

अनिरुद्ध संकपाळ
अवघ्या 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी दिली. त्यानेही संधीचे सोनं करत गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात शतकी तडाखाच दिला. वैभवचं हे काही साधं शतक नव्हतं. त्यानं हे शतक चेस करताना ठोकलं होतं.
भारतीय क्रिकेटसाठी सरतं 2025 हे वर्ष ‘कहीं खुशी कहीं गम’ असं राहिलं आहे. कामगिरीच्या पातळीवर बघायचं झालं, तर टीम इंडियाने दमदार कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफीचा एका तपाचा वनवास संपवला. त्यापाठोपाठ भारतानं आशिया कपदेखील जिंकून पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या होत्या. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर झालेला आशिया कप खूप चर्चेचा विषय ठरला होता; मात्र त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दोन मोठे धक्के बसले. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटीतूनदेखील अचानक निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना जवळपास रडवलंच होतं. अशा सर्व मोठ्या घडामोडी भारतीय क्रिकेट वर्तुळात घडत असताना अजून आंतरराष्ट्रीय पदार्पणदेखील न झालेल्या एका अवघ्या 13 वर्षांच्या वैभवनं अख्ख्या जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. वैभव सूर्यवंशी हे नाव सर्वात आधी प्रकाशझोतात आलं ते आयपीएल 2025 च्या लिलावात!
या लिलावात राजस्थान रॉयल्सनं अवघे 13 वर्षे पूर्ण केलेल्या एका मुलावर बोली लावल्याने सर्वांनी डोळे विस्फारले. त्याला राजस्थाननं 1.1 कोटी रुपयांत खरेदी केल्यानं तर अनेकांना जवळपास हार्ट अॅटॅकच आला होता. त्यानंतर एवढ्या कमी वयाचा पोरगा या थोरामोठ्यांच्या ग्लॅमरस क्रिकेट दुनियात टिकाणार का, अशी शंका देखील बोलून दाखवली गेली; मात्र जे भारतीय क्रिकेट जवळून पाहत होते, त्यांना हा वैभव काय चीज आहे, हे माहिती होतं. फक्त गरज होती ती वैभवनं त्याची गुणवत्ता आयपीएलच्या मैदानात दाखवण्याची.
तसंच झालंही! अवघ्या 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी दिली. त्यानेही संधीचे सोनं करत गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात शतकी तडाखाच दिला. वैभवचं हे काही साधं शतक नव्हतं. त्यानं हे शतक चेस करताना ठोकलं होतं. वैभवनं या शतकाच्या जोरावर आयपीएल इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. तो आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयाचा बोली लागलेला खेळाडू ठरलाच त्याचबरोबर तो टी-20 मध्ये सर्वांत कमी वयाचा शतकवीरदेखील ठरला.
भारतीय क्रिकेटपटूच्या मागं वाद लागणार नाही असं कधी झालं आहे का? वैभवही त्याला अपवाद नव्हता. अवघ्या 13 वर्षांचा वैभव ज्यावेळी मोठमोठी मैदानं मारतोय, हे पाहून अनेकांना त्याच्या वयाबाबत शंका येऊ लागली. तो आपलं वय चोरत तर नसावा, अशी चर्चा कधी दबक्या आवाजात, तर कधी उघडपणे माध्यमात होऊ लागली.
मात्र, बीसीसीआयच्या बोनटेस्टमध्ये वैभवनं वय चोरलं नसल्याचं स्पष्ट झालं. त्याबाबतचा खुलासादेखील त्यांच्या वडिलांनी केला आहे, तसंही जरी वैभवचं वय कमी असलं, तरी त्याची क्रिकेटची समज, गुणवत्ता अन् बोलणंदेखील एखाद्या कसलेल्या क्रिकेटपटूसारखं आहे. ‘वयाच्या 13 व्या वर्षी IPL लिलावात करोडपती झालो. माझी जगभर चर्चा होतेय याची...’ याची हवा डोक्यात जाऊ न देण्याइतपत त्याला शहाणपण आलं आहे.
त्यानं मी फक्त माझ्या क्रिकेटकडं लक्ष देतो. मला फक्त बॅटिंग करायला पाहिजे. मला तेच आवडतं, असं मुलाखतीत उत्तर दिलं होतं. बरं, तो हे कोणीतरी सांगितलं म्हणून बोलत नव्हता. पीआर अॅक्टिव्हिटी म्हणून बोलत नव्हता, तर त्यानं पुढं ते आपल्या बॅटनं सिद्धदेखील करून दाखवलं.
विरेंद्र सेहवागलाही बॅटनं दिलं उत्तर
तसंही विरेंद्र सेहवाग त्याच्याबद्दल बोलताना म्हणाला होता की, असे किती वैभव आले अन् गेले; मात्र जो डोक्यात हवा जाऊ देत नाही अन् कामगिरीत सातत्य दाखवतो, तोच या अत्यंत क्रूर समजल्या जाणार्या क्रिकेटविश्वात टिकतो.
वैभवनं सेहवागचं हे म्हणणं जणू मनाला लावून घेतलं. त्यानं 2025 हे वर्ष आपल्या तुफानी खेळींनी गाजवलं. यूथ वनडे क्रिकेट स्पर्धेत वैभव सूर्यवंशीनं इंग्लंडविरुद्ध 52 चेंडूंतच शतक ठोकलं. भारताकडून यूथ क्रिकेटमध्ये ठोकण्यात आलेलं हे सर्वात वेगवान शतक होतं.
त्यानंतर त्यानं पाकिस्तानलादेखील धुतलं. यूथ वनडे क्रिकेट स्पर्धेत त्यानं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 53 चेंडूंत तडाखेबाज शतक ठोकलं. तो त्या सामन्यात 78 चेंडूंत 143 धावा करून बाद झाला. त्यानंतर त्यानं उन्मुक्त चंदचे यूथ वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 38 षटकारांचे रेकॉर्डदेखील मोडले.
बाळानं आपले पाय पाळण्याबाहेर काढले. अजून थोडा मोठा कारनामा करण्याची वेळ आली होती. वैभवची निवड रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेसाठी झाली. तिथंही या डावखुर्या धडाकेबाज फलंदाजानं आपल्या बॅटची धार दाखवून दिली. भारत अ संघाकडून खेळताना त्यानं यूएईविरूद्ध 42 चेंडूंत 144 धावा ठोकल्या. त्यानं शतक 32 चेंडूंतच पूर्ण केलं होतं. त्यानं आपली खेळी 15 षटकार अन् 11 चौकारांनी सजवली. तो वरिष्ठ स्तरावर देशाचं नेतृत्व करत शतक ठोकणारा सर्वात तरुण पुरुष क्रिकेटपटू ठरला.
नव्या पिढीचं नवं क्रिकेट कसं असणार आहे, याची झलक दाखणारा वैभव इथंच थांबला नाही. त्यानं वयाची 15 वर्षे पूर्ण होण्याच्या आतच आपलं तिसरं टी-20 शतक ठोकलं होतं. बिहारकडून खेळणार्या वैभवनं सईद मुश्ताक अली ट्रॉफीत महाराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली.
त्यानं काही दिवसांपूर्वीच झालेल्या विजय हजारे अरुणाचल प्रदेशविरुद्ध 84 चेंडूंत 190 धावांची खेळी केली होती. त्याने या सामन्यात 36 चेंडूंतच शतकी मजल मारली. लिस्ट ए क्रिकेटमधली ही सर्वात वेगवान शतकी खेळी ठरली. याच खेळीदरम्यान वैभवनं एबी डिव्हिलियर्सचं 64 चेंडूंत 150 धावा करण्याचं रेकॉर्ड मोडलं. त्यानं फक्त 59 चेंडूंत हा टप्पा पार केला होता. तो आता लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात युवा शतकवीरदेखील ठरला होता.
जवळपास एका वर्षाच्या स्पॅनमध्ये एवढे धमाके करणार्या या क्रिकेटपटूची सरकार दखल घेणार नाही असं कसं होईल? भारताचा डावखुरा सचिन म्हणून ज्याला ओळखलं जाऊ लागलं आहे. या वैभव सूर्यवंशीला 26 डिसेंबर रोजी प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं नावाजण्यात आलं. त्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा 18 वर्षांखालील मुलांसाठी देण्यात येणारा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
वैभवनं हे सगळं जवळपास एका वर्षाच्या स्पॅनमध्ये कमवलं; मात्र त्यासाठी त्याने अनेक वर्षे कष्ट केले होते. 2011 मध्ये जन्मलेल्या वैभवनं अवघ्या 4 वर्षांचा असताना बॅट हातात घेतली. मुलाच्या क्रिकेट होण्याच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी संजीव सूर्यवंशी यांनीदेखील मोठे कष्ट उपसले. त्यांना आपल्या मुलाची गुणवत्ता खूप कमी वयातच लक्षात आली होती. त्याच्या या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आपली शेतजमीनही विकली.
या कष्टाचं चीज वैभवनं अवघ्या 13 व्या वर्षीच केलं. त्याच्यासाठी आयपीएल, पैसा, ग्लॅमर अन् मोठ्या सर्कलमध्ये खेळण्याचा अनुभव या सर्व गोष्टी खुल्या झाल्या आहेत; मात्र कमी वयात मिळालेलं प्रसिद्धीचं वैभव अल्पायुषी ठरतं, अशी इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. आता वैभव पृथ्वी शॉ होणार की सचिन तेंडुलकर, हे त्याच्याच हातात आहे.