

वाघांच्या संवर्धनासाठी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले, ते ख्यातनाम लेखक वाल्मिक थापर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांनी नामशेष होऊ पाहणार्या वाघांच्या अस्तित्वासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत झुंज दिली व आपल्या अथक प्रयत्नाने देशात वाघांची संख्या वाढवलीच शिवाय देशात विविध ठिकाणी व्याघ्र प्रकल्प उभारण्यासही हातभार लावला. आज भारतात तीन हजार सहाशेपेक्षा जास्त वाघ आणि पन्नासपेक्षा जास्त व्याघ्र प्रकल्प आहेत.
देशातील वाघांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी मोठे योगदान दिलेले ख्यातनाम लेखक वाल्मिक थापर यांचे नुकतेच निधन झाले. ‘लँड ऑफ द टायगर’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकामुळे देशातील आणि विदेशातील वन्यजीवप्रेमींना त्यांचा जवळून परिचय झाला होता. त्यांच्या निधनामुळे भारताची व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासातील एका युगाचा अस्त झाला आहे.
1970 पासून देशातील वाघांच्या विविध जातींच्या संवर्धनासाठी थापर आघाडीवर राहिले. राजस्थानमधील जगप्रसिद्ध रणथंबोर व्याघ्र प्रकल्प यशस्वी होण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. वाघांच्या संरक्षणाबरोबरच त्यांनी वाघ, जंगल, पर्यावरण अशा विविध विषयांवर तीसपेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. तसेच टीव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांद्वारे प्रबोधनाचे मोठे काम केले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्या ‘नॅशनल बोर्ड फॉर वाईल्डलाईफ’चे ते सन्माननीय आणि क्रियाशील सदस्य होते. 2005 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने टायगर टास्क फोर्सवर त्यांची नियुक्ती केली होती. सरिस्का व्याघ्र प्रकल्पातून वाघ नामशेष झाल्यानंतर त्याची चौकशी करणे हे त्यामागचे कारण होते. वाघ नामशेष होण्याच्या घटनेने तेव्हा देशात मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यांनी वन्यजीवांवर अनेक फिल्मस्ची निर्मितीही केली आहे. प्रसिद्ध पत्रकार रोमेश थापर हे त्यांचे वडील. त्यांच्याकडून त्यांना लेखनाचा वारसा मिळाला. शासकीय समित्यांवर कार्यरत असताना त्यांनी अनेकदा शासनाशीच संघर्ष केला होता. यामागे त्यांची वन्यजीवांबद्दलची तीव्र संवेदनशीलताच दिसून यायची.
रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि माणूस यांचे अनोखे साहचर्य थापर यांचे गुरू फतेहसिंह राठोड यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाले. नंतरच्या काळात हा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध झाला आणि तेथील वाघांना लोक नावानिशी ओळखू लागले. क्रोकोडाईल हंटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘मछली’ वाघिणीपासून ते आजच्या ‘नूर’, ‘सुल्ताना’ या वाघिणी पाहायलाही हजारो पर्यटक रणथंबोरला भेट देत असतात. ‘लँड ऑफ द टायगर’ हे पुस्तक त्यांनी ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर वाघांचे क्षेत्र वाचविण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले त्यांना समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष केल्यानंतर आता पन्नास वर्षांनी आपल्याला मिळालेला नैसर्गिक समृद्ध वारसा टिकवण्यासाठी एक नवीन चळवळ सुरू करण्याची वेळ आली आहे, असे ते आपल्या या पुस्तकात म्हणतात. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांनी अनुभवलेल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ या प्रकल्पाच्या यशाचे चढ-उतार होय.
1973 मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केल्यानंतर पहिल्या वीस वर्षांत या प्रकल्पाला चांगले यश मिळाले होते. वाघांची संख्या दोन हजारांवरून चार हजार तीनशेपर्यंत वाढली; परंतु 2001 पासून वाघांची संख्या कमी होत गेली आणि 2008पर्यंत ती खूपच घटली. 2006 मध्ये देशात फक्त 1411 वाघ होते. सरिस्का येथे 1973 मध्ये चाळीस वाघ होते; पण 2005 मध्ये सर्वच वाघ नाहीसे झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ‘स्पेशल टायगर टास्क फोर्स’ स्थापन केली व त्यावर वाल्मिक थापर यांची नियुक्ती केली.
आज भारतात तीन हजार सहाशेपेक्षा जास्त वाघ आहेत. पन्नासपेक्षा जास्त व्याघ्र प्रकल्प आहेत. भारत सरकार वाघांच्या संरक्षणासाठी सर्व उपाययोजना करीत असते, तरीसुद्धा वाघ हा प्राणी संकटग्रस्त आहे आणि वाघ वाचवणे नेहमीच आव्हानात्मक आहे. चोरटी शिकार आणि मानवनिर्मित कारणांमुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका आहे. तिबेट, चीनकडे होणारी वाघांची कातडी, अवयव आणि हाडे यांची तस्करी रोखणे हे नेहमीच मोठे कठीण आव्हान असते. ‘टायगर गुरू’ आणि माजी वन अधिकारी फतेहसिंह राठोड यांच्याबरोबर वाल्मिक थापर यांनी 1988 मध्ये दि रणथंबोर फाऊंडेशनची स्थापना केली. तसेच त्यांनी 1990 मध्ये ‘टायगर वॉच’ ही एनजीओ संस्था सुरू केली. ‘टायगर वॉच’ने वाघांची चोरटी शिकार रोखण्यासाठी एक विशेष प्रकल्प सुरू केला व पोलिसांच्या सहकार्याने शिकारी व तस्करांना रंगेहाथ पकडून दिले. या सर्व प्रयत्नामुळेच रणथंबोर एक आदर्श व्याघ्र प्रकल्प म्हणून गणला जातो.
‘लँड ऑफ द टायगर’ शिवाय ‘द टायगर-सोल ऑफ इंडिया’, ‘लिव्हिंग विथ द टायगर’, टायगर फायर, वाईल्ड फायर, ‘माय लाईफ विथ टायगर्स’, ‘सेव्हिंग वाईल्ड इंडिया’ ही वाल्मिक थापर यांची गाजलेली पुस्तके आहेत. बी.बी.सी.साठी त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीज सर्व जगामध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. लेखक म्हणून वाल्मिक थापर यांचे मुख्य योगदान म्हणजे, त्यांनी वाघ या वन्यप्राण्याची वास्तववादी प्रतिमा जगापुढे ठेवण्याचा केलेला प्रयत्न! वाघाची प्रतिमा केवळ भारतातच नव्हे, तर पौरात्य आणि पाश्चिमात्य जगामध्ये दंतकथा, रुढी, परंपरा यांच्याद्वारे एक गूढ प्राणी म्हणून पूर्वीपासूनच निर्माण करण्यात आली होती. आशियाई देशांतून, युरोपमध्ये रोमन काळात, मुघल काळात चित्रकला, शिल्पकला व इतर कलांच्या माध्यमातून वाघाबद्दल सांगितले गेले. प्रसिद्ध लेखक जिम कॉर्बेट यांनी वर्णन केल्याप्रमाणे या ‘मॅजेस्टिक’ राजबिंड्या प्राण्याबद्दल सर्व जगात कुतुहूल, उत्कंठा आणि गैरसमज आहेत. वाघाला धार्मिक ग्रंथामध्ये, रितीरिवाजांमध्येही महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. दुर्गादेवीचे वाहन ‘वाघ’ आहे, तर चीनमध्ये वाघ दुष्ट प्रवृत्तीचा म्हणजेच ‘ड्रॅगन’चा विनाश करतो असे मानले गेले आहे. काही आशियाई देशांमध्ये वाघांच्या पावलाचे ठसे म्हणजे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी वाघाला क्रूर, पिशाचाचे रूप मानले जाते. अशा प्रकारे माणसाने वाघाच्या विविध प्रतिमा निर्माण केल्या आहेत. म्हणजेच माणसाने वाघांसाठी बरेच काही केले आहे, म्हणूनच मी वाघांच्या वतीने व्यक्त होण्यासाठी लिहिले आहे असे वाल्मिक थापर म्हणायचे! भारताची ओळख जगामध्ये ‘टायगर कॅपिटल’ अशी आहे. जगातील एकूण वाघांपैकी 75 टक्के वाघ भारतातच आहेत; पण वाघांची अस्तित्वाची लढाई सुरूच आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून जगातील 95 टक्के वाघ नष्ट झाले आहेत. जिम कॉर्बेट, कैलास संखला, एफ. डब्लू. चॅम्पियन, बिर्ला अर्जनसिंह, बिट्टू सहगल, उल्हास कारंथ, बेलिंडा राईट, रघुनंदन चंदावत, जॉर्ज शेल्लर या प्रभृतींनी वाघांच्या संवर्धनासाठी मोठे योगदान दिले आहे. आयुष्यातील पन्नास वर्षे समर्पित केलेल्या वाल्मिक थापर यांचे स्थान यामध्ये नेहमीच अग्रणी राहील. वाघांना वाचविण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात किंवा वाघांसाठी संरक्षित क्षेत्रात कमीत कमी मानवी हस्तक्षेप असायला हवा असा त्यांचा आग्रह होतो.