

भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेणार्या, कामगिरीत कमालीचे सातत्य असलेल्या आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आपल्या संघ सहकार्यांच्या खेळातही जान ओतण्याचे कर्तव्य इमानइतबारे करत आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अवघ्या पाच दिवसांच्या अंतरात कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची अनपेक्षित घोषणा केली आणि आर. अश्विनप्रमाणे जणू आणखी काही देदीप्यमान पर्वांची सांगता झाली. खेळाडूने निरोप घ्यावा तो मैदानातूनच, असे म्हणतात; पण त्या परंपरेलाही त्यांनी छेद दिला. साहजिकच आता वेळ आली आहे ती रोहित-विराट-अश्विनच्या पलीकडे पाहण्याची!
साधारणपणे 1983-84 चा कालावधी असावा... ऑस्ट्रेलियन संघातील ग्रेग चॅपेल, डेनिस लिली, यष्टिरक्षक रॉड मार्श या तीन महत्त्वाच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध मायदेशातील कसोटीनंतर एकाच वेळी निवृत्तीची घोषणा करत संघाच्या मुख्य प्रवाहातून शांतपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भली मोठी पोकळी निर्माण झाली. भारतीय कसोटी संघदेखील आता जणू त्याच संक्रमणातून प्रवास सुरू करतोय! आताही कसोटीच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडणारे खेळाडू तिघेच आहेत... विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन!
मुळात विराट कोहली इतक्या अनपेक्षितपणे कसोटी क्रिकेटमधून अशी धक्कादायक निवृत्ती घेईल, हे कोणाच्या स्वप्नातही नव्हते. कोणताही क्रिकेट प्रकार असो, विराट भारतीय फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ असणार, हे ओघानेच यायचे. त्याची स्वत:ची तळपती बॅट धावांची रास तर ओतायचीच. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विराट अगदी क्षेत्ररक्षण करत असतानाही जणू सहकारी खेळाडूंमध्ये नवी प्रेरणा, नवी संजीवनी जणू ओतप्रोत ओतायचा. त्याची आक्रमक देहबोली संघाला एका नव्या उंचीवर नेण्यात अजिबात कमी पडत नसे. विराटचा फिटनेस तर निव्वळ वाखाणण्याजोगा. वयाच्या 36 व्या वर्षीही त्याची आक्रमक बॉडी लँग्वेज अगदी तरण्याबांड खेळाडूंनाही लाजवणारी असायचीय. त्याने अनेक विक्रमही नोंदवले. सलग दोन वर्षे 75 पेक्षा अधिक सरासरीने कॅलेंडर वर्षात 1 हजारहून अधिक धावा... कर्णधार या नात्याने मिळवलेले धोनीपेक्षा अधिक विजय, ही त्याचीच प्रातिनिधिक उदाहरणे.
एरवी नेतृत्वाची कवचकुंडले हाताळायची असतील, तर त्याचा फलंदाजीवर विपरीत परिणाम होतो, असे म्हणतात आणि त्याची अनेक उदाहरणेही आहेत; पण विराट त्यालाही अपवाद ठरला. कारण, कर्णधार झाल्यानंतरच विराटचा खेळ आणखी बहरत गेला. 7 द्विशतके झळकावणारा तो आंतरराष्ट्रीय पटलावरील एकमेव कर्णधारही ठरला. त्यामुळे असा खेळाडू कसोटी क्रिकेटमधून इतक्या बेमालूम निवृत्त होईल, असा स्वप्नातही विचार करण्याची आवश्यकता नव्हती; पण या सार्यांच्या मनात जे होते, ते विराटच्या मनात नव्हते. याचे कारण म्हणजे, विराटला त्याच्या शरीराच्या मर्यादा कुठे तरी जाणवत होत्या. असे म्हणतात की, कोच गौतम गंभीरने विराटला स्पष्टपणे सांगून टाकले होते, आम्ही तुला इंग्लंड दौर्यावर जरुर नेतोय; पण तुझे कसोटी क्रिकेटमधील त्यापुढील भवितव्य त्या मालिकेतील तुझ्या कामगिरीवर अवलंबून असेल. म्हणतात ना, समझदार को इशारा काफी होता हैं. विराटसाठीही तसेच झाले. त्याने व्यवस्थापनाचा इशारा अगदी शहाणपणाने घेतला आणि इंग्लंड दौर्यासाठी संघ घोषणा होण्यापूर्वीच इन्स्टाग्राम हँडलवर जाहीर केले, ‘मी कसोटीतून निवृत्त होतोय..!’
जे विराटबाबत झाले, तेच थोड्याफार फरकाने रोहितबाबत. भले रोहितच्या शैलीत अपेक्षेनुरूप फुटवर्क नसेल; पण त्याचे टायमिंग आणि स्ट्रोक प्ले अतिशय अफलातून होते आणि म्हणूनच प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधड्या पाडण्यात या मुंबईकर फलंदाजाने अजिबात कसर सोडली नाही. गगनाशी स्पर्धा करणारे त्याचे टोलेजंग षटकार यापुढे कसोटीत दुमदुमणार नाहीत, ही बाब पचवणे भारतीय क्रिकेटसाठी इतकी सहजसोपी अजिबात नसेल. एक खरे आहे की, वयानुपरत्वे रोहितचे रिफ्लेक्सेस कमी होत चालले होते. शरीर साथ देणे कमी होत होते. रोहितने परिस्थिती अचूकपणे ताडली आणि जो निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता, तो निर्णय घेतला. तो म्हणाला, ‘मी कसोटीतून निवृत्त होतोय..!’
विराट आणि रोहित यांच्या निवृत्तीत विलक्षण साम्यस्थळे आहेत. या उभयतांनी संघबांधणीची मोट बांधताना अतिशय मोलाचे योगदान दिले. युवा खेळाडूंमध्ये सहजपणे मिसळत त्यांना अनुभवाचे धडे दिले. जागतिक क्रिकेटमधील बारकावे शिकवले आणि प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणतील, असे नुस्खेही सांगितले. असे म्हणतात की, 1980 च्या दशकापर्यंत भारत फक्त बचावात्मक पवित्र्यावरच भर द्यायचा. कपिलने त्यात जान भरली. गावसकर, वेंगसरकर, शास्त्री यांनी अस्तित्व दाखवून देण्यास सुरुवात केली. नंतर काळाच्या प्रवाहात बरीच गणिते बदलली. गांगुली, तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण आले आणि त्यांनी जिद्दीने यश खेचून कसे आणायचे, किल्ला अगदी शेवटपर्यंत लढवायचा कसा, याचे बाळकडू पाजले. याचा विशेष उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, विराट आणि रोहित त्याच टाकसाळीत घडले.
विराट व रोहित हे दोघेही आक्रमक फलंदाजीचे पाईक. या उभयतांनी आक्रमकता जशी आपल्या फलंदाजीत दर्शवली, तशी आपल्या बाण्यात दर्शवली. विराटचे अगदी क्षेत्ररक्षण करत असतानाची आक्रमक देहबोली, यशाचे विराट सेलिब्रेशन हे डोळ्यात भरणारे असायचे. बदलत्या भारताचे प्रतीकच जणू. विराटचा फिटनेस पाहता तो आणखी 3-4 वर्षे सहज खेळू शकेल, असाच एकंदरीत होरा होता; पण गंभीरने तो गर्भित इशारा दिला आणि यापुढे सिद्ध करण्यासारखे काहीच राहिले नसल्याने विराटनेही तो इशारा गंभीरपणे घेतला. आता नाण्याची दुसरी बाजूही पाहायची, तर कोव्हिडनंतर विराट पूर्वीच्या लयीत अजिबात दिसून आला नाही. गतवर्षी मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिका पराभवाची नामुष्की पचवल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्यातील पहिल्या कसोटीत विराटने शानदार शतक झळकावले खरे; पण ती फक्त वार्याची झुळूक असल्याचे कालांतराने स्पष्ट झाले. विराटची सर्वात मोठी समस्या ही राहिली की, नेहमी एकाच पद्धतीने बाद होत राहिला. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याच्या निवृत्तीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नमूद केले, ‘तुम्ही भारतीय क्रिकेटला धावांपेक्षाही खूप काही योगदान दिले, जे कशातच मोजता येणार नाही!’ त्या तुलनेत रवीचंद्रन अश्विनला मात्र अतिशय अवमानाकारक वागणूक मिळाली. संस्कारात घडलेल्या आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अश्विनच्या मनात तो ऑस्ट्रेलिया दौरा अजूनही सलत असेल. अश्विनने लेड कसोटी खेळली आणि त्यानंतर ब्रिस्बेनमधील चौथ्या कसोटीत आपल्याला संघात स्थान नाही, हे लक्षात आल्यानंतर त्याने स्वतःचा सन्मान जपत दौरा अर्ध्यावर सोडून दिला. त्याच मालिकेतील शेवटची कसोटी विराटसाठी कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरली.
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणेच विराट, रोहित, रवीचंद्रन अश्विन यांनीही एक तप गाजवले. एका युगाची समाप्ती झाली, असे म्हटले जातेय, ते त्याचमुळे. तसे पाहता सचिन 2013 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्याची जागा विराटने अतिशय सुंदर पद्धतीने भरून काढली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पाच गोलंदाज खेळवण्याचे धारिष्ट्य दाखवले ते विराट कोहलीनेच आणि त्याचेही बरेच फलित भारतीय क्रिकेटला लाभत आले आहे. आता मात्र स्वत: विराट निवृत्तीच्या पडद्याआड जात असताना आणि त्या जोडीने रोहित शर्मा, अश्विनही बाहेर झाले असल्याने त्यांची जागा भरून काढण्याचे आव्हान भारतीय क्रिकेटला पेलावे लागणार आहे. नव्या सेटअपमध्ये गौतम गंभीर हाच व्यवस्थापनातील मुख्य चेहरा असणार आहे. 2017 मध्ये अनिल कुंबळेनेही असाच प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला; पण विराटने त्यावेळी अल्फा-मेल ही संकल्पना काय असते, याचा रीतसर धडा घालून दिला आणि स्वाभिमानी कुंबळेने त्यावेळी स्वत:हून बाजूला होणे पसंत केले. आताची परिस्थिती मात्र अतिशय वेगळी आहे. रोहित-विराट-अश्विन स्वत:हून बाजूला झालेत आणि संघाची नव्याने मोट बांधण्याचे सर्वाधिकार गंभीरकडे असणार आहेत.
ग्रेग चॅपेल-मार्श-लिली यांची जागा भरून काढणे त्यावेळी जितके आव्हानात्मक होते, तितकेच आव्हानात्मक आता रोहित-विराट-अश्विन यांची जागा भरून काढणे असेल. ताज्या दमाच्या युवा फळीत केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल असे अनेकाविध पर्याय कसोटीसाठी उपलब्ध असतील. 80 च्या दशकात चॅपेल-मार्श-लिली निवृत्त झाल्यानंतरही किम ह्युजेसने आणखी सात महिने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. इथे रोहितने तडकाफडकी निवृत्ती घेतल्याने भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाला जूनमधील इंग्लंड दौर्यासाठी नवा कर्णधारही नियुक्त करावा लागेल; पण वेळ कोणासाठी थांबत नसते. अॅडलेडमधील सर्वबाद 36 ची नामुष्की आल्यानंतर विराट मायदेशी परतला होता, तरीही त्यावेळी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ती मालिका जिंकून देण्याचा भीमपराक्रम गाजवला होता, हेदेखील येथे उल्लेखनीय आहे. ‘शो मस्ट गो ऑन’ हा सार्या जगाचा नियम विसरून कसे चालेल?