

पूर्ण नाव : वैभव सूर्यवंशी
जन्म तारीख : 27 मार्च 2011
जन्म ठिकाण : समस्तीपूर, बिहार
आजवरचे संघ : बिहार, राजस्थान रॉयल्स
त्याचं नाव वैभव सूर्यवंशी. वय वर्षे 14. खरं तर, खेळण्या-बागडण्याचं वय; पण या वयात तो आयपीएलचे रणांगण गाजवतोय. चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांना खर्याअर्थाने त्यांच्या मर्यादा दाखवतोय. खरं तर, 50-60 हजार प्रेक्षकांसमोर जागतिक स्तरावरील वाखाणल्या गेलेल्या, एकापेक्षा एक अव्वल गोलंदाजांना सामोरे जाणे, त्यांचा समाचार घेणे येर्यागबाळ्याचे काम नव्हे; पण बिहारच्या या छोकर्याने ते शिवधनुष्य अगदी लिलया पेललंय. एव्हाना एका स्टार लेफ्ट हँडरचे अगदी थाटात आंतरराष्ट्रीय पटलावर आगमन झालेय, याचेच हे द्योतक!
तसे पाहता जागतिक क्रिकेटला डावखुर्या फलंदाजांची वैभवशाली परंपरा लाभलीय. ब्रायन लारा असेल, ख्रिस गेल असेल, मॅथ्यू हेडन, सनथ जयसूर्या, कुमार संगकारा, युवराज सिंग, सईद अन्वर असेल किंवा गॉड ऑफ द ऑफ साईड म्हणून ओळखला जाणारा दस्तुरखुद्द सौरभ गांगुली! डाव्या फलंदाजांची फलंदाजीच नजाकतदार असते. त्यांची शैली डोळे दीपवणारी असते आणि स्वत:चे वेगळेपणही अधोरेखित करणारी असते. वैभव सूर्यवंशी हा आणखी एक डावखुरा फलंदाज आता याच मांदियाळीत अगदी थाटाने दाखल होतोय! ‘तो आला, त्याने पाहिले, तो जिंकला’ हे सर्वांबाबत नाही शक्य होत; पण ताज्या दमाचा वैभव यालाही अपवाद ठरतोय. अगदी सन्माननीय अपवाद!
ज्याप्रमाणे कुमार संगकाराने आपल्या शैलीदार फलंदाजीने वन-डे क्रिकेटमध्ये 25 शतकांसह 14,234 धावांचा रतीब घातला. आमीर सोहेल, सईद अन्वर यांनी धावांचे कित्येक इमले उभे केले. लाराने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या प्रेमात पाडले त्याचप्रमाणे युवा, तडफदार वैभव सूर्यवंशीदेखील भविष्यात चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला, तर त्यातही नवल नसेल. आपल्या 445 वन-डे डावात वन-डे क्रिकेटच्या समीकरणाची अक्षरश: उलथापालथ करणारा आणखी एक डावखुरा खेळाडू सनथ जयसूर्याचे उदाहरण ताजे आहे. 311 वन-डे लढतीत 22 शतके, 72 अर्धशतकांसह 11,363 धावांची आतषबाजी करणारा सौरभ गांगुली हा देखील असाच आणखी एक आक्रमक डावखुरा फलंदाज. बंगालचा महाराजा असल्याने गांगुली दुसर्यांच्या धावा पळत नसे, असे गंमतीने म्हटले जात असले, तरी भारतीय क्रिकेटला अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची जिद्द, प्रेरणा ज्या-ज्या भारतीय खेळाडूंनी मिळवून दिली, त्यात या ‘गॉड ऑफ द ऑफ साईड’ सौरभ गांगुलीचे नाव प्राधान्याने येते.
10 हजारांहून अधिक धावा जमवणार्या फलंदाजांच्या यादीत सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणारा ख्रिस गेल हा जागतिक पटलावरील आणखी एक स्फोटक फलंदाज. 2000 चे दशक तर जणू लाराची नितांत सुंदर फलंदाजीचे लेणं ल्यालेली! कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीशी लढताना प्रसंगी मैदानावर रक्त ओकूनही विश्वचषक जिंकणारा आणि इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात 6 उत्तुंग, गगनभेदी षटकार खेचणारा युवराज हा डाव्या, दुर्दम्य फलंदाजी शैलीचे आणखी एक सचेतन उदाहरण! या सार्या फलंदाजांचा आदर्श वैभवसमोर आहे आणि म्हणूनच या डावखुर्या, युवा खेळाडूकडे अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष असणार आहे.
वैभव लारासारखा नीडर आहे, गांगुलीतील आक्रमकता त्याच्यात ठासून भरलेली दिसतेय आणि युवराजप्रमाणे तो आत्मविश्वासाने समोरच्या गोलंदाजाचे पृथक्करण बिघडून टाकण्यातही माहीर आहे. भविष्यातही तो याच तडफेने खेळत राहिला, तर डावखुर्या फलंदाजीतील आणखी एक मास्टर जागतिक क्रिकेटच्या मांदियाळीत सन्मानाने दाखल होईल.
गर्भश्रीमंती पायाशी लोळू लागते त्यावेळी खूप वेगळी आव्हाने निर्माण होतात. त्यावेळी संघात जागा मिळवणे, सातत्य टिकवणे, प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडत राहणे, ही खरं तर मुख्य आव्हाने असायला हवीत; पण तसे होताना दिसून येत नाही. त्याऐवजी आव्हाने निर्माण होतात, ती म्हणजे पाय जमिनीवर ठेवणे. पर्यायाने यश डोक्यात शिरू न देणे! अर्थात, शंभरातले 95 ते 97 टक्के खेळाडू या परीक्षेत हमखास नापास होतात आणि अगदी एखाद-दुसराच खेळाडू या आव्हानांवर मात करण्यात यशस्वी होतो आणि याला कारणीभूत असतो, तो या खेळाडूंवर झालेले संस्कार! घरच्या, कुटुंबाच्या आणि मित्रमंडळाच्या साथसंगतीत होणारे संस्कार ज्याप्रमाणे एखादे व्यक्तिमत्त्व घडवू शकतात, त्याचप्रमाणे एखादे व्यक्तिमत्त्व बिघडवूदेखील शकतात आणि या संस्कारांच्या अभावामुळे कित्येक तरी खेळाडू जणू वन मॅच वंडर ठरतात किंवा अचानक मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जातात आणि पाहता पाहता कुठे तरी लुप्तही होतात. याचमुळे कदाचित यंदाची आयपीएल गाजवणारा एखादा ताज्या दमाचा युवा खेळाडू पुढील हंगामातही असाच वाजतगाजत राहीलच, याची खात्री देता येत नाही.
राहता राहिला प्रश्न वैभवच्या आजवरचा वाटचालीचा, तर वैभव अतिशय संघर्षातून इथवर आलाय. मजल-दरमजल प्रवासानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे ठोठावलेत. इथून पुढे तर खरी पारख सुरू होईल. यात पहिला टप्पा असेल तो आयसीसीच्या वयोमर्यादेचा. आयसीसीची नियमावली असे सांगते की, 15 वर्षे पूर्ण होईतोवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येत नाही. वैभव येत्या मार्चमध्ये वयाची 15 वर्षे पूर्ण करेल; पण तोवर बीसीसीआयने आयसीसीसमोर विशेष बाब म्हणून प्रस्ताव ठेवला आणि आयसीसीने तो मान्य केला, तर त्यापूर्वीही वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निश्चितच जोरदार एन्ट्री करू शकतो.
मुळात वैभव ज्या कष्टातून इथवर आलाय, तो पाया किती भक्कम होता, हे पाहणे अर्थातच लक्षवेधी. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी हे पेशाने शेतकरी. दिवसभर काबाडकष्ट करावे आणि ताटात असेल ती मीठभाकर खाऊन परत दुसर्या दिवशीच्या बेगमीला लागावे, हाच त्यांचा शिरस्ता. असा एक दिवस उगवला नाही, ज्या दिवशी त्यांचा पाय शेतात लागला नसेल. शेतावरील त्यांच्या निर्व्याज प्रेमाला कशाचीच सर नसायची; पण एक दिवस असाही आला, ज्यावेळी वैभवच्या कारकिर्दीसाठी त्यांना आपला जीवापाड जपलेला जमिनीचा तुकडा विकणे भाग पडले. अतिशय कठोर मनाने त्यांनी शेत विकले. योगायोग म्हणजे स्वत: संजीव यांनाही क्रिकेटमध्येच कारकीर्द घडवायची होती; पण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना तो विचार सोडून द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शेती करण्याकडे लक्ष केंद्रित केले. अर्थात, क्रिकेटची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. मग, ते अगदी वैभवला घेऊन स्टेडियममध्ये जायचे. त्यांना मैदान, मैदानातील वातावरण, याची जाणीव त्याचवेळी होऊ लागली. स्वत: सराव करत असताना तो त्याच माईंडसेटमध्ये जायचा. याचा त्याला पुढील वाटचालीत अर्थातच फायदा झाला.
आईने तर कित्येक त्याग केले. आपल्या कुटुंबाने आपल्यासाठी सर्वस्व पणाला लावलेय, याची जाण वैभवलाही होती. त्याच्या परिश्रमात कशाचीही कसर नव्हती. कुटुंबातील थोरामोठ्यांचा त्याग त्याच्या समोर असल्याने अर्थातच त्यानेही सर्वस्व पणाला लावलेले. पुढे एकेक दिवस सरत गेला. वैभव प्रचंड मेहनत करत गेला, एकेक फटके घोटवत गेला. आणि एक दिवस असाही उगवला, ज्यावेळी या सार्या कष्टाचे, सार्या परिश्रमाचे चीज झाले. वैभवला आंतरराष्ट्रीय पटलावर संधी मिळाली. आणि त्यानेही अगदी पहिल्या चेंडूपासूनच तुटून पडत संधीचे पुरेपूर सोने केले. पहिल्या चेंडूवर त्याने फटकावलेला तो षटकार जणू आंतरराष्ट्रीय पटलावरील नव्या वादळाची नांदी देणारा होता. हे वादळ पुढील कालावधीत जागतिक क्रिकेटच्या पटलावरही प्रतिस्पर्ध्यांविरोधात घोंघावत राहील, भल्याभल्यांना जेरीस आणत राहील, हीच माफक अपेक्षा!
आपल्या तळपत्या बॅटच्या बळावर भल्याभल्यांना जेरीस आणण्यास सुरुवात केलेल्या वैभव सूर्यवंशीसाठी मांसाहार व पिझ्झा हे वीक पॉईंट; पण क्रिकेटसाठी फिटनेसला अधिक पसंती देत त्याने मांसाहार व पिझ्झा सोडून दिला आणि थेट मैदानात उतरत विविध फटके घोटवण्यावर भर दिला, जीव तोडून मेहनत घेतली, हेदेखील येथे विशेष उल्लेखनीय!