडांच्या फांद्या हालत नाहीत, का अभावितपणे घशातून आवाज निघत नाही. सावली जावी तसा गोविंदा जंगलातून जातो... त्याची (वाघाची) सारी हुशारी, सारे कसब त्यापाशी आहे. माणसावर झडप घालणे तेवढे नाही.’ गोविंदा कातकरी जंगलात वावरतो, त्याचं वर्णन तात्या नेमकेपणाने करतात. त्याच्या बारीकसारीक तपशिलासह त्याचे चित्र रेखाटतात. बहिरंग आणि अंतरंग या दोन्हीचा वेध माडगूळकर एकाच वेळी करतात आणि त्याच वेळी त्या व्यक्तीचा परिसरही चैतन्यमय करतात.
तात्यांच्या व्यक्तिचित्राची भाषा कशी आहे? तर, त्या व्यक्तिचित्राची जी असते, तशीच आहे. ना. सी. फडके यांनी काही ग्रामीण कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण कथा आणि फडके यांचा काहीही संबंध नाही. ग्रामीण भागातले लोक कशा प्रकारची भाषा बोलत असतील, याची कल्पना करून फडके संवाद लिहितात, ते साहजिकच हास्यास्पद ठरतात. याउलट ज्या मातीमधून माडगूळकरांची पात्रं जन्म घेतात, त्या मातीतली बोली, ती स्वाभाविकपणे बोलतात. त्या बोलीचे सूक्ष्मातिसूक्ष्म स्तरही दर्शवतात. रामा मैलकुली म्हणतो, ‘आपलं करम दादा! ती होती सांगलीच्या बाजूची. रूपानं दहाजनीत उठून दिसावी अशी. माज्या खोपटात कसं र्हावं तिनं? मी ह्यो असा येडाबागडा मानूस. संसारही आपला नाचरगती. तेल हाय तर मीठ न्हाई. मीठ हाय तर मिरची न्हाई, असं सदुनीक. ल्या-नेसाया या चांगली कापडंं न्हाईती, का खायाला गोडधोड न्हाई...’
बिटाकाका म्हणतो, ‘घे रे, बग, पिठले कसे केले आहे. फर्मास श्रीखंडासारखे!’
व्यक्तिचित्र म्हणजे त्या एकट्या व्यक्तीचं शब्दचित्र नसतं याचं भान व्यंकटेश माडगूळकर बाळगतात. त्यांची जडणघडण झाली, तो परिसरही ते मांडतात. बाबाखान दरवेशी, गोविंदा कातकरी, बिटाकाका, रामा मैलकुली, कोंडीबा गायकवाड हे सगळेजण वेगवेगळ्या जातीचे आहेत. त्यांची सामाजिक पार्श्वभूमी एकच असली, तरी प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्या त्या प्रत्येकाचं खास वेगळेपण टिपत प्रत्येकाच्या आतल्या गाभ्याला माडगूळकरांनी स्पर्श केलाय. प्रत्येक व्यक्तीच्या भाषेची लकब अचूकपणे पकडलेली आहे.
या कथांमधून समूहाचंही चित्रण आहे. गावातल्या प्रथा, परंपरा, रुढी, जत्रा-यात्रा या सार्याचं प्रतिबिंब माडगूळकरांच्या साहित्यात पडतं. गावाकडच्या नाना भानगडी आणि व्यभिचाराचं वर्णनही ते करतात. अलुतेदार-बलुतेदार आणि गावातले उच्चवर्णीय ब्राह्मण, मराठा यांच्यातले अनुबंध, त्यांच्यातला संघर्ष हेही त्यांच्या लेखनात येतं. माणदेशाच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ हाही एक पात्र म्हणूनच त्यांच्या साहित्यात वावरतो. त्या दुष्काळात होरपळणारा भूमिपुत्र त्यांच्या साहित्यात सतत भेटत राहतो. गावातल्या साहित्याशी निगडित असलेला एक महत्त्वाचा भाग म्हणजे गावकुसाबाहेरील लोकांच्या जगण्याची कथा! महार, मांग, ढोर, चांभार अशा गावकुसाबाहेरील दलित-शोषितांच्या कथा तात्यांनी त्यांच्या जीवनाशी तादात्म्य पावून लिहिल्यात. ते स्वत: उच्चवर्णीय कुटुंबात जन्मलेले असले, तरी सहअनुभूतीने शोषितांच्या जगण्याची होरपळ त्यांनी जाणून घेतली होती.
जंगलविषयक लेखन हे तात्यांचं आणखी एक वैशिष्ट्य होय. बालपणापासून त्यांना रानावनात भटकण्याचा नाद होता. रानोमाळ भटकणं, पक्ष्यांची अंडी गोळा करणं, स्वत:च्या बंदुकीनं शिकार करणं, प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणं यातून त्यांनी ‘अरण्या’लाच नायकत्व बहाल करून लेखन केलं. जंगल, जंगली प्राणी, जंगलातील माणसं, शिकारी, फासेपारधी हे त्यांच्या अरण्यविषयक लेखनात पदोपदी भेटतात. प्राण्यांच्या मनात शिरून ते काय विचार करत असतील ते माडगूळकरांनी नेमकेपणानं लिहिलंय.
माणसाची जशी घुसमट होते, तशी ती प्राण्यांचीही होते; ‘
पण माणूस मात्र त्यांच्या जगण्याची दखल घेत नाही, घुसमटीची तर नाहीच नाही. हे जाणून घेऊन तात्यांनी लेखन केलं. म्हणून तर ‘सत्तांतर’, ‘वाघाच्या मागावर’, ‘नागझिरा’ यासारख्या अनेक साहित्यकृतींमध्ये त्यांंनी प्राण्यांचे बारकावे चांगले टिपलेले आहेत. साहित्याचे विविध प्रकार समर्थपणे व संवेदनशीलतेने अभिव्यक्त करणार्या अशा या थोर लेखकाला विनम्र अभिवादन!