UPI economic impact | यूपीआय : अर्थव्यवस्थेचा सक्षम पाया

UPI strong foundation of indian economy
UPI economic impact | यूपीआय : अर्थव्यवस्थेचा सक्षम पाया
Published on
Updated on

संजीव ओक

यूपीआयने ऑक्टोबर महिन्यात आजवरच्या व्यवहारांचा उच्चांक नोंदवला. व्हिसा या जगप्रसिद्ध कार्डपेक्षा अधिक व्यवहार करण्याची कामगिरी यूपीआयने यापूर्वीच नोंदवली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही या प्रणालीच्या यशावर शिक्कामोर्तब केले असून, जगभरात प्रवेशासाठी ती तयारीत आहे.

नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसद्वारे (यूपीआय) झालेल्या व्यवहाराने मूल्य आणि व्यवहारांची संख्या यांच्या बाबतीत अनुक्रमे 27.28 लाख कोटी रुपये आणि 20.7 अब्ज रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. मूल्याच्या बाबतीत मे महिन्यात 25.14 लाख कोटी रुपये नोंदवले गेले होते, तर व्यवहारांच्या बाबतीत जुलैमध्ये 19.47 अब्ज रुपये ही उच्चांकी कामगिरी ठरली होती. एनपीसीआयने असे म्हटले आहे की, ऑक्टोबरमध्ये व्यवहारांचे मूल्य 27.28 लाख कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षी याच महिन्यात 23.49 लाख कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर यात 16 टक्के इतकी घवघवीत वाढ नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर महिन्यात सरासरी दैनिक व्यवहार 668 दशलक्ष इतके होते, ज्याचे सरासरी मूल्य 87,993 कोटी रुपये इतके होते. यूपीआय व्यवहारांनी नोंदवलेला हा नवा उच्चांक भारताच्या आर्थिक व्यवहारांचे भवितव्य अधोरेखित करणारा ठरला आहे. डिजिटल व्यवहार, पारदर्शकता आणि सुरक्षिततेच्या या युगात यूपीआय प्रणाली म्हणजे केवळ सुविधा नसून, ती अर्थव्यवस्थेचा पाया बनली आहे.

यूपीआय ही भारत सरकार आणि एनपीसीआयने निर्माण केलेली पायाभूत डिजिटल पेमेंट प्रणाली आहे, जी क्षणात व्यवहार करण्यास सक्षम आहे. यूपीआय व्यवहारांनी नोंदवलेला उच्चांक हा अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे. भारतात ही प्रणाली यशस्वी ठरणार नाही, असे म्हटले गेले होते. तथापि, महानगरांपासून ग्रामीण भागापर्यंत आज यूपीआय प्रणाली वापरली जाते. या प्रणालीचा व्यापक स्वीकार केलेला दिसून येतो. शहरातल्या दुकानांपासून गावातील किराणा दुकानांपर्यंत यूपीआय स्वीकारली जाते. त्यामुळे रोकड न बाळगता व्यवहार करणे सहजसाध्य झाले आहे. यात व्यवहार डिजिटली होतात. त्यामुळे वेळ पडल्यास ते ट्रॅक करता येतात. पारदर्शक व्यवहार त्यामुळे शक्य झाले आहेत. यूपीआयमध्ये संबंधितांची माहिती उघड न करता केवळ क्यूआर कोडमार्फत व्यवहार केले जातात. त्यामुळे गोपनियता कायम राहते. आता विदेशातही या प्रणालीचा विस्तार होत असून अनेक राष्ट्रांनी या प्रणालीचा स्वीकार केला आहे. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक पातळीवर सन्मान मिळालेला दिसून येतो.

यूपीआय प्रणालीमुळे भारतातील अधिकाधिक व्यवहार हे डिजिटल पद्धतीने म्हणजेच कॅशलेस तसेच कार्डलेस पद्धतीने होत आहेत. भौगोलिक अंतर, त्यासाठी लागणारा वेळ आणि गोपनियता कायम राखत कमीत कमी वेळात पूर्ण होणारे हे व्यवहार अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लावत आहेत. छोट्या व्यापार्‍यांना आणि अगदी टपरीधारकांनाही ही प्रणाली खूप फायदेशीर ठरली आहे. रोख रक्कम जवळ न बाळता, हे व्यवहार पूर्ण होतात. त्यामुळे त्यांचा वेगही वाढला आहे. यूपीआयने व्यवहारांच्या खर्चातही मोठा बदल घडवून आणला आहे. जुन्या बँकिंग प्रणालीमध्ये लागणारे व्यवहार शुल्क, त्यासाठी लागणारा वेळ आणि कागदपत्रांची आवश्यकता यांच्यासाठी जो जो खर्च येत होता, तो आता तुलनात्मकद़ृष्ट्या खूप कमी झाला आहे.

ग्रामीण भागात, जिथे तुलनेने बँकांची उपस्थिती कमी आहे, तिथे यूपीआय हे एक क्रांतिकारी साधन ठरले आहे. स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रवेशाने ग्रामीण भागातील जनताही डिजिटल व्यवहारांत सहभागी झाली आहे. आर्थिक समावेशनात ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिक सक्षमीकरणात यूपीआय मदत करत आहे. ही प्रणाली केवळ भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वीकारली जाण्याच्या मार्गावर आहे. भारतीय प्रवासी, व्यापारी आणि तंत्रज्ञान व्यवसाय डिजिटल व्यवहार अधिक गतिमान बनवत आहेत. येणार्‍या काळात म्हणूनच ती अनेक देशांत सक्रिय झालेली दिसून येईल. म्हणजेच, भविष्यात भारतीयांना विदेशात प्रवास करताना विदेशी चलन जवळ बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही म्हणता येईल. सिंगापूरमध्ये यूपीआय पेनाऊशी जोडलेले आहे. यूएई आणि मॉरिशसमध्ये भारतीय प्रवासी यूपीआय वापरून वस्तू आणि सेवांसाठी पेमेंट करू शकतात. फ्रान्समध्ये भारतातील पर्यटक आयफेल टॉवरवर क्यूआर कोड स्कॅन करत रुपयांमध्ये पेमेंट करू शकतात. नेपाळ आणि भूतानने यापूर्वीच यूपीआयचा स्वीकार केला आहे आणि आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील मध्यवर्ती बँका आणि फिनटेकशी चर्चा सुरू आहे.

याचाच अर्थ रिअल टाईम पेमेंटमध्ये भारताचे वर्चस्व राहणार आहे. सार्वजनिक डिजिटल नवोपक्रमासाठी यूपीआय हा जागतिक आदर्श ठरला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यूपीआयला दिलेली मान्यता ही या प्रणालीच्या यशस्वीतेची साक्ष ठरली आहे. नाणेनिधीने एका अहवालात अधोरेखित केले आहे की, यूपीआयने भारताच्या पेमेंट लँडस्केपमध्ये बदल घडवून आणला असून, आकारमानात ती जगातील सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट सिस्टीम बनली आहे. यूपीआय दररोज किमान 640 दशलक्ष पेक्षा जास्त व्यवहार करते. जगभरात उपस्थित असलेल्या व्हिसा कार्डच्या व्यवहारांची संख्या ही 639 दशलक्ष इतकी आहे. यूपीआयने केवळ भारतात सक्रियता असताना व्हिसा कार्डला मागे टाकले आहे, ही उल्लेखनीय बाब ठरते. तसेच 2016 मध्ये ही प्रणाली सादर केली गेली. त्यानंतरच्या 9 वर्षांत यूपीआयने हा पराक्रम केला आहे. भारतात होणार्‍या व्यवहारांपैकी सरासरी 85 टक्के व्यवहार हे आज यूपीआयच्या माध्यमातून होत आहेत. डिजिटल व्यवहार वाढल्याने आर्थिक समावेशन होत असून, ज्यांना पारंपरिक बँकांमध्ये प्रवेश नसतो, त्यांनाही डिजिटल व्यवहाराच्या विश्वात प्रवेश मिळणे सहजसाध्य झाले आहे. हे लोकशाहीच्या तत्त्वांना पूरक असेच आहे. प्रत्येक व्यक्तीला यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे.

भारताने यूपीआयच्या माध्यमातून केवळ डिजिटल व्यवहारात क्रांती केली असे नाही, तर त्याने व्यापक आर्थिक धोरणात एक नवा बदल घडवून आणला आहे. यूपीआय प्रणाली ही म्हणूनच भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया ठरली आहे. देयकांमधील गळती कमी होण्यास मोलाची मदत झाली आहे. खुल्या पायाभूत सुविधांमुळे फिनटेक कंपन्यांना क्रेडिट, विमा आणि यूपीआय यासारख्या नवीन सेवा सादर करण्याची परवानगी मिळाली आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि व्यावसायिक व्यवहारांसह उच्च मूल्याच्या पेमेंटसाठी यूपीआयचा वापर केला जात आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका आणखी जबाबदारीची बनली आहे. यूपीआयच्या यशात भारतातील डिजिटल परिवर्तनाचे प्रतिबिंब दिसून येते. रोख रकमेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेला देश आता जगातील सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट सिस्टीम ठरला आहे. भारत आपल्या नागरिकांना सक्षम बनवत असतानाच इतर राष्ट्रांनादेखील यासाठीची प्रेरणा देण्याचे काम करत आहे. यूपीआयला नाणेनिधीने दिलेली मान्यता, जागतिक भागीदारी आणि वाढत्या व्यवहारांच्या आकडेवारीतून हे सिद्ध होते की, यूपीआय ही डिजिटल युगात भारताच्या नावीन्यपूर्णतेचे, समावेशकतेचे आणि नेतृत्वाचे प्रतीक बनत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news