

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
वसईतील मुलीला 100 उठाबशा काढायला लावल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने विद्यार्थी, पालक, शिक्षण, शिक्षा या सर्वांबाबत नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षेचे सर्वात जुने तत्त्वज्ञान भीतीवर आधारित आहे. चूक केली, तर शिक्षा मिळेल आणि शिक्षेच्या भीतीने चूक पुन्हा होणार नाही, हा विचार वरकरणी तर्कशुद्ध वाटतो; मात्र तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र दोन्ही दर्शवतात की, भीतीतून निर्माण होणारी शिस्त ही बाह्य स्वरूपाची असते.
शिक्षण क्षेत्रातून अलीकडील काळात सातत्याने काहीशा चिंताजनक घडामोडी समोर येत आहेत. अलीकडेच महाराष्ट्रातील वसई येथील प्राथमिक शाळेत शिकणार्या एका नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गात उशिरा आल्याच्या कारणास्तव शारीरिक शिक्षा म्हणून 100 उठाबशा काढण्यास सांगण्यात आल्या होत्या. या मुलीने पाठीवरील शालेय दप्तर कायम ठेवून ती शिक्षा पूर्ण केली. यानंतर ती आजारी पडली आणि उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तसेच यामुळे समाजमनामध्ये पुन्हा एकदा शिक्षणातील शिक्षेबद्दल पुनर्विचार करण्याची भूमिका प्रतिपादन केली जाऊ लागली आहे.
सध्याच्या काळात शिक्षणातील जुने विचार कालबाह्य ठरताहेत. त्यामुळे शिक्षणातील शिक्षा या प्रकाराला अलविदा करायला हवा, असा मतप्रवाह पुढे येत आहे; मात्र चुका केल्यानंतर शिक्षा केली नाही, तर विद्यार्थ्यांच्या वर्तनात सुधारणा होईल का, असा प्रश्न पारंपरिक शिक्षणपद्धतीच्या समर्थकांकडून पुढे केला जातो. वस्तुतः बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षेबद्दलचा द़ृष्टिकोन आणि पद्धती याबद्दल निश्चितपणे विचार करायलाच हवा. शिक्षा केल्यामुळे खरंच विद्यार्थी बदलतात का? गुणवत्तेत सुधारणा होते का? शिक्षेच्या भीतीने केल्या जाणार्या अभ्यासाने मार्क मिळतात का? शिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक विचारात खरोखर बदल होतो का? शिक्षकांना अशी जीवघेणी शिक्षा करावी असे का वाटते? यामागे विद्यार्थ्यांना समजून घेण्यामध्ये ते कमी पडता आहेत का? मार्कांच्या वाढत्या अपेक्षांमुळे शिक्षकांनीही विचार करणे थांबवले आहे का? की वाढत्या माहिती-तंत्रज्ञानातून त्यांच्याही मानसिक विचार क्षमतांवर परिणाम झाला आहे? विद्यार्थ्यांवर मार्कांच्या अपेक्षांचे ओझे आहे. त्याप्रमाणे शिक्षकांकडूनदेखील शिस्त, मार्क, शाळेचा निकाल, अभ्यासक्रमाची परिपूर्ती व अशैक्षणिक कामांचा ताण यातून त्यांची मानसिक स्थिती ढासळली आहे का? शिक्षा करण्यासंदर्भात कायद्यात तरतूद असतानाही शिक्षेचा बडगा का उगारावा लागतो, यांसारख्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह वसईतील घटनेच्या निमित्ताने नव्याने करण्याची गरज आहे.
कधीकाळी शिक्षणातून शिस्त, अभ्यास आणि मार्क यासाठी शारीरिक शिक्षा हा पर्याय निवडला जात होता. पालकांनाही शारीरिक शिक्षा केली, तरी त्याचे काहीच वाटत नव्हते. त्यावेळी ‘छडी लागे छम छम, विद्या येई घमघम’ असे म्हटले जात होते. शाळा म्हणजे पवित्र मंदिर आहेत. यामुळे शिक्षकांनी शिक्षा केली, तर ते चुकणारच नाहीत, ही पालकांची धारणा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना केल्या जाणार्या शिक्षेकडे फारसे कोणी गांभीर्याने पाहिले जात नव्हते. त्याकाळी शिक्षक किती मारायचे, याच्या सुरस कथा आजही जुन्या काळातील लोक हसत हसत सांगतात. ती शिक्षा ऐकून अंगावर शहारे येतात, तरीही कोणी शिक्षकांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करत नव्हते. तसेच शिक्षा झाली, तर त्याबद्दल फारसे वाईटही वाटत नव्हते. आता पाल्यांविषयीची वाढलेल्या संवेदनशीलतेने पाल्यांना झालेली शिक्षा पालकांनादेखील असह्य करते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याला रागवले, बोलले तरी शाळांसंदर्भात तक्रारींचा पाढा वाचला जातो. आमच्या मुलाला बोलायचे नाही, रागवायचे नाही, तो शाळेत येईल तेव्हा त्याला शिकवा. तुमचे काम शिकवण्याचे आहे, अशा प्रकारचे सल्ले देण्यापर्यंत पालक शिक्षकांना सांगू लागलेत. यातून विद्यार्थी-शिक्षक यांच्या नात्यातील ओलावा हरवत चालला आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यानंतर शिक्षण विश्वासाने पुढे जाण्यापेक्षा ते व्यवहारानेच पुढे जात आहे. त्यामुळे शिक्षणाचे पावित्र्य आणि शिक्षकांवरचा विश्वास कमी होत चालला आहे. त्याचाही परिणाम म्हणून शिक्षा करण्याच्या तक्रारीकडे पाहायला हवे.
शिक्षेचे सर्वात जुने तत्त्वज्ञान भीतीवर आधारित आहे. चूक केली, तर शिक्षा मिळेल आणि शिक्षेच्या भीतीने चूक पुन्हा होणार नाही, हा विचार वरकरणी तर्कशुद्ध वाटतो; मात्र तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र दोन्ही दर्शवतात की, भीतीतून निर्माण होणारी शिस्त ही बाह्य स्वरूपाची असते. तिचा अंतर्मनावर परिणाम फारसा होत नाही; पण दुसरीकडे समाज, पालक, प्रशासन, शासन या सर्वांनाच शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हवे आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रुजणे हे त्याच्या भविष्यासाठी गरजेचे असते; मात्र त्यासाठी नव्या युगासोबत राहताना नवा विचार करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी शारीरिक, मानसिक शिक्षेपेक्षा सकारात्मक शिक्षेचा विचार करता येईल का, हा द़ृष्टिकोन शिक्षकांमध्ये रुजायला हवा. विद्यार्थ्यांनी चुका केल्या असतील, तर त्यांना शारीरिक शिक्षा हा काही एकमेव पर्याय नाही. शिक्षेसाठी महात्मा गांधींनी पश्चात्ताप हेसुद्धा मोठे साधन आहे, असे म्हटले होते. या वयातील विद्यार्थ्यांना इतक्या खोलवर जाऊन विचार करता येणार नाही, हे खरे; पण संवाद सुरू ठेवला, परिणामांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला, तर काही प्रमाणामध्ये निश्चित बदल अनुभवास येईल.
शिक्षा केली म्हणजे विद्यार्थ्यात परिवर्तन होते, असे घडत नाही. फार तर तात्पुरता बदल होतो. शिक्षेमुळे विद्यार्थ्यांमधील नकारात्मकता वाढीला लागते. त्यातून बंडखोरीची क्षमता उंचावते. शिक्षणाकडे पाहण्याचा नकारात्मक द़ृष्टिकोन वाढीस लागण्याची शक्यताही निर्माण होते. शिक्षण हे आनंददायी नाही, तर ते दुःखदायक आहेत, हा विचार मनात रुजवण्यासही कठोर शिक्षेची मदत होते. सबब शिक्षा करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना समजून घेण्यामध्ये शिक्षक म्हणून कमी पडतो आहे का, याचा विचार करायला हवा. मुळातच शिक्षणाची व्यवस्था दिवसेंदिवस ताठर होत चालली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास उशीर होत असेल, तर तो का झाला? त्याला नेहमीच उशीर होतो का, याचा शोध घेण्याची गरज आहे.
विद्यार्थी नियमित अभ्यास करत नाहीत. स्वाध्याय सोडवत नाहीत. बाह्य प्रसारमाध्यमांमुळे वर्गामधल्या वर्तनात बदल होतो आहे. त्यातून शिक्षकांना शिक्षा करण्याचा पर्याय स्वीकारावा लागतो. अर्थात, या सर्व बिकट वास्तवात शिक्षा काय असावी, हे ठरवताना तिच्या परिणामकारकतेचा विचार प्राधान्याने करायलाच हवा. यासाठी शिक्षकांनी स्वतःला संयमित करायला हवे. प्रसंगी पालकांशी संवाद साधण्याचा मार्ग सोपा आहे. याखेरीज सकारात्मक शिक्षेची विविध पर्याय शोधायला हवेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या कायद्यातील कलम 17 प्रमाणे शारीरिक अथवा मानसिक शिक्षा करण्यास विद्यार्थ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानादेखील विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शारीरिक शिक्षा करत असतील आणि त्यातून विद्यार्थिनीला मृत्यूला सामोरे जावे लागले असेल, तर ती बाब अधिक चिंताजनक आहे.