

शहाजी शिंदे, एआय तज्ज्ञ
कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट चष्मे, आवाजावर चालणारी उपकरणे, वेअरेबल्स आणि सभोवतालचे संगणन यामुळे भविष्यात डिजिटल जगाशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक वेळी मोबाईल फोन हातात घ्यावा लागेलच असे नाही. याचा अर्थ स्मार्ट फोन एका रात्रीत गायब होतील असा नाही; पण तो हळूहळू ‘स्क्रीन’मधून बाहेर पडून आपल्या चष्म्यात, घड्याळात, कानातील उपकरणात, घरात आणि कदाचित कपड्यांतही सामावू लागेल.
तंत्रज्ञानाची गंमत अशी की, काल ज्याने अनेक उपकरणे कालबाह्य केली, त्याच उपकरणाला उद्या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागते. आज स्मार्ट फोनच्या बाबतीत नेमके हेच घडू लागले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा झपाट्याने होत असलेला विकास, स्मार्ट चष्म्यांतील सुधारणा, आवाजावर काम करणारे एआय सहायक आणि हातावर घालता येणार्या उपकरणांची वाढती क्षमता पाहता एक प्रश्न वारंवार विचारला जातो, तो म्हणजे स्मार्ट फोननंतर काय? आज स्मार्ट फोन वापरताना जवळपास प्रत्येक कृतीसाठी स्क्रीन आवश्यक आहे. संदेश आला तर फोन उघडायचा, नकाशा पाहायचा असेल तर स्क्रीनकडे पाहायचे, भाषांतरासाठी अॅप उघडायचे, माहिती शोधायची असेल तर टाईप करायचे. पुढील टप्प्यात ही पद्धत बदलण्याची चिन्हे आहेत. आपण उपकरणाला काय करायचे ते सांगू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता त्यासाठी आवश्यक असलेली अॅप्स, माहिती आणि सेवा स्वतः हाताळेल, अशी दिशा दिसते. उदाहरणार्थ, ‘उद्या सकाळी पुण्याहून दिल्लीला जाण्यासाठी योग्य विमान शोध आणि विमानतळापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था कर’ एवढे सांगितल्यावर वेगवेगळी अॅप्स उघडण्याऐवजी एआय सहायक संपूर्ण कामाची सांगड घालू शकेल. अर्थात, पैसे देणे, आरक्षण निश्चित करणे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर वापरकर्त्याची स्पष्ट संमती आवश्यकच राहील.
स्मार्ट फोननंतरच्या उपकरणांमध्ये सर्वाधिक चर्चा स्मार्ट चष्म्यांची आहे. समोरची इमारत कोणती, आपण कोणत्या रस्त्यावर आहोत, पुढचे वळण कुठे घ्यायचे, समोर लिहिलेल्या परदेशी भाषेचा अर्थ काय किंवा एखाद्या वस्तूविषयी अधिक माहिती हवी असल्यास या चष्म्यातील कॅमेरा आणि एआय मिळून हे काम करू शकतात. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे, माहिती पाहण्यासाठी खिशातून फोन काढण्याची गरज कमी होणे. आजच्या स्मार्ट चष्म्यांना मर्यादाही आहेत. बॅटरी, वजन, किंमत, छोट्या आकारात शक्तिशाली संगणकीय क्षमता बसविणे आणि गोपनीयता हे प्रश्न कायम आहेत. दिवसभर सहज वापरता येईल, सामान्य चष्म्यासारखा दिसेल आणि त्याचवेळी फोनइतकी कामे करेल, असा चष्मा तयार करणे अजूनही मोठे तांत्रिक आव्हान आहे.
न्यूरल बँड म्हणजेच मनगटावर बांधलेल्या उपकरणातून स्नायूंच्या हालचालींमुळे निर्माण होणारे सूक्ष्म विद्युत संकेत टिपून त्यांचे डिजिटल आदेशात रूपांतर करण्याचे तंत्र विकसित होत आहे. उदाहरणार्थ, अंगठा आणि बोटांची अतिशय सूक्ष्म हालचाल करून एखादा पर्याय निवडणे, संदेश स्क्रोल करणे किंवा स्मार्ट चष्म्यातील माहिती नियंत्रित करणे येत्या काळात शक्य होऊ शकते. यासाठी प्रत्येक वेळी हवेत मोठमोठे हातवारे करण्याची गरज नसते. मनगटातील स्नायूंमध्ये तयार होणारे संकेत सेन्सर पकडतात आणि संगणक त्यांचा अर्थ लावतो अशी प्रणाली विकसित होत आहे. इअरबड्सचे ही स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. आज ते प्रामुख्याने संगीत आणि फोनसाठी वापरले जातात. पुढे त्यात एआय सहायक कायम उपलब्ध राहू शकतो. रस्त्यावर चालताना ‘जवळचे मेट्रो स्टेशन कुठे आहे’ असे विचारले, तर उत्तर कानात ऐकू येईल. परदेशात समोरचा माणूस वेगळ्या भाषेत बोलत असेल, तर जवळपास तत्काळ भाषांतर ऐकण्याची सोय अधिक सक्षम होईल. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे नोंदवणे, आठवणी करून देणे किंवा दिवसभरातील कामांची माहिती देणेही शक्य होईल. अशा वेळी फोन खिशात असेल; पण प्रत्येक कामासाठी तो हातात घ्यावा लागणार नाही.
आज स्मार्ट फोन हा डिजिटल जगाचा मध्यबिंदू आहे. उद्या मात्र संगणकीय क्षमता घरात सर्वत्र विखुरलेली असेल. आरसा दिवसाचे वेळापत्रक दाखवू शकेल, टीव्ही घरातील एआय केंद्र म्हणून काम करू शकेल, स्वयंपाकघरातील उपकरणे उपलब्ध वस्तूंनुसार पदार्थ सुचवतील, गाडी प्रवासाचे नियोजन करेल आणि घरातील सेन्सर तापमान, प्रकाश किंवा ऊर्जा वापर गरजेनुसार बदलतील. या संकल्पनेला ‘अॅम्बियंट कम्प्युटिंग’ असे म्हटले जाते. साध्या भाषेत सांगायचे, तर संगणक समोर ठेवून वापरण्याऐवजी संगणकीय क्षमता आपल्या आजूबाजूच्या वातावरणात मिसळलेली असेल.
मग, स्मार्ट फोनची गरज खरंच संपणार का? नाही. इतक्या लवकर नाही. याचे कारण, स्मार्ट फोनमध्ये एक मोठी ताकद आहे. तो अनेक कामांसाठी पुरेसा चांगला आहे. मोठी स्क्रीन, उत्तम कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसर, बॅटरी, मोबाईल नेटवर्क, सुरक्षित पेमेंट आणि लाखो अॅप्सची व्यवस्था एका उपकरणात मिळते. हे संपूर्ण जाळे एका नव्या उपकरणाने लगेच बदलणे अवघड आहे. त्यामुळे स्मार्ट फोन अचानक नाहीसा होण्यापेक्षा त्याची भूमिका बदलण्याची शक्यता अधिक आहे. आज तो आपल्या डिजिटल आयुष्याचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे. उद्या तो खिशात राहणारे संगणकीय केंद्र बनेल आणि त्याच्याशी जोडलेले चष्मे, घड्याळ, इअरबड्स किंवा इतर उपकरणे आपल्या प्रत्यक्ष संपर्कात असतील. काही काळ दोन्ही व्यवस्था एकत्र चालतील.
भारतात या बदलाचा वेग विकसित देशांपेक्षा वेगळा असू शकतो. त्याचे कारण, केवळ किंमत नाही. भारतीय भाषांमध्ये सहज चालणारे एआय, आवाजातील विविध उच्चार समजण्याची क्षमता, ग्रामीण भागातील इंटरनेट, बॅटरी आणि उपकरणांच्या दुरुस्तीची व्यवस्था हे घटकही महत्त्वाचे आहेत. आजघडीला आपल्याकडे अनेकांसाठी इंटरनेटचा अर्थ स्मार्ट फोन आहे. त्यामुळे पुढचे उपकरण लोकप्रिय व्हायचे असेल, तर ते फोनपेक्षा अधिक सोपे आणि परवडणारे असावे लागेल. स्मार्ट फोननंतरच्या युगात गोपनीयतेचा प्रश्नही अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण, स्मार्ट चष्मा आपण जे पाहतो ते सर्व काही पाहू शकतो. इअरबड्स आपल्या आजूबाजूचे आवाज ऐकू शकतात. स्मार्ट घड्याळे शरीराची माहिती गोळा करतच आहेत. एआय सहायकाला वेळापत्रक, संदेश, ठिकाण आणि सवयींची माहिती असू शकते. या प्रश्नांची उत्तरे केवळ तंत्रज्ञान कंपन्यांवर सोडून चालणार नाहीत. कायदे आणि ग्राहक संरक्षणालाही त्याच वेगाने पुढे जावे लागेल.