

आता 2025 पासून 2039 पर्यंतच्या काळात जन्माला येणार्या पिढीला ‘जनरेशन बीटा’ अर्थात ‘जेन बीटा’ असे म्हटले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात एआयच्या युगात जन्मलेली ही पहिली पिढी असेल. 2035 पर्यंत ही पिढी जागतिक लोकसंख्येच्या 16 टक्के भाग असेल, असे मानण्यात येते. कशी असणार आहे ही पिढी? त्यांच्यापुढील आव्हाने कोणती असतील? त्यांच्या पालकांपुढे कोणती आव्हाने असतील?
मानवाच्या प्रत्येक पिढीचा स्वतःचा एक वेगळा ठसा असतो. वेळ, समाजव्यवस्था, तंत्रज्ञान आणि जगातील घडामोडींमुळे प्रत्येक पिढीची वैशिष्ट्ये बदलत जातात. वेगवेगळ्या कालखंडात जन्मलेल्या लोकसमूहांना विशिष्ट नावे दिली जातात, जसे की बेबी बूमर्स, जनरेशन एक्स, मिलेनिअल्स, जनरेशन झेड इत्यादी. प्रत्येक पिढीचा समाज आणि इतिहासाशी संबंध असतो. महायुद्धे, आर्थिक मंदी, औद्योगिक क्रांती आणि तांत्रिक प्रगती यांचा पिढ्यांच्या नावांवर प्रभाव असतो. प्रत्येक पिढीची ओळख त्या काळातील तंत्रज्ञानावर आधारित असते. उदाहरणार्थ, जनरेशन झेड ही इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात वाढलेली आहे. या मालिकेत आता एक जानेवारीपासून ‘अल्फा’ला मागे टाकत ‘जेन बीटा’ दाखल झाली आहे. नवी पिढी जुन्या पिढीच्या तुलनेत कितपत वैशिष्ट्यपूर्ण आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 31 डिसेंबर 2024 च्या रात्री न्यू जनरेशनच्या खुर्चीवरून ‘जेन अल्फा’ला उतरविले आणि 1 जानेवारी 2025 मध्ये ‘जेन बीटा’ला विराजमान करण्यात आले. काही मंडळी यासंदर्भात संभ्रमित आहेत. ‘जेन बीटा’ ही एकप्रकारे ‘हायपोथिसियल टेक्नोजनरेशन’ आहे. ‘जेन अल्फा’देखील कल्पना केलेली पिढी होती, असे मानण्यात येते.
सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा विकास, जीवनशैली, कामकाज, विचारसरणी आणि भविष्यवेधी द़ृष्टिकोनाला बीटा जनरेशनच्या माध्यमातून पाहण्याचा आहे. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास, बीटा जनरेशन म्हणजे समाजशास्त्रीय द़ृष्टिकोनातून एका ठराविक काळात जन्मलेल्या लोकांच्या माध्यमातून जगाला पाहण्याची एक द़ृष्टी होय. पिढ्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात विसाव्या शतकातच झाली आहे. तत्कालीन काळात नव्या पिढीला हिप्पी किंवा यिप्पीज या रूपातून ओळखले जायचे. वास्तविक, खर्या अर्थाने 1980 च्या दशकापासून काल्पनिक पिढीची प्रथा सुरू झाली. त्या त्या कालावधीत जन्मलेल्या लोकांचे सामूहिक अनुभव, मूल्य, सांस्कृतिक प्रभावांवर हे वर्गीकरण आधारित असते. यानुसार 1901 ते 1927 या काळात जन्मनेल्या पिढीला ‘द ग्रेटेस्ट जनरेशन’ असे म्हटले गेले. त्यानंतर द सायलेंट जनरेशन, बेबी बूम जनरेशन, जनरेशन एक्स, वाय, झेड असे करत 2010 ते 2024 या काळातील जनरेशन अल्फा अवतरली आणि आता ‘जेन बीटा’ अवतरली आहे. जनरेशन बीटा हा आपल्या विकसित होत असलेल्या जगाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. लोकसंख्या शास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांच्या लेखानुसार, 2035 पर्यंत जगात जेन बीटाची 16 टक्के लोकसंख्या असेल. तसेच,जेन मिलेनिअल्स आणि जेन झेडची ही मुले असतील.
जनरेशन बीटा ही पूर्णपणे सुपर टेक्नॉलॉजी युगावर स्वार आहे. त्यामुळे ही जनरेशन तंत्रज्ञानात इनोवेटेड लाईफस्टाईलयुक्त असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, ऑगमेटेंड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि लाखो प्रकारचे स्मार्ट डिव्हाईस या गोष्टी नव्या पिढीच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असतील. विचार करणे, समजून घेणे, वर्तन करणे आणि सर्वंकष जीवन जगण्याच्या सर्व प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करणारी ही कदाचित पहिलीच पिढी असेल. साहजिकच, जनरेशन बिटासाठी पारंपरिक शिक्षण पद्धती दुय्यम ठरेल. त्याऐवजी व्हीआर, एआर आणि जनरेटिव्ह एआयद्वारे शिकवले जाणारे शिक्षण महत्त्वाचे ठरेल. शिक्षकांऐवजी एआयआधारित स्मार्ट ट्यूटर शिकवणार्या प्रणाली अस्तित्वात येतील, ज्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांनुसार अभ्यासक्रम तयार करतील. या पिढीसाठी नोकर्या आणि व्यवसायांचे स्वरूपही पूर्णपणे बदललेले असेल. ऑटोमेशनमुळे अनेक पारंपरिक नोकर्या नष्ट होण्याची शक्यता असली, तरी नव्या कौशल्यांसाठी भरपूर संधी असतील. डेटा सायन्स, रोबोटिक्स, पर्यावरणशास्त्र आणि डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.
जेन बीटा ही संपूर्ण जगाशी एकाचवेळी फिजिकली आणि व्हर्च्युअली कनेक्टेड असेल. मात्र, यात अडचण म्हणजे वास्तव जग आणि आभासी जग या दोहोंकडे जेन बीटा एकाचवेळी एकाच नजरेने पाहणारी आहे. त्यामुळे या दोन्हींमध्ये त्यांना फार फरक करता येणार नाही. कदाचित, यामुळे ही जनरेशन दोन्हींमध्ये सहजपणे सामावून जाणारी ठरू शकते. त्याचबरोबर बीटा जनरेशनची ओळख ही एखाद्या संस्कृतीच्या भागापुरती मर्यादित न राहता ती मल्टिकल्चरल म्हणजेच बहुसांस्कृतिकतावादी पिढी असेल. इंटरनेट आणि ग्लोबलायझेशनमुळे ही पिढी जुन्या पिढीच्या तुलनेत सांस्कृतिक वैविध्यता अधिक प्रमाणात जोपासणारी आणि सर्वंकष विचारांसह नावारूपास येईल. त्यामुळे आपली इतरांची संस्कृती यामध्ये फरक करणे ‘जेन बीटा’ला कठीण ठरू शकते. आजवरच्या पिढ्यांना हा फरक किंवा विभागणी सहजगत्या लक्षात आली. या जनरेशनमधील तरुण पिढी त्यांच्या गाण्यात पहिली पसंती अमेरिका आणि आफ्रिकन रॅपला देऊ शकते. याउलट अमेरिकी तरुणांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांत जिलेबीसारख्या भारतीय पदार्थांचा समावेश होऊ शकतो. कारण, जनरेशन बीटामध्ये पूर्वीसारखा सांस्कृतिक भेदभाव असणार नाही.
‘जेन बीटा’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा व्यावहारिक पातळीवर वापर सुरू झाल्यानंतर ती अवतरणार असल्याने या कृत्रिम वातावरणातच त्यांची वाढ होईल, ती बहरेल, सुशिक्षित होईल. एआयचा समावेश त्यांच्या जीवनाच्या सर्व बाबींमध्ये राहील. मागील पिढ्यांना टेक्नोसॅव्ही बनण्यासाठी बराच काळ जावा लागला. अनेक परिश्रम घ्यावे लागले. त्यातुलनेत ‘जेन अल्फा’ला कमी वेळ लागला. आता ‘जेन बीटा’ तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या पाठीवर स्वार होऊनच अवतरणार असल्यामुळे या पिढीची टेक्नॉलॉजीसंदर्भातील आकलन क्षमता मागील पिढीच्या तुलनेत वेगळी राहणार आहे. मागील पिढी तंत्रज्ञान समजून घेणारी होती; पण ‘जेन बीटा’ ही तंत्रज्ञान बदलणारी असेल.
या पिढीत आणखी एक वेगळेपण दिसेल आणि ते म्हणजे कुटुंबातील रचनेतील बदल. या पिढीचे कुटुंब पूर्णपणे डिजिटलयुक्त असेल. कौटुंबिक व्यवस्था लवचिक असेल; पण तेथे जुन्या सामाजिक संरचना या असून नसल्यासारख्या असतील. त्यामुळे 1 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली ‘जेन बीटा’ ही ‘जेन अल्फा’च्या (2010-2024) तुलनेत अनेक बाबतीत पुढे असेल. विशेषतः, एक्स, वाय, झेड या आपल्या पूर्वपिढ्यांपासून ही जनरेशन काही प्रकाशवर्षाच्या अंतरावर असणार आहे. कदाचित, आनुवंशकितेमुळे त्यातील एखाददुसरे लक्षण पाहावयास मिळेल. त्यामुळे ‘जेन बीटा’ आतापर्यंतची सर्वात आधुनिक, ग्लोबल आणि जीवनशैलीच्या बाबतीत आघाडी घेणारी असेल.
काही दशकांपूर्वीपर्यंत मानव पर्यावरणाबाबत खूपच संवेदनशील आणि जागरूक होता. परंतु, 1950 च्या दशकांतील दुसर्या महायुद्धानंतर पृथ्वीचे पर्यावरण संकटात सापडण्याची प्रक्रिया गतिमान बनू लागली. त्यानंतर पुनर्बांधणीचे युग सुरू झाले आणि ते पर्यावरणाच्या मुळावर आले. कारण, माणूस पर्यावरणाबाबत संवेदनशून्य बनला. जंगलतोड, नद्या अडवणे, समुद्रावर भराव टाकणे, सांडपाणी सोडणे या गोष्टी बिनदिक्कत सुरू झाल्या. तत्कालीन काळात या गोष्टी विकास आणि प्रगतीच्या नावाखाली खपवल्या जात होत्या. मात्र, जेव्हा या गोष्टींचा अतिरेक झाला तेव्हा पायावरच कुर्हाड मारून घेतल्याची जाणीव झाली. साहजिकच, पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली. परंतु, विकास आणि पर्यावरणाची हानी या चक्रात अडकलेली पिढी पर्यावरणाबाबत पुरेशा प्रमाणात सजग राहू शकली नाही. या पार्श्वभूमीवर ‘जेन बीटा’ ही पर्यावरणाबाबत संवेदनशील राहू शकते. ही पिढी पर्यावरणाचे महत्त्व सांगण्यास सज्ज असेल आणि सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा प्रयत्न करताना दिसू शकते.
तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीचे वाढते प्रस्थ पाहता या नव्या पिढीतील मुलांचे पालकत्व वाटते तेवढे सोपे राहणार नाही. ‘जेन बीटा’च्या काळातील मुलांचा सांभाळ आणि संगोपन करताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण, ही मुले तुलनेने अधिक स्मार्ट आणि बुद्धिमान असतील. तरीही त्यांना आयुष्यातील अनेक गोष्टींशी ताळमेळ बसविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पालकांची जबाबदारी वाढू शकते. त्यांना स्वत:लाच अपडेट राहावे लागेल आणि पालकत्वाची नवीन शैली अंगीकारावी लागेल. या मुलांत सर्वंकष विकास (शारीरिक, मानसिक, भावनात्मक, सामाजिक विकास) चांगल्यारीतीने होण्यासाठी पालकांना त्यांच्याशी ताळमेळ बसविणे गरजेचे आहे. यात स्क्रीन टाईममधील समतोल राखण्यावर भर देणे, त्यांच्या कौशल्याला वाव देणे, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे, सायबर सुरक्षेची माहिती देणे या गोष्टींच्या माध्यमातून पालकांना ‘जेन बीटा’च्या पिढीची जडणघडण करावी लागणार आहे. एआय युगातील या पिढीला सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वापरातील धोक्यांचाही सामना करावा लागू शकतो. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो. अशावेळी पालकांनी आपली आधारवडाची भूमिका बजावत या नव्या पिढीला सुरक्षिततेचे कवच देणेही आव्हानात्मक असेल.
एकंदरीत सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यासह पालक आणि एकूण समाजानेच या नव्या पिढीसाठी आवश्यक ते बदल आतापासूनच आखायला हवेत. भविष्यातील जगासाठी ही पिढी कशी घडेल, यावरच समाजाच्या पुढील प्रगतीचा वेग ठरेल.