Newspaper reading: वृत्तपत्र वाचनाचे स्वागतार्ह पाऊल

उत्तर प्रदेश सरकारने प्रार्थनेच्या वेळी किमान दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा निर्णय घेतला असून सबंध देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे
Newspaper reading
Newspaper reading: वृत्तपत्र वाचनाचे स्वागतार्ह पाऊलPudhari Photo
Published on
Updated on

उत्तर प्रदेश सरकारने प्रार्थनेच्या वेळी किमान दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा निर्णय घेतला असून सबंध देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. ‌‘काळाची गरज ओळखून घेतलेला निर्णय‌’ असे या पावलाचे वर्णन करावे लागेल. वृत्तपत्रे ही माहिती आणि ज्ञानाने समृद्ध करणारी, मनोरंजन, कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान यांसह सर्व विषयांमध्ये वाचकांना परिपूर्ण करणारी एक प्रचंड मोठी डेटा बँक असते.

आजच्या वेगवान डिजिटल क्रांतीच्या काळात मानवी जीवन पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकले आहे. विशेषतः लहान मुले आणि तरुणांच्या हातातील पुस्तकांची जागा आता मोबाईल फोन आणि लॅपटॉपच्या स्क्रीनने घेतली आहे. बोटांनी पुस्तकाची पाने उलटण्याऐवजी आता स्क्रीनवर ‌‘स्क्रोल‌’ करण्याची सवय जडली आहे. मुले-युवकांबाबत तर ही सवय म्हणजे जणू उद्याच्या भविष्यासाठीची संजीवनीच आहे, असा समज लक्षावधी लोकांचा झालेला आहे. 2024-25 या वर्षात भारतीयांनी एकत्रितपणे साधारण 1.1 लाख कोटी तास मोबाईलवर घालवले आहेत. लहान मुलांमधील मोबाईलचे व्यसन हा सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. 5 ते 16 वयोगटातील 60 टक्के मुलांमध्ये ‌‘डिजिटल ॲडिक्शन‌’ची लक्षणे दिसून येत आहेत. पाच वर्षांखालील मुले दररोज सरासरी 2.2 तास स्क्रीनसमोर घालवत आहेत, जे आरोग्याच्या दृष्टीने शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट आहे.

अशा डिजिटल कोलाहलाच्या वातावरणात उत्तर प्रदेश सरकारने त्या राज्यातील शाळांमध्ये हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्याचा आणि प्रार्थनेच्या वेळी किमान दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा निर्णय घेतला असून सबंध देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. ‌‘काळाची गरज ओळखून घेतलेला निर्णय‌’ असे या पावलाचे वर्णन करावे लागेल. वाचन संस्कृती ही केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून, ती व्यक्तीच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाचा कणा असते.

वृत्तपत्रे ही माहिती आणि ज्ञानाने समृद्ध करणारी, मनोरंजन, कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान यांसह सर्व विषयांमध्ये वाचकांना परिपूर्ण करणारी एक प्रचंड मोठी डेटा बँक असते. आजच्या वेगवान डिजिटल युगात माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध असले, तरी वृत्तपत्रांचे स्थान आजही अढळ आहे. शालेय जीवन हा मानवी आयुष्याचा पाया असतो आणि या काळात जडणघडण होण्यासाठी वृत्तपत्र वाचन हे अत्यंत प्रभावी साधन आहे. एखादा विद्यार्थी वृत्तपत्र वाचतो, तेव्हा त्याच्या समोर जगाचा आरसा उभा राहतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढण्यास मदत होईल, जी आजच्या विचलित करणाऱ्या डिजिटल युगात सर्वात मोठी समस्या बनली आहे. वृत्तपत्र वाचनामुळे शब्दविश्व व्यापक बनते. यामुळे विद्यार्थ्यांची संवाद कौशल्ये सुधारतात. त्यामुळेच उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम केवळ शैक्षणिक गुणवत्तेवरच नव्हे, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही होणार आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांनी दररोज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा बातम्यांसोबतच महत्त्वाचे अग्रलेख वाचणे अपेक्षित आहे. अग्रलेख वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते. एखाद्या घटनेकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन त्यांना समजतात, ज्यामुळे त्यांची सारासार विचारशक्ती प्रबळ होते. या उपक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी दररोज पाच कठीण शब्द निवडून ते सूचना फलकावर प्रदर्शित करणे. ही कृती विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. जेव्हा मुले स्वतः शब्द शोधतात आणि ते इतरांना सांगतात, तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो आणि भाषेवरील पकड घट्ट होते.

हिमाचल प्रदेश सरकारने अशाच प्रकारचा निर्णय यापूर्वी घेतला होता आणि आता उत्तर प्रदेशनेही त्या दिशेने पाऊल उचलले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वृत्तपत्र वाचन हा अभ्यासाचा अविभाज्य भाग असतो. शालेय स्तरावरच ही सवय लागल्यास भविष्यात त्यांना मोठ्या परीक्षांना सामोरे जाताना चालू घडामोडींचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचे ओझे वाटणार नाही.

डिजिटल तंत्रज्ञानाचे तोटे आज स्पष्टपणे समोर येत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता खुंटत चालली आहे. पुस्तके किंवा वृत्तपत्रे वाचताना मेंदूला विचार करावा लागतो आणि चित्रांच्या पलीकडे जाऊन एक नवीन जग निर्माण करावे लागते, जे मोबाईलवरील तयार व्हिडीओ पाहताना घडत नाही. वृत्तपत्र वाचनाची ही सवय मुलांना स्क्रीनपासून दूर नेऊन पुन्हा एकदा कागदावरील अक्षरांच्या विश्वाकडे वळवेल. वाचन संस्कृती रुजल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीवदेखील निर्माण होईल.

देशात आणि जगात काय चालले आहे, हे समजल्यामुळे ते अधिक जागरूक नागरिक बनतील; मात्र या उपक्रमाचे यश हे काटेकोर अंमलबजावणीवर अवलंबून आहे. केवळ सरकारी आदेश काढून चालणार नाही, तर शिक्षकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शाळांमधील ग्रंथालये अद्ययावत करणे आणि तिथे विद्यार्थ्यांना सहजगत्या वृत्तपत्रे मिळू शकतील, याची तजवीज करणे गरजेचे आहे. हा उपक्रम कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि सातत्याने राबवला गेला, तर उत्तर प्रदेशातील शिक्षण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडून येईल.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यातही सुधारणा होईल. बातमी वाचून त्यावर वर्गात चर्चा केल्याने विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल. पाठ्यपुस्तकातील ज्ञान परीक्षेत यश मिळवून देऊ शकते; पण व्यावहारिक ज्ञान आणि जगाची माहिती ही वृत्तपत्रे आणि अवांतर वाचनातूनच मिळते.

पालकांनीही या उपक्रमाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. घरात वृत्तपत्र येत असेल आणि पालक स्वतः वाचत असतील, तरच मुलेही त्याचे अनुकरण करतात. यासाठी पालकांनीही सोशल मीडिया, रिल्स, यूट्यूब यावरील अवलंबित्व कमी करून रोजचे वृत्तपत्र वाचायलाच हवे. स्थानिक भागातील अनेक बारीकसारीक घटना व घडामोडींविषयीची माहिती वृत्तपत्रातून मिळते. या सर्वांचा विचार करता उत्तर प्रदेश सरकारची ही पाऊलवाट इतर राज्यांसाठीही पथदर्शक ठरू शकते. डिजिटल युगात पुस्तकांकडे परतणे हे कठीण वाटत असले, तरी अशा प्रकारचे जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणतील. मुलांची मने ही कोरी पाटी असतात. त्यावर वाचनाचे संस्कार झाले, तर भविष्यात ते सुसंस्कृत आणि वैचारिक समाज घडवण्यास मदत करतील. वृत्तपत्र वाचन हे केवळ बातम्यांचे वाचन नसून, ते विचार प्रक्रियेला गती देणारे इंधन आहे. त्यामुळे ‌‘मोबाईल कडून पुस्तकांकडे‌’ हा प्रवास खऱ्याअर्थाने यशस्वी करण्यासाठी हा उपक्रम एक भक्कम पाया ठरेल, यात शंका नाही.

वृत्तपत्रामध्ये राजकारण, विज्ञान, खेळ आणि अर्थशास्त्र अशा विविध विषयांची ) माहिती एकाच ठिकाणी मिळते. ही माहिती मेंदूमध्ये साठवताना विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती (मेमरी रिटेंशन) तीक्ष्ण होते. ज्या विद्यार्थ्यांमध्ये नियमित वाचनाची सवय असते, त्यांचा शब्दसंग्रह सरासरी विद्यार्थ्यांपेक्षा 40 टक्क्यांनी अधिक असतो. हाच शब्दसंग्रह त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये आणि दैनंदिन जीवनातील कठीण प्रसंगांत अचूक निर्णय घेण्यास मदत करतेो.

आजच्या काळात मुलांचे मोबाईल वापराचे व्यसन ही पालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तासन्‌‍ तास स्क्रीनसमोर घालवल्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, निद्रानाश आणि एकाग्रतेचा अभाव अशा समस्या वाढल्या आहेत. अशा स्थितीत शालेय स्तरावर वृत्तपत्र वाचनाची सवय लावणे हा ‌‘डिजिटल डिटॉक्स‌’चा एक उत्तम मार्ग आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे तंत्रज्ञानावर असलेले मानसिक अवलंबित्व कमी करून नैसर्गिक गोष्टींकडे वळणे होय. वृत्तपत्र हाताळणे, पाने उलटणे आणि त्यातील मजकूर डोळ्यांनी वाचणे या प्रक्रियेमुळे मेंदूला एक प्रकारचे मानसिक स्थैर्य मिळते. मोबाईलमधील ‌‘शॉर्ट व्हिडीओ‌’ किंवा ‌‘रिल्स‌’मुळे मुलांमध्ये ‌‘डोपामाईन‌’ नावाचे रसायन वेगाने स्रवते आणि त्यामुळे त्यांना तात्पुरता आनंद मिळतो; पण दीर्घकालीन एकाग्रता नष्ट होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याउलट वृत्तपत्रातील एखादा दीर्घ लेख किंवा संपादकीय वाचताना संयम राहतो. हा संयम मुलांना डिजिटल जगाच्या आभासी आकर्षणापासून दूर नेण्यास मदत करतो.

केवळ पाठ्यपुस्तके वाचत राहिल्यास परीक्षेत गुण मिळू शकतात; पण जगाचे ज्ञान आणि वैचारिक प्रगल्भता केवळ अवांतर वाचनातूनच येते. वृत्तपत्र हे अवांतर वाचनाचे पहिले पाऊल आहे. जेव्हा मुले वृत्तपत्रातील कठीण शब्द निवडतात आणि त्यांचा अर्थ शोधतात, तेव्हा त्यांची जिज्ञासू वृत्ती जागृत होते. उत्तर प्रदेश सरकारचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी काही ‌‘डिजिटल डिटॉक्स‌’चे इतर मार्गही अवलंबले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, शाळांमध्ये ‌‘नो गॅझेट झोन‌’ तयार करणे, आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे तांत्रिक साधनांशिवाय शिक्षण देणे आणि हस्तलिखितांना प्रोत्साहन देणे असे काही अभिनव वाटणारे उपक्रम राबवता येतील. विद्यार्थी स्वतःच्या हाताने माहिती लिहितात आणि कागदावर वाचतात, तेव्हा त्यांच्या मेंदूचे दोन्ही गोलार्ध सक्रिय होतात. हे केवळ शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे, तर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे, तर उत्तर प्रदेश सरकारने उचललेले हे पाऊल केवळ एक शैक्षणिक बदल नसून ती एक मानसिक क्रांती आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतातील 5 वर्षांपर्यंतची मुले दररोज सरासरी 2 तासांहून अधिक वेळ ‌‘स्क्रीन‌’ समोर घालवत आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली असताना भारतात लहान मुलांचे सोशल मीडिया अकाऊंटस्‌‍ वाढत आहेत. हे धोक्याचे लक्षण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news