

सुनील कुलकर्णी, अध्यात्म अभ्यासक
कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी दसरा अर्थात विजयादशमी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. साडे तीन मुहुर्तांपैकी एक असणार्या या दिवसाचे महत्त्व सांगणारे अनेक दाखले पुराणात आणि लोककथांमध्ये आढळतात. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सत् प्रवृत्तीचा विजय हे तत्त्व या विविध कथांमधून व्यक्त होते. संघर्ष नेहमी चांगल्या आणि वाईट शक्तीत होतो आणि यामध्ये विजय नेहमीच चांगल्या शक्तीचाच होतो. हाच संदेश ‘विजयादशमी’ साजरा करण्यामधून व्यक्त होत असतो.
आपल्याकडे हिंदू संस्कृतीत जे महत्त्वाचे साडेतीन मुहूर्त मानले गेले आहेत त्यापैकी एक म्हणजे दसरा. दसरा आपल्या आयुष्यात नव्या सर्जनाची पहाट घेऊन येतो. सुष्टांचा दुष्टांवर विजय हे विजयादशमीचे ब्रीद आहे. दसर्यासंदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत. या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीतील सगळेच जण आयुष्यातील आनंद आणि उत्साह टिकवणारे असतात. समाजाला एका बंधनात बांधणारे दसर्यासारखे सण म्हणूनच उत्साहाने साजरे केले जातात. या दिवशी एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. हे सोनं एकमेकांना देऊन दसर्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. हा कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेलं पहिलं पीक घरात आल्यावेळी हा उत्सव साजरा करत असत. अनेक ठिकाणी भाताच्या लोंब्या आणून त्या घराच्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही पद्धत या सणाचं कृषीविषयक स्वरूपच स्पष्ट करते.
भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे. शौर्याची उपासक आहे. व्यक्ती आणि समाजातील तमाम घटकांमध्ये विरता प्रकट होण्यासाठी दसर्याचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. युद्ध अनिवार्य असेल, तर शत्रूच्या आक्र मणाची वाट न बघता त्यांच्यावर आक्र मण करून त्याचा पराभव करणे हीच कुशल राजनीती आहे. शत्रू आपल्या राज्यात घुसून लूट केल्यानंतर लढाई करण्याची तयारी करणारे आमचे पूर्वज नव्हते, तर शत्रूचा दुष्ट व्यवहार समजूनच त्याच्यावर आक्रमण करत असत. शौर्य आणि वीरतेतील या तात्विकतेचे प्रतीक म्हणजे दसर्याचा उत्सव आहे.
या दिवसाला विजयादशमीदेखील म्हणतात. प्रभू रामचंद्रांच्या काळापासून दसरा हा दिवस विजयाचे प्रतीक बनला आहे. भगवान रामचंद्रांनी रावणाचा नाश याच दिवशी केला होता. म्हणून आजही या दिवशी प्रतीकात्मक रूपाने रावण दहन करतात. इतिहासात या दिवशी विजयप्रस्थान करण्याची अनेक उदाहरणे सापडतात. या उत्सावामागे काही नैसर्गिक ऋतुमानांचेही संदर्भ आहेत. दसर्याच्या वेळी वर्षा ऋतू येऊन गेलेला असतो. वरुणदेवाच्या कृपेने या काळात अन्नधान्याची समृद्धी असते. त्यामुळे समाजमन आनंदाने भरलेले असते. या दिवसात पाऊस पडून गेलेला असतो. चिखलाने माखलेले रस्ते सुकलेले असतात. हवामान अनुकूल असते. आकाश स्वच्छ असते. असे वातावरण विजयाला पूरक असते. शिवाय नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्रयत्न केलेली शक्तीदेखील शत्रूचा संहार करण्याची प्रेरणा देत असते. म्हणून या दिवशी विजयासाठी अर्थात चांगल्या कामाची सुरुवात करण्याची पद्धत आहे.
देवी जगदंबेने सतत नऊ दिवस युद्ध करून चंड-मुंड, रक्तबीज, महिषासुर आदी राक्षसांचा वध केला होता. तिच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही दसरा साजरा केला जातो. दसर्याच्या दिवशी शमी वृक्षाचे महत्त्व अधिक मानले जाते. दैवत भावाने या वृक्षाची पूजा केली जाते. ‘शमी शमयाते पापम् शमी लोकहितकांतका । धरिण्यार्जुनगणानाम् रामस्य् प्रियवंदिनी ॥ क्रिशमान्यत्रया यथाकाल सचम्या । तारा निर्विघ्नकर्ती त्वाम् भव् श्रीरामपुजीते॥’ अर्थात, शमी वृक्ष हा वाईट प्रवृत्ती स्वच्छ करतो. त्याचे काटे लालसर रंगाचे असतात आणि प्रभू रामचंद्रांचा हा आवडता वृक्ष आहे. म्हणून या दिवशी सीमोल्लंघन करतात आणि येताना आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून एकमेकांना वाटतात. भारतीय संस्कृतीत प्रत्येक चेतन आणि अचेतन गोष्टीला सन्मान दिला जातो आणि त्यांचे पूजनही केले जाते. यामध्ये वृक्ष-वनस्पतीही सामील आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला कडुनिंबाची पूजा केली जाते. वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला तुळशीची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात येणार्या कुशग्रहिणी अमावस्येला कुशाची पूजा केली जाते आणि कार्तिक महिन्यातील नवमीला आवळे नवमी म्हणून आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. त्या-त्या वनस्पतीचे आरोग्याच्या द़ृष्टीने महत्त्व जाणून त्याचे पूजन केले जाते. जेणेकरून मानव या उपयुक्त वृक्षांचे संवर्धन करेल.
दसर्याला आपट्याची पाने देण्यामागे विजय आणि उल्हासाची भावना असते. तसेच समृद्धीचीही कामनाही केली जाते. यामागेही एक लोककथा सांगितली जाते. वरतंतू ऋषी, त्यांचा शिष्य कौरस आणि रघूराजा यांची ही कथा आहे. रघूराजाने कौरसाला दिलेले सुवर्ण मोहोरांचे दान कौरस आपल्या गुरूंना म्हणजे वरतंतू ऋषींना देतो; मात्र ते शिष्याच्या गुणांनीच संतुष्ट असतात. ते गुरुदक्षिणा नाकारतात. कौरसही हे धन घेऊ शकत नाही व दान केलेले धन रघुराजाही घेऊ शकत नाही. त्यामुळे हे धन एका आपट्याच्या झाडाखाली ठेवून तमाम जनतेला ते लुटायला सांगतात. हा दिवस दसर्याचा असल्यामुळे या दिवशी आजही आपट्याच्या वृक्षाचे पूजन करून त्याची पाने ‘सोने घ्या, सोन्यासारखं राहा’ असे म्हणून एकमेकांना वाटली जातात. या देवाणघेवाणीतून खूप मोठा संदेश दिलेला आहे. आपण दान केलेल्या संपत्तीचा मोह धरू नये. तसेच गुरू, शिष्य व राजा या तिन्ही नाट्यातले आदर्शही या कथेतून व्यक्त झालेले दिसतात. याच दिवशी काही भागांत अपराजिता (विष्णुकांता) या वनस्पतीचेही पूजन केले जाते. ही वनस्पती विष्णूला प्रिय मानली जाते. तिचे काही वैद्यकीय गुणधर्म आहेत. ती अतिशय आरोग्यदायी आहे. कफ विकारांवर या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. विजयादशमीला दुर्गापूजन, अपराजितापूजन, नवरात्रीचे पारणे इत्यादी विधी केले जातात.
उत्तर भारतात दसर्याचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तर पूर्वेला प. बंगालमध्ये दुर्गापूजेचा मोठा महोत्सव असतो. म्हैसूरचा दसरा हा केवळ भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. जगाच्या कानाकोपर्यातून या महोत्सवात सहभागी होण्यासाठी लोक येत असतात. दक्षिणेकडे दसरा सण साजरा करण्याची पद्धत विजयनगरच्या सम्राटांनी पंधराव्या शतकात सुरू केली. विजयनगरचे साम्राज्य लयाला गेल्यावर म्हैसूरच्या वडियार राजघराण्याने हा सण साजरा करायला सुरुवात केली. 1610मध्ये श्रीरंगपट्टण येथे राजा वडियार याने पहिल्यांदा दसरा साजरा केला. नवरात्राचे नऊ दिवस आणि दसर्याच्या दिवशी असे दहा दिवस म्हैसूरचा राजवाडा रोषणाईने उजळून गेलेला असतो. म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवर चामुंडेश्वरीदेवीचे मंदिर आहे. या देवीची पूजा करून वडियार राजघराण्याकडून सणाला प्रारंभ होतो. त्यानंतर राजाचा खास दरबार भरतो. असा खास दरबार भरवण्याची ही परंपरा कृष्णराजा वडियार तिसरा याने 1805 मध्ये सुरू केली. विजयादशमीदिवशी पारंपरिक दसरा मिरवणूक म्हैसूर शहरात काढली जाते. या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सजवलेल्या हत्तीवर ठेवलेल्या सोन्याच्या अंबारीत बसवलेली असते. मिरवणुकीला निघण्यापूर्वी राजा आणि राणी जोडीने चामुंडेश्वरीची पूजा करतात.
विजयादशमीला पौराणिक संदर्भ आहेतच शिवाय बदलत्या काळात आपणही काही चांगले संदर्भ लावू शकतो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. आपणही आपल्या मनातील, कृतीतील वाईट गोष्टींवर मात करून विजय मिळवला पाहिजे. आपल्या मनातील रक्तबीजरूपी वासना, द्वेष, मत्सर असुरांना नामोहरम केले पाहिजे. मनाचे सीमोल्लंघन केले पाहिजे. ‘विचार बदला, आयुष्य बदलेल’ असं म्हटलं जातं. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या मनातील राग, लोभ, मत्सर, द्वेष, अंधश्रद्धा, सूड या वाईट भावना दूर करून मनाचं, विचारांचं एक प्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे. या दिवशी आपल्यातील चांगल्या गुणांना उजाळा द्यायचा असतो. समाजात वावरताना असंख्य वाईट प्रवृत्ती आपल्या भोवताली दिसत असतात. त्यांना पाहून हे जग वाईटच आहे का, अशी पुसट शंकाही मनात येते; पण या नकारात्मक विचारांना दूर सारून सकारात्मक विचारांची पेरणी करणं आवश्यक असतं. त्यामुळे आत्मविश्वास द़ृढ होईलच, शिवाय तेच खर्याअर्थानं विचारांचं सीमोल्लंघन ठरेल.