

युक्रेनने नुकत्याच ‘ऑपरेशन स्पायडर वेब’च्या माध्यमातून रशियावर अत्यंत योजनाबद्ध आणि आक्रमक ड्रोन हल्ला केला असून, या हल्ल्यामुळे महागड्या संरक्षण प्रणालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भविष्यातील लढाया हे तांत्रिक कल्पकता, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि मानवरहित युद्धशक्ती यांच्या अधीन असतील आणि या नव्या युगात जो देश या क्षेत्रात आघाडी घेतो, तोच खरा शक्तिमान समजला जाईल, हा संदेशही या हल्ल्याने दिला आहे.
गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील घनघोर युद्ध लवकरच विरामाकडे जाईल अशा शक्यता निर्माण झालेल्या असतानाच या युद्धाला नवी कलाटणी देणारी घटना नुकतीच घडली. युक्रेनने रशियाच्या सायबेरियामधील इर्कुत्सक प्रदेशातील बेलाया येथील लष्करी तळावर भीषण ड्रोन हल्ला केला. युक्रेन सीमेपासून हा तळ तब्बल 4000 किलोमीटर अंतरावर आहे. याखेरीज रशियातील इतर ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामध्ये रशियाची 41 विमाने नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (एसबीयू) या हल्ल्याला आतापर्यंतचा रशियावर झालेला सर्वांत मोठा हल्ला असे म्हटले आहे. युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडर वेब’अंतर्गत अत्यंत खास आणि रणनीतिक पद्धतीने हा हल्ला राबविला आहे. या हल्ल्याच्या व्याप्तीची आणि रशियाला झालेल्या नुकसानीच्या आधारे याची तुलना 1941 मधील पर्ल हार्बर हल्ल्याशी केली जात आहे. डिसेंबर 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बर येथील अमेरिकन नौदल तळावर अचानक हवाई हल्ला केला होता आणि या हल्ल्यात अमेरिकेचे नौदल मोठ्या प्रमाणात नष्ट झाले होते. त्या हल्ल्यात 2,403 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. पर्ल हार्बरवरील हा हल्ला अमेरिकेसाठी निर्णायक ठरला आणि त्यानंतर अमेरिका थेट दुसर्या महायुद्धात उतरली. त्या हल्ल्याने अमेरिकेच्या युद्ध धोरणात मोठा बदल घडवून आणला होता.
युक्रेनने रशियावर जे हवाई हल्ले ड्रोनद्वारे केले आहेत, ते त्याच पद्धतीचे, अचानक आणि दूरगामी परिणाम घडवणारे मानले जात आहेत. ‘स्पायडर वेब’ नावाच्या या ऑपरेशनची तयारी सुमारे दीड वर्षापासून सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. युक्रेनने 117 ड्रोन वापरून रशियन हवाई तळांंवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यामुळे रशियाला सुमारे 7 ते 9 अब्ज डॉलर्सचा फटका बसला असल्याचा दावा केला जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की यांनी याला त्यांच्या सेनेचा आतापर्यंतचा सर्वात लांबच्या अंतराचा हल्ला म्हटले आहे.
यूक्रेनने रशियामध्ये निर्धारित स्थळांवर हल्ला करण्यासाठी थेट ड्रोन लाँच करण्याऐवजी एक वेगळा आणि अभिनव मार्ग अवलंबला आहे. स्फोटकांनी भरलेले युक्रेनी ड्रोन लाकडी संरचनेच्या आत लपवून रशियामध्ये तस्करीच्या मार्गाने पोहोचवले गेले. हे लाकडी ढांचे ट्रकवर लोड करून एयरबेसच्या जवळपर्यंत नेण्यात आले होते. टार्गेटेड एयरबेसच्या जवळ पोहोचल्यावर पुढील कारवाई करण्यात आली. या ड्रोन्सनी त्यांच्या ध्येयस्थळी पोहोचल्यानंतर लाकडी आवरणाचे छप्पर दुरून उघडले आणि ड्रोनने उड्डाण करत भीषण हल्ला सुरू केला. ‘ऑपरेशन स्पायडर वेब’चा व्हिडीओ शेअर करत जेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियातील या हल्ल्यामध्ये वापरलेल्या ड्रोनचे नियंत्रण एफएसबी मुख्यालयाच्या अगदी जवळून करण्यात आले होते.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये रशियाची एकूण 41 विमाने नष्ट झाली आहेत. रशियाचे न्यूक्लिअर क्षमतेचे ट्यूपोलेव 95, ट्यूपोलेव 22 बॉम्बवर्षक आणि ए-50 ही सर्व विमाने या हल्ल्यात बेचिराख झाली आहेत. या विमानांचा वापर त्यांच्या मातीत बॉम्बस्फोट करण्यासाठी केला जात होता. युक्रेनचा ताजा हल्ला हाही पर्ल हार्बर हल्ल्यासारखाच युद्ध पद्धतीतील एक निर्णायक आणि मोठा टप्पा मानला जात आहे. रशियाची एस-400 प्रणाली यावेळी पुरेशी तैनात नसल्यामुळे हा हल्ला कुचकामी करणे रशियाला शक्य झाले नाही. परिणामी, रशियाच्या वायुदलाचे सुमारे 30 ते 40 टक्के नुकसान झाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अणुबॉम्ब टाकण्यासाठी जी सिस्टीम रशियाकडे होती तीही या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली आहे. याचा अर्थ रशियाची अणुहल्ला करण्याची शक्ती पूर्णपणे संपली आहे; परंतु एवढे नक्की की, या प्रणालीचे यापूर्वी इतके नुकसान कधीही झालेले नव्हते. 1991 मध्ये सोव्हिएत सोशलिस्ट प्रजासत्ताकांचा संघ म्हणजेच यूएसएसआरचे पतन झाले आणि 13 ते 14 देश सोव्हिएत रशियामधून फुटून बाहेर पडले. त्यावेळी रशियाचे 35 ते 40 टक्के न्युक्लियर वेपन्स वेगळे झाले आणि इतर लहान देशांमध्ये वाटले गेले. आताच्या युक्रेन ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाचे जवळपास तेवढे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. यावरून या हल्ल्याची व्याप्ती आणि दाहकता लक्षात येते.
या हल्ल्यामध्ये अचूक टीमवर्क आणि अचूक टायमिंग या दोन गोष्टींबाबत युक्रेनने केलेले नियोजन महत्त्वाचे ठेेेरले. रशियाच्या आतमध्ये घुसून वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केल्यामुळे रशियाची संरक्षणप्रणाली कुचकामी ठरली असावी. कारण बहुतांश वेळा संरक्षण प्रणाली ही शत्रूच्या सीमेकडे पहात असते. परंतु प्रत्येक विमानतळाभोवती किंवा फायटर प्लेन भोवती चारही दिशांना पाहणारी अँटीवेपन सिस्टीम बसवलेली असते. ही प्रणाली चार स्तरीय असते. पहिला, दुसरा, तिसरा अशा प्रकारच्या चार टप्प्यांमधील आयुधे शत्रूच्या ड्रोन्सना किंवा विमानांना बरबाद करतात. पण या मल्टिलेयर सिस्टीम्स बहुतेक वेळा महत्त्वाच्या टार्गेटस्नजीक तैनात केल्या जातात. तसेच ही सिस्टीम 24 तास ऑन नसते. कारण तसे करणे प्रचंड खर्चिक असते. त्यामुळे एखादा अलर्ट आल्यानंतर तात्काळ ती सज्ज केली जाते आणि गरजेनुसार ती आपले काम सुरु करते. याचाच अर्थ या अत्याधुनिक प्रणाली महागड्या असूनही त्या सदासर्वकाळ शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षितता प्रदान करु शकत नाहीत, हे यानिमित्ताने सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.
ड्रोन आता फक्त एक साधे युद्धशस्त्र राहिलेले नाही, तर ते स्वतःमध्ये एक स्वतंत्र आणि प्रभावी युद्धतंत्र बनले आहे. रशिया-युक्रेन युद्धाने हे निर्विवाद सिद्ध करून दाखवले आहे की भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोनच निर्णायक भूमिका बजावतील. ड्रोन तंत्रज्ञानात प्रावीण्य असणारा देश कोणत्याही युद्धात वरचढ ठरणार आहे. एक सैनिकही न गमावता शत्रू देशाच्या हद्दीत हजारो किलोमीटर आत घुसून महत्त्वाची लष्करी ठिकाणे लक्ष्य करणे ही कल्पना आज ड्रोन तंत्रज्ञानामुळे सत्यात उतरलेली आहे. ड्रोन युद्धामुळे आता पारंपरिक युद्धपद्धतींचे मूळ स्वरूपच बदलत चालले आहे. आजपर्यंत जगभरातील देशांनी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि हवाई वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. पण युक्रेनने दाखवून दिले आहे की भविष्यात कोणत्याही देशाची हवाई ताकद ही मानवरहित ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ड्रोन आणि दीर्घ पल्ल्याचे ड्रोन यांच्या आधारावर मोजली जाणार आहे. हा संदेश संपूर्ण जगासाठी आहे. युक्रेनने जगाला हे देखील दाखवून दिले आहे की, अत्यंत कमी खर्चाचे, अगदी सामान्य तंत्रज्ञानावर आधारित, पण कल्पकतेने आणि अचूकतेने केलेल्या नियोजित ड्रोन हल्ल्यांद्वारे अत्यंत महागड्या लष्करी साधनसंपत्तीचा संपूर्ण नाश करता येतो. यामुळे या हल्ल्याने ड्रोन युद्धाला नव्याने एक रणनीतिक आकार मिळाला आहे. ड्रोन हल्ल्यांना रोखण्यासाठी प्रभावी संरक्षण प्रणाली उपलब्ध नसेल, तर अगदी प्रगत हवाई संरक्षण यंत्रणाही निष्प्रभ ठरू शकते.
रशियासारखा सामरीक महासत्ता असणारा देश युक्रेनचा हा हल्ला थोपवू कसा शकला नाही, हा आज जगाला पडलेला प्रश्न आहे. या हल्ल्याने रशिया भेदरून गेला आहे. आपल्या उरल्यासुरल्या लष्करी सामग्रीचे, आण्विक कार्यक्रमाचे संरक्षण कसे करायचे या पेचात पडला आहे. हा संपूर्ण जगासाठी एक धडा आहे. आपल्याला अशा प्रकारच्या हल्ल्यांपासून संरक्षण करायचे असेल तर सदैव सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच सर्व अतिमहत्त्वाच्या गोष्टींभोवती मल्टिलेअर अँटीएअरक्राफ्ट सिस्टीम्स तैनात ठेवाव्या लागतील. चीप ड्रोन्स हे जास्त क्षमतेने आणि एकत्र झुंडीने हल्ला करु शकतात. त्यामुळे आता ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. महागड्या अँटी मिसाईल प्रणालीपेक्षाही तुलनेने कमी किमतीच्या अँटी ड्रोन सिस्टीम्स तैनात करणे ही आता काळाची गरज ठरली आहे. इलेक्ट्रॉनिक काऊंटर व्हेजर किंवा सायबर अॅटॅकच्या मदतीने ड्रोन्सचे काम बंद पाडता येते, जेणेकरुन ते हल्लाच करू शकत नाही. आकाराने मोठे असणार्या ड्रोन्सचा पाडाव करण्यासाठी सैन्याकडे असणार्या रायफली, लाईट मशिन गन्स वेगवेगळ्या स्तरावर डिप्लॉय कराव्या लागतील. देशातील प्रत्येक महत्त्वाचा भाग अशा प्रणालींनी कव्हर करणे आवश्यक आहे. अन्यथा, आकाराने इवलेसे दिसणारे ड्रोन्स हाहाःकार उडवून देऊ शकतात.