Vijayadashami Festival | विजयादशमीचे आनंदपर्व!

Vijayadashami Festival |
Vijayadashami Festival | विजयादशमीचे आनंदपर्व!
Published on: 
Updated on: 

सुचित्रा दिवाकर

शारदीय नवरात्राच्या नऊ दिवसांतील शक्तिउपासनेची सांगता ज्या मंगलदिनी होते, तो दिवस म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा. आश्विन शुद्ध दशमीचा हा दिवस भारतीय जनमानसात आणि संस्कृतीतील उत्सव आणि लोकपरंपरांचा मिलाफ म्हणून महत्त्वाचा मानला जातो. असत्यावर सत्याचा, अधर्मावर धर्माचा आणि अंधःकारावर प्रकाशाचा विजय अधोरेखित करणारे, सांस्कृतिक एकात्मतेचा आणि चैतन्याचा अनुपम आविष्कार असणारे विजयादशमीचे हे मांगल्यदायी पर्व विलोभनीय आहे.

'विजयादशमी' या शब्दाची व्युत्पत्ती पाहता ‘विजय’ आणि ‘दशमी’ या दोन संकल्पनांमधून साध्य झालेला धर्मविजय स्पष्ट होतो. संस्कृत ग्रंथांनुसार ‘दशहरा’ या शब्दाची संगती ‘दश’ म्हणजे दहा आणि ‘अहर्’ म्हणजे दिवस अशा रूपात लावली जाते. दुष्प्रवृत्ती किंवा पाप यांचे हरण करणारा अथवा नाश करणारा असाही अर्थ यातून ध्वनित होतो. म्हणजेच दहा प्रकारच्या दुष्प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन करून जीवनात सत्प्रवृत्तींची स्थापना करण्याचा पुण्यदिन म्हणजे दसरा.

भारतीय सणवार, व्रतवैकल्ये, उत्सव यांच्या मुळाशी पौराणिक संदर्भांचा आणि लोकपरंपरांचा पाया आहे. मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी लंकाधिपती रावणाचा वध करून सीतेची सुटका केली, ती दसर्‍याच्या दिवशीच. दहा मस्तके असलेल्या रावणाचे दहन करत असुरी प्रवृत्तींचा विनाश करण्याची परंपरा रामरायाच्या विजयश्रीला वंदन करणारी आहे. रावणदहनाचे मोठे कार्यक्रम उत्तर भारतात पूर्वापार चालत आले आहेत. महाभारतातील संदर्भानुसार अज्ञातवासाच्या समाप्तीनंतर पांडवांनी शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये लपवून ठेवलेली आपली दिव्य अस्त्रे-शस्त्रे याच दिवशी पुन्हा हाती घेतली आणि त्यांच्या साहाय्याने कौरवांच्या अफाट सैन्याचा पराभव करून धर्मसंस्थापनेचा मार्ग प्रशस्त केला.

पूर्वेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये हा सण दुर्गेच्या महिषासुरमर्दिनी रूपाशी जोडलेला आहे. ब्रह्मदेवाच्या वरामुळे उन्मत्त झालेल्या आणि तिन्ही लोकांत हाहाकार माजविणार्‍या महिषासुराचा वध करण्यासाठी महातेजातून जगदंबेचा उदय झाला. देवीने नऊ दिवस अखंड युद्ध करून दहाव्या दिवशी महिषासुराचा संहार केला आणि त्रिलोकाला संकटातून मुक्त केले. या तिन्ही संदर्भांचे मर्म कूप्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीने, सद्‌गुणांनी मिळवलेला विजय हे आहे. विजयादशमीचे स्वरूप भौगोलिक विविधतेनुसार पालटत असले, तरी त्यातील मूळ भावना एकच राहते. उत्तरेकडील राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीत गेल्या अनेक शतकांपासून रामलीलेचे भव्य नाट्यप्रयोग सादर होतात. दशमीच्या सायंकाळी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या गगनचुंबी पुतळ्यांचे दहन करून आतषबाजीच्या साक्षीने असत्याचा अंत साजरा केला जातो. बंगालमध्ये दुर्गापूजेची सांगता अत्यंत भावुक आणि मांगलिक वातावरणात होते. तेथील माता-भगिनी एकमेकींना सिंदूर लावून ‘सिंदूर खेला’ हा पारंपरिक विधी साजरा करतात आणि अथांग जलाशयात दुर्गाप्रतिमेचे विसर्जन करत आर्त प्रार्थना करतात.

दक्षिणेकडे कर्नाटकातील म्हैसूरचा दसरा हा राजवैभवाची परंपरा जपणारा मानला जातो. रोषणाईने न्हाऊन निघालेला म्हैसूरचा राजवाडा आणि चामुंडेश्वरीदेवीची सुवर्णअंबारीतून गजराजावर निघणारी भव्य मिरवणूक हे देशी-विदेशी पर्यटकांसाठी आजही विलोभनीय आकर्षण असते. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात घराघरांमध्ये ‘गोलू’ अर्थात विविध देवदेवता, मानवी जीवन आणि पौराणिक प्रसंगांच्या बाहुल्यांची टप्प्याटप्प्याने मांडणी करून अतिथींचे स्वागत केले जाते. हिमाचल प्रदेशातील कुलू खोर्‍यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दसरा मेळावा भरतो, जेथे शेकडो ग्रामदैवतांच्या पालख्या एकत्र येऊन सामूहिक पूजनाचा सोहळा पार पाडतात.

महाराष्ट्रात विजयादशमीचा दिवस घराघरांत उत्साहाने साजरा होतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने या दिवशी घराची स्वच्छता करून प्रवेशद्वारावर झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांची पूजा करून पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन केले जाते. अन्नदाता शेतकरी या दिवशी आपल्या कृषी अवजारांची पूजा करतो, तर कारागीर आपली हत्यारे, व्यापारी व्यवसायातील साधनांची पूजा करतात. तसेच विद्यार्थीवर्गाकडून पुस्तकांची पूजा केली जाते. आपल्या उपजीविकेची साधने आणि ज्ञानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या प्रथांमागे आहे. या दिवशी घरोघरी मिष्टान्न भोजन केले जाते आणि सायंकाळी ‘सोने घ्या सोने, सोन्यासारखे राहा’ असे म्हणत आप्तेष्टांना आपट्याची पाने वाटून शुभेच्छा दिल्या जातात. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात भ्रमणध्वनीवरून संदेशांची देवाणघेवाण होत असली, तरी त्यातील भावार्थ महत्त्वाचा आहे. परस्परांविषयीची मनातील कटुता, मत्सर, द्वेष, अढी विसरून प्रेमाचे स्नेहबंध वृद्धिंगत करणे आणि या शुभदिनी ज्येष्ठांचे शुभाशीर्वाद घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

बदलत्या काळात सण साजरे करण्याच्या पद्धती बदलत आहेत. शहरांमध्ये मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव आणि आकर्षक सजावट यांना महत्त्व आले आहे, तरीही घरातील देवपूजा, ज्येष्ठांचे आशीर्वाद, सीमोल्लंघन आणि आपट्याच्या पानांची देवाणघेवाण यांसारख्या प्रथा आजही टिकून आहेत. या परंपरांमुळे पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा जपला जातो. लहान मुलांनाही सणांच्या निमित्ताने पौराणिक कथा समजतात. त्यातून चांगल्या वर्तनाचे, परस्पर आदराचे आणि कर्तव्यनिष्ठेचे संस्कार घडतात. भौतिक उत्सवाच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर दसर्‍याचा आध्यात्मिक अन्वय अत्यंत व्यापक आहे. मानवाच्या अंतर्मनात वास करणार्‍या काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांसारख्या षड्‌रिपूंवर विजय मिळविणे म्हणजेच खर्‍या अर्थाने रावणाचे दहन करणे होय. बाह्य जगातील अनिष्ट घटकांचा विरोध करतानाच आपल्या विचारांतील संकुचितता आणि अहंकाराचा त्याग करून अंतर्बाह्य शुद्धी साधणे हीच या सणाची खरी शिकवणूक आहे.

आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि मूल्यांची घसरण होत असलेल्या युगातही नव्या आशा, नवे संकल्प आणि उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा घेऊन येणारा हा सण भारतीय संस्कृतीतील चिरंतन मूल्यांची आठवण करून देतो. आपट्याच्या पानांच्या रूपात सोनेवाटप करताना माणसाने माणसाशी जोडलेली स्नेहाची वीण अधिक घट्ट व्हावी आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात धर्म, कर्तव्य आणि मानवतेचे अधिष्ठान कायम राहावे, हीच या शुभपर्वाची खरी फलश्रुती ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news